16 January 2019

News Flash

चंद्रमुखी

चंद्रमुखीच्या व्यक्तिरेखेतून स्त्रीमनाचं न उकलणारं गूढ आणि प्रेम करण्याचं सामथ्र्य यावरच लक्ष केंद्रित करू या.

|| प्रभा गणोरकर

चंद्रमुखी ही बंगाली लेखक शरच्चंद्र चट्टोपाध्याय (१८७६-१९३८) यांच्या ‘देवदास’ (१९१७) या कादंबरीतील व्यक्तिरेखा. ही लहानशी कादंबरी पुन्हा वाचल्यावर तिच्यातील ओघवतं निवेदन, प्रभावी पात्रचित्रण, शरच्चद्रांच्या देवदासवर असलेला हॅम्लेटचा प्रभाव, अस्वस्थ करणारी शोकात्म कथा, प्रथम वाचनात ध्यानात न आलेली या कलाकृतीची सौंदर्यस्थळं यासंबंधी लिहावंसं वाटलं! पण सध्या शरच्चंद्रांनी रेखाटलेल्या चंद्रमुखीच्या व्यक्तिरेखेतून स्त्रीमनाचं न उकलणारं गूढ आणि प्रेम करण्याचं सामथ्र्य यावरच लक्ष केंद्रित करू या.

कादंबरीत चंद्रमुखी या पात्राचा प्रवेश होतो तेव्हा देवदास हा कादंबरीचा नायक नराश्याने आणि त्यातून आलेल्या व्यसनाधीनतेने विकल होऊन चुनीलाल या मित्राबरोबर तिच्याकडे आलेला असतो. तालसोनापूर गावचे कोटय़धीश जमीनदार नारायण मुखोपाध्याय यांचा हा मुलगा. भल्यामोठय़ा वाडय़ात, भरपूर लाडाकौतुकात त्याचं बालपण गेलेलं असतं. शेजारी जुन्या लहानशा घरात राहणारी नीलकंठ चक्रवर्तीची मुलगी पार्वती त्याची बालमत्रीण असते. शाळेत त्याचं चित्त रमत नाही. चोरून हुक्का ओढावा, पारोबरोबर हुंदडावं किंवा भांडावं असा त्याचा दिनक्रम. पण वडील त्याची रवानगी कोलकाताला राहणारा त्याचा मामा नगेनबाबू यांच्याकडे करतात. तिथे त्याचा दिमाख आणखीच वाढतो. विलायती बूट, नीटनेटके कपडे, छडी, सोन्याची साखळी असलेलं घडय़ाळ, शिकार करणं यात दहा एक र्वष निघून जातात. पार्वतीची त्याला फारशी आठवणही येत नाही. इकडे गावाकडे पार्वती देवदासच्या आठवणीशिवाय क्षणही घालवू शकत नाही. तीही आता मोठी झाली आहे. तिचं देवदासशी लग्न व्हावं अशी तिच्या आईची इच्छा आहे. परंतु ते गरीब आणि कोणत्याही अर्थाने बरोबरीचे नाहीत म्हणून देवदासच्या आई-वडिलांना हा प्रस्ताव मान्य नाही. पार्वतीच्या लग्नाच्या हालचालींना वेग येतो तेव्हा एका रात्री पार्वती त्याला भेटायला येते. ‘जगाची पर्वा न करता दुर्दैवी पार्वती तुझ्या पायांवर डोकं ठेवायला आली होती.. इथं जागा दे मला देवदास,’ अशी याचना करते. तेव्हा देवदास तिला म्हणतो, ‘‘पारू, आई-बाबांच्या मनाविरुद्ध मी कसा जाऊ?’’ दुसऱ्या दिवशी वडिलांचा स्पष्ट नकार ऐकून देवदास कोलकात्याला निघून जातो. तिथून तिला पत्र पाठवतो : ‘‘तुला सुखी करायला गेलो तर त्यांना भयंकर धक्का बसेल. त्यांना दु:ख झालेलं मला सहन होणार नाही.. शिवाय त्यांच्या विरुद्ध जाऊन हे लग्न होणार तरी कसं.. आणखी एक गोष्ट, तुझ्यावर मी खूप प्रेम केलंय असं मला वाटत नाही. मला विसरण्याचा प्रयत्न कर.’’ देवदास दुबळा आहे, त्याला निर्णय घेता येत नाही. आई-वडिलांच्या विरोधात जाता येत नाही. तो परत गावी येतो त्या वेळी पार्वतीच्या वडिलांनी वर्धमान जिल्ह्यतल्या हातीपोता गावातल्या भुवन चौधरी या बिजवराशी तिचं लग्न ठरवलेलं असतं. नदीवर पाणी आणायला गेलेल्या पार्वतीला तो भेटतो तेव्हा तो म्हणतो, ‘‘मी कसंही करून आई-वडिलांचं मन वळवीन. तू फक्त..’’ त्यावर पार्वती म्हणते, ‘‘तुला आई-वडील आहेत आणि मला नाहीत?’’ तो लहरी, अडाणी, अविचारी आहे असं ती स्पष्ट सांगतेच. पार्वतीचा स्वाभिमान, करारी स्वभाव आणि निश्चय दाखवून देणारा हा प्रसंग आहे.

