कमी वजनाची तसंच अकाली प्रसूती झालेल्या मातांची बाळं हे वैद्यकशास्त्रासमोरचे मोठे आव्हान असते. आईच्या गर्भात आणि प्रसूतीनंतर बाहेरच्या जगात अनेक समस्यांशी लढा देणाऱ्या या बाळांना खास मदत करण्यासाठी डॉक्टर्स सज्ज असतात.

नातवाला परीकथा सांगताना थम्बेलिना आणि टॉम थम्ब या गोष्टी वाचल्या. या बाळांची नावे त्यांच्या अगदी छोटय़ा चणीमुळे हाताच्या अंगठय़ावरून ठेवलेली असतात. परीकथा मजेदार असतात. अचंबा, भीती, उत्सुकता या सर्वाची परिणती गोड शेवटात होते. आणि सगळे आनंदी जीवन जगतात. वास्तव असे असते तर? सगळ्या कमी वजनाच्या आणि अकाली जन्मलेल्या बाळांना सुदृढ आरोग्य लाभले तर?

या छोटय़ा शूरवीर बाळांना आईच्या गर्भात आणि प्रसूतीनंतर बाहेरच्या जगात अनेक समस्यांशी लढा द्यावा लागतो. इंग्रजीतली एक अगदी योग्य अशी म्हण आहे, ‘जर्नी थ्रू द बर्थ कनाल इज द मोस्ट डिफिकल्ट जर्नी इन द वर्ल्ड!’ प्रसूतीचा मार्ग हा जगातील सर्वात खडतर मार्ग आहे. आणि सर्व प्राणिमात्रात हा मार्ग सर करण्याची क्षमताही असते. पण अकाली जन्मणारी बाळे अथवा गर्भात कमी पोषण झाल्याने क्षीण, कमी वजनाची बाळे या अग्निपरीक्षेतून सुरक्षित पार पडण्यासाठी त्यांना खास मदत लागते.

पूर्वी या मुलांना लो बर्थ वेट बेबीज (कमी वजनाची बाळे) म्हटले जाई. पण त्यांच्या गर्भकालीन वयानुसार त्यांचे दोन गट असतात. अपूर्ण गर्भाकाळानंतर जन्म झालेली ती प्रीमॅच्युअर (अपरिपक्व) आणि पूर्ण गर्भाकाळानंतर, पण वजन कमी असलेली ती ग्रोथ रिस्ट्रिक्टेड (वाढ खुंटलेली)! या दोन्ही समस्यांची कारणे, प्रतिबंधक उपाययोजना आणि दूरगामी परिणाम वेगळे असतात.

प्रीमॅच्युअर हा शब्द आपण वेळोवेळी ऐकलेला आहे. मॅच्युरिटी- परिपक्वता म्हणजे काय? आणि ती कशी ठरते? प्रसूतिशास्त्रात गर्भकाळ सात दिवसांच्या सप्ताहात मोजला जातो आणि ४० सप्ताहानंतरची प्रसूतीची अपेक्षित तारीख ठरवली जाते. त्याआधी ३ सप्ताह, म्हणजे ३७ सप्ताहानंतर बाळ परिपक्व म्हणजेच बाहेरच्या जगात सुरक्षित जगण्यास सक्षम समजले जाते. या क्षमतेत वजन हा महत्त्वाचा घटक असला तरीही एकाच गर्भकालीन वयाच्या बाळांची वजने आईवडिलांचा बांधा, आईचे काही आजार – प्रीएक्लॅम्प्सिया (प्रेग्नन्सीतला उच्च रक्तदाब), मधुमेह, कुपोषण या घटकांवरून ठरते. बहुधा चांगल्या जोपासनेने आणि निपुण वैद्यकीय आखणी, इलाज यांनी बाळ अपूर्ण महिन्यांचे अथवा कमी वजनाचे असले तरी सुखरूप राहू शकते. आता अकाली प्रसूतीबद्दल चर्चा करू. आईच्या समस्या, आजार यांमुळे नैसर्गिकरीत्या अकाली प्रसूती होऊ शकते. याची काही कारणे म्हणजे, काही प्रकारची इन्फेक्शन्स, गर्भाकालात रक्तस्राव, जुळीतिळी मुले, शारीरिक इजा, गर्भाशयातील काही व्यंग, आईची व्यसने, काही आजार, इ.

