29 September 2020

News Flash

इंदू काळे स्त्रीत्वाचे रूपबंध

‘‘पुरुषांप्रमाणे बायकांना पुढे कोठल्या तरी युगात मन मोकळे करून बोलताचालता येईल का?’’

‘‘पुरुषांप्रमाणे बायकांना पुढे कोठल्या तरी युगात मन मोकळे करून बोलताचालता येईल का?’’ हा सरला भोळेने विचारलेला प्रश्न तिच्या बाबतीत फारसा महत्त्वाचा ठरला नाही, पण तिची भावजय इंदू काळे हिच्या बाबतीत तो अगदी खरा ठरला.

‘इंदू काळे-सरला भोळे’ या वामन मल्हार जोशी यांच्या कादंबरीतील इंदू ही सरलेच्या भावाची बायको. ही कादंबरी पत्रात्मक आहे. इंदू, तिचा नवरा भाऊराव, तिची नणंद सरला, तिचा नवरा विनायकराव, त्यांचा मित्र नारायणराव पाठक आणि त्याच्यावर जिचे प्रेम आहे ती काशी ही सर्व पात्रे, त्यांच्या जीवनातल्या घटना, त्यांच्या आयुष्यातले प्रसंग, भावभावना, त्यांचे स्वभाव, परस्परसंबंध हे सारे एकमेकांना जी पत्रे पाठवतात त्यातून वाचकांना कळत जाते. विनायकराव भोळे आणि त्यांची प्रिय पत्नी सरला यांचे आयुष्य परस्परांवरल्या प्रेमाने कृतार्थ झाले. तसे इंदूचे झाले नाही.

वास्तविक भाऊ काळे आणि इंदू गुप्ते यांच्याबद्दल लोकापवादाचे वादळ लग्नाआधी उत्पन्न झाले होते; पण विनायकराव सरलाला लिहिताना, ‘‘भाऊला म्हणावे, लोकापवादाला भिऊ नये. लोक पाहिजे ते बोलतील,’’ असा प्रेमळ सल्ला देतात; पण त्याच पत्रात, ‘‘इंदू विषयी ऐकतो ते खरे असेल तर ती सुशीला नाही असेही म्हणावे लागेल,’’ असेही एक वाक्य येते.

इंदू गुप्ते आणि सूर्यकांत ऊर्फ भाऊ काळे यांच्याबद्दल लोक बोलू लागले खरे, पण चारच दिवसांत वातावरण बदलून इंदू आणि भाऊराव फिरायला जाऊ लागले, हरतऱ्हेच्या गोष्टी मोकळेपणाने आणि न लाजता बोलू लागले. भाऊला इंदूची ओळख पटली. इंदू गरिबाची आहे, इंदू जरा नटवी आहे, इंदू भोगप्रिय आहे आणि तिच्या मनात ‘न्यूनगंड’ आहे, ही तिच्याबद्दलची निरीक्षणे भाऊने विनायकरावांना पत्रातून कळवलीही आहेत. फक्त तिने सरलेशी पटवून घ्यावे, तिचे मन दुखवू नये, असा प्रसंग जर आला तर मला जीव द्यावासा वाटेल, असेही भाऊने म्हटले आहे.