पार्वतीचं लग्न होतं ती रात्र देवदास ईडन गार्डनमधल्या एका बाकावर पडून घालवतो. चुनीलाल या मित्राबरोबर तो राहत असतो. एकेदिवशी तो चुनीलालबरोबर चितपूरच्या एका दुमजली हवेलीत जातो. हवेलीच्या मालकिणीचं नाव आहे चंद्रमुखी. स्वत:च्याही नकळत देवदास स्त्रीच्या सावलीचाही तिरस्कार करू लागला आहे. त्यात त्यांच्यासमोर चंद्रमुखी हुक्का ओढू लागल्यावर तो म्हणतो, ‘‘काय हे असभ्य वागणं, किती घाणेरडं दिसतं!’’ चंद्रमुखी नायकीण आहे, चोवीस वर्षांची. गेल्या आठ-दहा वर्षांत तऱ्हेतऱ्हेची माणसं तिने जवळून पाहिली आहेत. पण असा उद्धट, विचित्र, तिला झिडकारणारा माणूस तिला पहिल्यांदाच भेटला. ‘पसे घेतेस ना तू’ असं तुच्छतेने म्हणत पाकिटातून नोट काढून तो तिच्या हातावर ठेवतो आणि चालता होतो. हेटाळणी, पाणउतारा, अपमान यांची तिला सवय होती. पण देवदासने पुन्हा यावं असं तिला वाटतं. त्याला घेऊन येण्याची ती चुनीलालला गळ घालते. देवदास तिच्याकडे येऊन पीत बसतो. तिचा अपमान करीत राहतो. म्हणतो, ‘‘तुला स्पर्श करू शकत नाही मी. किळस येते मला तुझी.  तुझा राग येतो मला. तुझा तिटकारा करतो मी.’’ चंद्रमुखी शांतपणे त्याचं वागणं, टाकून बोलणं सहन करीत असते.

देवदास दारू पितो, पण तो दारुडय़ा नाही. तिची सहनशीलता त्याला जाणवते. राग, कष्ट, अत्याचार, अपमान, छळ बायकांना किती सहन करावा लागतो त्याचं प्रतीक आहेस तू, असं तिला बोलूनही दाखवतो.

