गर्भधारणेचं नियंत्रण आपल्या हातात असायला हवं असेल तर गर्भनिरोधकांची आपल्याला योग्य आणि पुरेशी माहिती असायला हवी; पण या मुद्दय़ाकडे पाहायला हवं तेवढय़ा गांभीर्याने पाहिलं जात नाही.

मुलांच्या उन्हाळी रजा सुरू होत आहेत. फिरायला, खरेदीला, मौजमजेला सगळे बाहेर पडतात. फिरून फिरून तहान लागते, भूक लागते आणि आपण एखादं रेस्तरां किंवा कॉफी हाऊस शोधतो, मेनुकार्ड बघतो आणि आवडेल ते ऑर्डर करतो. संततिनियमन साधनांसाठी कॅफेटेरिआ अ‍ॅप्रोच काहीसा असाच आहे. म्हणजे उपलब्ध साधनांची माहिती घेऊन आपल्याला सोयीचे वाटेल, हवेसे वाटेल ते साधन निवडणे. संततिनियमन हा फक्त वैद्यकीय उपचार नाही. व्यक्तीच्या अत्यंत खासगी, नाजूक अशा निवडी, निर्णय यांचा तिच्या संततिनियमनविषयक वर्तनावर प्रभाव पडतो.

आणि यात काही महत्त्वाच्या गोष्टी पुढीलप्रमाणे-

पहिली गोष्ट अशी की, भीडेपोटी हे प्रश्न स्त्रिया विचारत नाहीत आणि ही बायकांची जबाबदारी म्हणून पुरुष यात पडत नाहीत. मात्र ते निरोध (कण्डोम) वापरायला तयार नसतात. जोडप्याने एकमेकांच्या पसंतीचा आणि आरोग्याचा विचार करायला नको का?  पण तसे होत नाही. निरोध वापरायचा कसा याबद्दलही अनेक गैरसमज असतात. सर्वात मजेदार गैरसमज आय पिल (इमर्जन्सी गर्भनिरोधक गोळी) बद्दल असतात. अनेक डॉक्टरांचा असा अनुभव आहे की, इमर्जन्सी आली की मित्र, नवरा, फोनवर गोळय़ा किती देऊ? किती वेळा देऊ वगैरे विचारतात. या गोळय़ा फक्त इमर्जन्सी उपाय असतात. त्याचा परत परत वापर धोकादायक ठरू शकतो. कुठलेही औषध असे नाही की, त्याचा अपाय होऊ शकत नाही. या गोळय़ा तर हार्मोन्सच्या आहेत.

दुसरी गोष्ट- आणि ती जरा वादजनक ठरू शकते- ती म्हणजे ही माहिती कोणाकोणाला द्यावी? माझ्या मते सर्व सज्ञान व्यक्तींना आणि गरजेनुसार किशोरवयीन व्यक्तींना ही माहिती सोप्या मार्गाने उपलब्ध झाली पाहिजे. आपल्या समाजात किशोरवयीन मुलामुलींना ही माहिती देण्याबाबत स्पष्टता आणि एकमत नाही. सुरक्षेचे ज्ञान मिळाले की स्वैराचार सुरू होईल, मुले बिघडतील अशी भीती असते. आपल्यातल्या बऱ्याच जणांनी ‘बालक पालक’ पाहिला असेलच. या विषयाचे फारच सुंदर चित्रीकरण केले आहे या चित्रपटात. या वयात किशोरवयीन मुले नवीन भावना, शारीरिक जाणिवांना सामोरी जात असतात. कुतूहल, मैत्रीचे दडपण, प्रेमाचे डोळय़ांवर आलेले पडदे, ती यामुळे सेक्शुअल एक्स्प्लोरेशन करतात. त्यातून जर प्रेग्नन्सी, गुप्त रोग वगैरे समस्या उभ्या राहिल्या आणि त्यांना जर मार्गदर्शन आणि मदतीचा सहानुभूतीपूर्ण हात मिळाला नाही तर त्यांच्या, खास करून मुलींच्या आयुष्याची धूळदाण होते. आपला पॉक्सो कायदा म्हणतो- ‘जर अठरा वर्षांखालील मुलामुलींचा लैंगिक संबंध माहिती असल्यास पोलिसांना कळवणे बंधनकारक आहे; कारण ती मुले स्वत:चे निर्णय घ्यायला असमर्थ असतात व त्यांचे शोषण होत असल्याची शक्यता असते. यात ही मुले पालक आणि समाज यांच्याकडून दंडित होतात. त्याहून मोठा धोका म्हणजे भीतीने ती आपल्याकडे विश्वासाने बोलायचीच बंद होतील ही शक्यता असते.

मी म्हणत नाही की, सरसकट सर्वाना ही माहिती द्यावी आणि मेनुकार्ड त्यांच्यासमारे ठेवावे, पण किशोरवयीन मुलामुलींचे वर्तन, विचारांचा प्रवाह पाहून त्यातील धोका असलेली मुले हेरून त्यांना सल्ला देणे योग्य आहे.

सज्ञान व्यक्तींनासुद्धा हा सल्ला देणे तसे सोपे नाही. कारण स्पष्ट आहे. ज्यांना सल्ला द्यायचा, समुपदेशन करायचे ते बिझी असतात. बायकोने ऐकावे आणि आम्हाला सांगावे! पण एकटय़ा स्त्रीशी बोलून हे यशस्वी होत नाही.