इंदूचे भाऊरावांशी लग्न होऊन महिना-दोन महिने होतात न होतात तेवढय़ात तिच्या वागण्याबद्दलच्या तक्रारी सुरू होतात. इंदू आणि सरला यांचे पटत नाही ही तशी किरकोळ गोष्ट, ‘गुप्ते’ यांची ही मुलगी प्रभू समाजातली म्हणून सासू तिला स्वयंपाक करू देत नाही वगैरे; पण त्याहीपेक्षा गंभीर तक्रार अशी आहे की, इंदूला गाण्या-बजावण्याची आवड आहे. अशी आवड असणे ‘तसे वाईट नाही’, पण ती बिन्दुमाधव म्हसकर या गायन मास्तरांबरोबर ‘एकान्त करते’, ‘बरोबर कोणी घेतल्याशिवाय त्याच्याबरोबर वारंवार फिरायला जाते.’ ही तक्रार भाऊ काळेच्या वडिलांनी त्याच्या कानावर पत्राद्वारे घातलेली आहे. तिच्याबद्दल लोकापवाद सुरू झाले आहेत हे इंदूलाही कळले आहे आणि लोकापवादांना भ्याले पाहिजे म्हणून ‘आपण शिकवणीच्या वेळेशिवाय मला भेटण्यास येऊ नये’ असे ती बिंदुमाधवला कळवते. याच पत्रात ‘तुम्ही आल्यावर मला नाही म्हणवत नाही, वेळेचे भान न राहता आपण फार वेळ बोलत बसतो हे घरात आवडत नाही.. माझे कलाप्रेम मला गुंडाळून ठेवले पाहिजे आणि आपल्याशी बोलण्या-चालण्यात कितीही आनंद वाटत असला तरी परंपरागत रूढ चालरीत पाळलीच पाहिजे,’ असे ती म्हणते. इंदूच्या या वागण्याचे सरधोपट वर्णन ‘कलाप्रेम विरुद्ध नीती’ असे केले गेले आहे आणि कुसुमावती देशपांडे यांच्यासारख्या जाणकार समीक्षकाने ‘कादंबरीतील या प्रश्नाला गौणत्व येते’ असे म्हटले आहे. ‘इंदू काळे व बिंदुमाधव यांच्या जीवनात कलेची ओढ वा नीतीची सामर्थ्यवान पकड यांचा लवलेशही नाही’ असा अभिप्राय त्यांनी स्पष्ट नोंदवला आहे. कादंबरीचा मोठा भाग इंदू काळेचे हे प्रकरण या ना त्या प्रकारे सर्व पात्रांद्वारे चर्चिण्यात गेला आहे.

खरे तर इंदू स्वत:ला फसवते आहे. तिचा नवरा भाऊराव हा कंत्राटदार आहे. कंत्राटे मिळवण्याच्या आणि मिळवलेली पुरी करण्याच्या धांदलीत तो असतो. बायकोसाठी त्याच्याजवळ वेळ नाही. घरकामापासून सासूने तिला दूर ठेवले आहे. बरोबरीची नणंद सध्या तरी माहेरीच आहे आणि पती विनायक भोळेच्या प्रेमात रमली आहे. तिला नुकतेच दिवसही गेले आहेत. अशा वेळी इंदूच्या आयुष्यात निर्माण झालेली पोकळी ती बिंदुमाधवच्या सहवासात भरून काढते आहे. बिंदुमाधव आता श्रीमंत घरात पडलेल्या, पण अजूनही ‘न्यूनगंड’ असणाऱ्या इंदूला जाळ्यात ओढतो आहे. तिच्या नटण्या-मुरडण्याची, रूपाची,   गुणांची, ‘कला’ प्रेमाची, येता-जाता गोड बोलून तो तारीफ करीत असणार, तिला ते आवडत असणार, त्याच्या या वागण्याबोलण्याने ती सुखावत असणार आणि त्याचे आकर्षण तिला वाटू लागले असणार. जगण्यात पोकळी असणारी, तरुण स्त्री अशी स्वत:ला नकळत परपुरुषाकडे आकर्षिली जाणे स्वाभाविक आहे; पण १९३६ मध्ये प्रकाशित झालेल्या या कादंबरीत लेखक तसे दाखवीत नाही, वामन मल्हार जोशी स्त्रीकेंद्री कादंबऱ्या लिहीत होते, पण त्यांना मुळात स्त्रियांवर चांगले संस्कार करायचे होते.