देवदासचे वडील मृत्यू पावल्याचा निरोप घेऊन धरमदास येतो. त्यानंतर जवळजवळ सहा महिने देवदास घरीच राहतो. या काळात चंद्रमुखीने आपलं आयुष्य बदलून टाकलेलं असतं. ती सर्व सोडून देते. आईला काशीला पोचवून देवदास कोलकात्याला परत येतो. चुनीलालचा ठावठिकाणा नसतो. अचानक त्याला चंद्रमुखीची आठवण येते. तिचं घर शोधत तो येतो. त्या घरात ती राहत नसते. शेजारच्या एका घरातून ती बाहेर येते. तेव्हा तो आश्चर्यचकित होतो आणि दु:खीही. काळ्या काठाची पांढरी साडी ती नेसली आहे. केस विस्कटलेले आहेत. रोडावलेलीही दिसते. घरात सामानसुमान काहीच नाही. तिच्याशी बोलताना त्याला कळतं, तिने धंदा बंद केलेला असतो. दागदागिने, सामानसुमान विकून ती गुजराण करीत असते. उरलेले आठशे-नऊशे रुपये तिने एका माणसाजवळ ठेवलेले असतात. आणि त्यातून तो देत असलेल्या वीस रुपयांत ती जगत असते.

खरं म्हणजे देवदासची भेट होण्याची ती वाट पाहत असते. जिथे वीस रुपयांत भागेल अशा एखाद्या लहान गावात जाण्यापूर्वी तो भेटावा, ही आस ठेवून ती जगत असते. ती म्हणते, तुम्ही भेटलात, आता मी उद्याच इथून निघेन. या भेटीत चंद्रमुखी देवदासशी जे संभाषण करते त्यातून तिच्या प्रगल्भतेची झळाळी जाणवते. शरच्चंद्रांनी, धंदा करणाऱ्या या सामान्य स्त्रीचं असामान्यत्व ताकदीने उभं केलं आहे. जगण्याने आणि अनुभवाने तिला आलेलं शहाणपण, प्रेमाचा तिला उमगलेला अर्थ आणि ती कबूल करीत नसली तरी शब्दाशब्दातून व्यक्त होणारं तिचं देवदासवरचं प्रेम, त्याच्याविषयीची आस्था, माया, कळकळ या  संभाषणातून व्यक्त होते. देवदासमुळे तिचं आयुष्य बदलून गेलं आहे. त्याच्या श्रीमंतीच्या मोहात ती कधीच नव्हती. तिचं प्रेम अथांग आणि निरपेक्ष आहे. देवदासच्या बरळण्यातून पार्वतीमुळे तो दु:खी आहे हे तिला जाणवलं आहे. त्याच्या दु:खाने ती दु:खी होते. त्याचं पीत राहणं तिला सहन होत नाही. ती त्याला समजावते, ‘‘पार्वतीनं तुम्हाला फसवलं नाही, तुम्हीच स्वत:ला फसवलं. मी तुमच्यापेक्षा वयानं मोठी आहे, हे जगही तुमच्यापेक्षा जास्त पाहिलं आहे.  मला वाटतं, तुमची चूक झाली. चंचल आणि अस्थिर  म्हणून बायकांना दोष दिला जातो, त्या तशा नसतात. मी आयुष्याचा बराच काळ प्रीतीचा धंदा करण्यात घालवला, पण प्रेम एकदाच केलं. प्रेम ही फार मूल्यवान गोष्ट आहे.. खरं प्रेम सगळं सोसत राहतं. अंतरात असलेल्या प्रेमात किती सुख असतं, किती तृप्ती असतं हे ते करणारीलाच कळतं. माझ्यावरूनच सांगते ना, तिनं तुमच्यावर किती प्रेम कलं असेल ते.’’