समुपदेशन वैद्यकशास्त्रात शिकवले जात नाही. तसेच हा त्यांच्या कामाचा भाग नाही, असे बहुतेक डॉक्टर मानतात. खोटं वाटतंय? एकदा ट्राय करून बघा डॉक्टर सेक्शुअल प्रॉब्लेम्सबद्दल कसा सल्ला देतात ते!

तिसरी गोष्ट- माहिती कुठून जमा करायची? अनेक नियतकालिकांतून आपण बरीच आरोग्यविषयक माहिती प्राप्त करतो नाही का? जसे आता वाचतोय ते? पण संततिनियमनविषयक माहिती कोणासाठी, किती सखोल असली पाहिजे? पुस्तक वाचून चविष्ट पदार्थ बनवणे, कलाकृती करणे वेगळे आणि हा उपचार निवडणे वेगळे. यातली अनेक साधने औषधांमध्ये मोजली जातात. जर काही विकार असतील तर ठरावीक साधने वज्र्य असतात. हॉटेलात गेले तरी मधुमेही शुगरफ्री घेतात. हृदयविकार असलेले लोक मीठ बेताने घेतात, केचअप, लोणची, सोडावाले पदार्थ टाळतात. याचाच अर्थ असा की, सेवनाची परवानगी असलेल्या पदार्थातील आवडतील ते घ्या!

लिहिता लिहिता वाटतंय की, विकार हा शब्द वापरणे अतिशयोक्ती आहे; पण त्याशिवाय दुसरा योग्य शब्द नाही. नुकतीच एक पोरसवदा रुग्ण पाहण्यात आली. गरोदर होती म्हणून नाव घालायला आलेली. हृदयाच्या झडपांची शस्त्रक्रिया झाली होती. हॉस्पिटलात आली तेव्हा रक्तस्राव चालू झाला आणि गर्भपात झाला. त्याच्या इलाजासाठी या आजारात दिली जाणारी रक्त पातळ राहण्याची औषधे बंद केली; तर झडपेत रक्त साकळले. जिवावर बेतलेले निभावले आणि पोर बरी झाली. परत दोन महिन्यांत गरोदर होऊन गर्भपात झाला आणि औषधांचे नियोजन करता करता नाकीनऊ आले. अनेक युनिट्स रक्त, सतत रक्ततपासण्या, विविध डॉक्टरांचे सल्ले हे सगळे सरकारी रुग्णालयात होते आहे म्हणून बिचारीला परवडते आहे. या दाम्पत्याने गर्भधारणेआधी आपल्या विकाराची पूर्ण माहिती करून घेतली असती आणि सल्ल्याप्रमाणे पावले उचलली असती तर हा धोका कमी झाला असता का?

ही चर्चा तशी नवीन नाही. फक्त प्रयोजन बदलले आहे. कधी महामार्गालगतच्या गावातून गाडीने जाताना ‘तांबी वापरा’ची जाहिरात पाहिली आहे की नाही?  पोस्ट कार्डवर तर हम दो, हमारे दो अगदी ओळखीचे चित्र होते. या जाहिरातींचे प्रयोजन लोकसंख्या नियंत्रण हे होते. आपल्या आरोग्यसेवेचा महत्त्वाचा घटक- गर्भपातविषयी कायदासुद्धा लोकसंख्या नियंत्रण या हेतूने अस्तित्वात आला. पुढे आरोग्य हा मूलभूत अधिकार मानून सुरक्षित मातृत्वाची चळवळ सुरू झाली. आता इतर आरोग्य सेवांसारखा सुरक्षित गर्भपात सेवा हाही एक अधिकार मानला जातो. गेल्या दशकात काही मजेदार आणि लक्षवेधी जाहिरातींमुळे लैंगिकता, संततिनियमन यांची चर्चा मोकळेपणाने व्हायला सुरुवात झाली.

कॉण्डोम, कॉण्डोम ओरडणारा पोपट, बलबीर पाशा, मनातली भीती डोळय़ांनीच नवऱ्याला बोलून दाखवणारी धास्तावलेली स्त्री या व इतर जाहिरातींनी या विषयाला वाचा फोडली. हे स्वागतार्ह आहे. एका परीने या जाहिरातींनी स्त्रिया आणि पुरुषांचे सबलीकरण झाले. पुरुषांचे सबलीकरण असे आपण म्हणत नाही, पुरुषांवर निर्भय असण्याचं दडपण असतं. खास करून तरुण मुलगे, आपण लय भारी आहोत हे दाखवायला काहीही करतील.

‘जेण्डर’ या इंग्रजी शब्दाला सुयोग्य मराठी शब्द नाही. लिंगभाव म्हणजे पुरुष किंवा स्त्री असल्याने नियोजित आपली कामे, नियोजित सामाजिक व कौटुंबिक भूमिका, या भूमिकेचा भार सेक्शुअलिटीच्या संदर्भात पुरुषांवर थोडा अधिक असतो असे मला वाटते.

यशस्वी गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क्स, रीड द ऑफर डॉक्युमेंट्स केअरफुली हा सल्ला ना? मग, यशस्वी संततिनियमनासाठी आपण निवडलेले गर्भनिरोधक काय आणि कसे काम करते? त्याचे परिणाम आणि दुष्परिणाम कोणते? ते ओळखायचे कसे? हे जाणण्याचे महत्त्व सुज्ञास सांगणे न लगे.

गर्भनिरोधकांच्या मेनुकार्डवर हार्मोन्सच्या गोळय़ा, इंजेक्शने, तांबी, निरोधक अनेक प्रकार उपलब्ध आहेत. या सर्वाबद्दल विस्तृत माहिती येत्या भागात पाहू.
डॉ. पद्मजा सामंत – response.lokprabha@expressindia.com