फ्लॉबेरप्रमाणे परपुरुषाच्या आकर्षणात वाहवत गेलेली मादाम बॉव्हरीसारखी स्त्री वामन मल्हारांना मराठी वाचकांपुढे ठेवायची नव्हती. शिवाय ही कादंबरी पत्रात्मक आहे. पत्रे ही जेवढे व्यक्त करतात त्याहून अधिक पुष्कळ काही दडवीत असतात. (उदाहरणार्थ, पाहा : जी. ए. आणि सुनीताबाई यांची पत्रे.) इंदूची गायन-वादनाची शिकवणी काही काळ बंद होते, नंतर भाऊराव ती पुन्हा सुरू करतो, इंदूला मुलगी होते, पण ती अल्पायुषी ठरते, इंदू आणि भाऊराव यांच्यात (‘भावाबहिणी’सारखे वागणे असल्याचा उल्लेख भाऊरावांच्या एका पत्रात आहे, त्यावरून कळते की,) दुरावा निर्माण होतो आणि तरीही ती दोघे एकमेकांवर प्रेम असल्याचा निर्वाळा देतच राहतात. सरलेचा मूक त्याग, विनायक भोळेसारख्या ध्येयवाद्याला तिने दिलेली साथ. ‘ध्येय म्हणजे दु:खे’ हे अनुभवत, मुलांच्या, नवऱ्याच्या मृत्यूचे दु:ख सहन करीत तिने नवऱ्याचे कार्य पुढे चालवीत राहणे, या तुलनेत इंदू काळेचे आयुष्य खरे तर तिची जगण्याची जी कल्पना होती त्यापासून खूपच दूर गेलेले असते. शेवटी तिने सरलेला केलेली आर्थिक, भावनिक सहवासाची सोबत तिच्याविषयी पात्रांमध्ये आणि वाचकांचे असणारे गैरसमज दूर करणारी ठरते, पण तिची ‘कला’ (ती विनायकरावांच्या आजारपणात सतार वाजवते) तिची (किल्ली सापडत नसल्याने साडीवर खुलेल असे पोलके न सापडल्याने ती राणीच्या बागेत गेली नाही असे थट्टेच्या स्वरात नारायणराव विनायकरावाला कळवतो) नटण्या-सजण्याची, सुखाचा संसार करण्याची साधी हौस, हे सारे राहूनच जाते. तिची ‘प्रतिमा’ पुढे सुधारली. व्यक्तिमत्त्वाची उंचीही वाढली, पण ‘जगणे’ राहूनच गेले.

तो काळ एकीकडे गांधीवादाचा प्रभाव असलेला आणि दुसरीकडे कला विरुद्ध नीती असा- साहित्यविश्वातले, ‘कलेच्या मागे नीतीचा पोलीस लावू नये’ असे कलावादी मंडळी म्हणत होती. वामन मल्हार ध्येयनिष्ठ आणि नैतिकतेची बाजू घेणारे. त्यांनी ही कादंबरी लिहिताना गांधीवादी विनायकराव आणि त्याची आदर्श पत्नी सरला यांची व्यक्तिमत्त्वे अशा उंचीवर नेऊन ठेवली, की कुसुमावतींसारख्या जाणकार समीक्षकाने ‘सरला, तिच्या जीवनकथेच्या अखेर आयुष्यातील किती तरी गोष्टींना आचवली..’ असे उद्गार काढले आणि इंदू? नटवी, पेटीमास्तरच्या नादी लागलेली, जीवनातले श्रेय न उमगलेली, सरलेच्या तुलनेत सर्वथा डावी. तिचे आयुष्य कसे गेले, कसे उपेक्षेने, प्रवादाने, खाली मान घालून स्वत:च्या वागण्याच्या पश्चात्तापात गेले. हेही वामनरावांनीच रेखाटले आहे, पण तिच्या चित्रणातले हे अंत:प्रवाह कुठेही शब्दांत त्यांनी व्यक्त केले नाहीत. आज काळाने बदललेल्या दृष्टीला ते जाणवत राहातात आणि इंदूला समजून घ्यावेसे वाटते.

प्रभा गणोरकर

prganorkar45@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2018 3:27 am

Web Title: writer vaman malhar joshi book indu kale sarla bhole
Next Stories
1 कालिंदी
2 दुर्गी
3 लेखकांचे मनस्वी स्त्रीचित्रण
Just Now!
X