या भेटीनंतर तो निरोप घेतो तेव्हा तिला अश्रू आवरत नाहीत. चंद्रमुखी ठरवल्याप्रमाणे एका लहान गावात घर करून राहू लागते. देवदासला आपला पत्ता कळवते. तो तिला मधून मधून पसे पाठवत असतो. लोकांना मदत करणं. पूजा, दानधर्म असं व्रतस्थ जीवन ती घालवू लागते. पण देवदासची खबर नसते. तिच्या पत्रांची उत्तरं नाहीत, रजिस्टरही परत येतं. तेव्हा ती लाल काठाची पांढरी साडी असं सुवासिनीचं वस्त्र घालून, अलंकार लेऊन ती तालसोनापूरला जाते. त्याच्या भावजयीकडून तिला त्याचा व्यसनीपणा आणि उधळलेलं जीवन समजून येतं. देवदासला शोधण्यासाठी ती परत कोलकाताला येते, घर करते. सारा जामानिमा पूर्वीसारखा सजवते. त्याचा शोध घेण्यासाठी. एका रात्री अचानक रस्त्यावरून ओळखीचा आवाज तिला ऐकू येतो. देवदास रस्त्यावर झिंगून पडलेला असतो, त्याला ती घरी घेऊन येते. दुसऱ्या दिवशी त्याला म्हणते, ‘‘काल रात्री तुम्ही मला ओळखलंसुद्धा नाही.’’ त्यावर तो म्हणतो, ‘‘तुला ओळखलं नाही, पण तू घेतलेली काळजी ओळखली. मनात आलं, की माझ्या चंद्रमुखीशिवाय कोण माझी एवढी काळजी घेणार.’’ हे ऐकून तिला आनंदानं रडावंसं वाटतं. ती डॉक्टरला आणते. व्यसनाने त्याचं शरीर पोखरलेलं असतं. धरमदासला ती बोलावून घेते. तिच्या शुश्रूषेने देवदासची प्रकृती सावरते. एकदा तो तिला म्हणतो, ‘‘आजपासून मी तुला बहूच म्हणणार आहे. तू माझी जी काळजी घेते, बहू, तू माझी आहेस तरी कोण?’’

पार्वती आणि चंद्रमुखी या दोघींमधला फरक त्याला जाणवतो. तो तिच्यावरच्या प्रेमाची कबुली देतो, म्हणतो, ‘‘पाप-पुण्याचा निवाडा करणारा तुझा काय न्यायनिवाडा करील तो करील, पण मृत्यूनंतर पुन्हा भेट झाली तर मी तुझ्यापासून दूर राहू शकणार नाही, आणि जिवंत असेपर्यंत तुला विसरणं शक्य नाही.’’ देवदासला चंद्रमुखीचं धीराने वागणं, शांतपणा, सहनशीलता, आपल्यावरचं प्रेम कळलेलं आहे. शेवटी तो पार्वतीकडे जायला निघतो तेव्हा आईच्या आठवणीने त्याचे डोळे भरून येतात. तिच्याबरोबर आणखी एक पवित्र व्यक्ती त्याच्या डोळ्यांसमोर उभी राहते. चंद्रमुखी!

मरणोन्मुख झालेला देवदास पार्वतीच्या गावी पोचतो. गाडीवान त्याला पारावर झोपवतो. पहाट झाल्यावर त्याचा निष्प्राण देह लोकांना दिसतो. डोंब देह उचलून घेऊन जातो, अर्धवट जळलेल्या त्या शरीरावर कावळे, गिधाडं तुटून पडतात. कथेच्या शेवटी निवेदक म्हणतो, त्याच्यासारखं मरण दुसऱ्या कुणालाही येऊ नये अशी प्रार्थना करा. एखादा प्रेमळ हात त्याच्या कपाळावर असावा, एखादा ममताळू स्नेहशील चेहरा पाहत जीवनाचा अंत व्हावा, कोणाचे अश्रू पाहत पाहत डोळे मिटावे.

मरणोन्मुख एकाकी अवस्थेत पारावर पडलेल्या देवदासजवळ अश्रू ढाळणारा प्रेमळ चेहरा माझ्या डोळ्यांसमोर येतो तो चंद्रमुखीचा!

prganorkar45@gmail.com

chaturang@expressindia.com

First Published on June 2, 2018 12:08 am

Web Title: prabha ganorkar article about chandramukhi