आईचा गर्भार अवस्थेतला उच्च रक्तदाब. जर आईच्या जिवास काही कारणांमुळे प्रेग्नन्सी चालू ठेवल्यास धोका असेल तर, वाळ सुटून होणारा रक्तस्राव, गर्भजल अकाली वाहणे, गर्भस्थ बाळ कुपोषित असणे या कारणांसाठी डॉक्टर प्रसूती लवकर करण्याचा निर्णय घेऊ शकतात. जर गर्भजल वाहू लागले असेल तर आई तसेच बाळालाही इन्फेक्शन होऊ शकते. अकाली जन्मामुळे बाळाला मेंदू, हृदय, आतडी फुप्फुसे यांच्या समस्या संभवतात. इकडे आड तिकडे विहीर अशा परिस्थितीत आपल्या टॉम थम्ब आणि थम्बेलिनांना त्यांच्या सुरक्षेसाठी प्रसूतितज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, परिचारिका, थेरपिस्ट यांची मदत लागते. मनुष्यबळाव्यतिरिक्त अतिदक्षता कक्षाचीही आवश्यकता असते. याचा अर्थ अतिदक्षता कक्ष आणि मोठय़ा रुग्णालयांअभावी ही बाळे वाचणारच नाहीत असा होत नाही.

इथे एक महत्त्वाची यशोगाथा सांगावीशी वाटते. डॉ. अभय बंग आणि राणी बंग यांची ‘सर्च’  ही संस्था गडचिरोलीच्या दुर्गम भागात गेली तीस वर्षे कार्यरत आहे. इथे मोठय़ा प्रमाणात गोरगरीब, आदिवासी राहतात. सार्वजनिक आरोग्य सुविधांचा अभाव असताना स्थानिक लोकांना प्रशिक्षण देऊन नवजात बाळांमधली इन्फेक्शन्स व आजार यांवर मात केली आणि नवजात मृत्यूंचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात घटविले.

जेव्हा वर नमूद केलेली लक्षणे आईत दिसतात तेव्हा डॉक्टर सुरक्षित प्रसूतीची आखणी करतात. जर सुसज्ज प्रसूतिकक्षाची सोय नसेल तर ‘इन युटेरो ट्रान्स्फर’ (गर्भस्थ बाळाला आणि आईला सुसज्ज ठिकाणी पाठविणे.) करता येते. या बाळांचे  अवयव; विशेषत: फुप्फुसे मजबूत आणि कार्यक्षम ठेवण्यासाठी आईवर काही औषधोपचार करता येतात. बाळांनाही प्रसूतीनंतर विशिष्ट औषधोपचार, उबदार वातावरण, फीडिंग (पोषण), खास रक्त तपासण्या, सोनोग्राफी, इ.ची गरज लागते.

प्रसुतितज्ज्ञ काळजीपूर्वक बाळाच्या नाजूक अवयवांना इजा होऊ न देता प्रसूती करतात आणि गरजेनुसार बाळ अतिदक्षता विभागात पाठविले जाते. या बाळांच्या त्वचेखालील चरबीचे प्रमाण अपुरे असते आणि ही बाळे स्वत:च्या शरीराचे तापमान नियंत्रित करू शकत नाहीत. खास उबदार काचपेटीत तापमान नियंत्रित करता येते. तुम्ही ‘कांगारू मदर केअर’बद्दल ऐकले आहे का? कांगारू मादी जशी आपल्या पिल्लाला पोटावर असलेल्या कातडी पिशवीत ठेवते तसे कापडाच्या पिशवीत ठेवून बाळाला कांगारू केअर देणाऱ्या व्यक्तिच्या छातीशी बांधले जाते. बाळ आणि कांगारू पालक यांच्या छातीपोटाची त्वचा उघडय़ा आणि एकमेकाला लागून असतात. त्यामुळे बाळाला अंगाची ऊब मिळते. ऊब निर्माण करण्यात बाळाची ताकद वाया जात नाही व रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते. हे काम कोणीही जबाबदार व्यक्ती करू शकते आणि आईला मदत होते. अकाली जन्मलेल्या बाळांना त्यांचे यकृत व चयापचय कमकुवत असल्याने इतरही समस्या येतात. ही बाळे नीट दूध ओढू शकत नाहीत. त्यांचे रक्तात साखरेचे प्रमाण घटले तर त्यांना आकडी येऊ शकते. त्यांच्या दुधाच्या सेवनावर, रोजच्या रक्तशर्करा, वजन, इत्यादीवर काटेकोर लक्ष ठेवावे लागते. जर दूध पिण्यास त्यांना अडचण येत असेल तर आईने पंपाने काढलेले स्वत:चे दूध त्यांना चमचा-वाटी अथवा नाकातून नळीद्वारे द्यावे लागते. या वेळी बाळाला कसे धरायचे, दूध कसे तोंडात सोडायचे याबद्दल परिचारिका, स्तनपान सल्लागार मदत करतात.

अकाली जन्मलेल्या बाळांच्या आतडय़ांचे अंतर्पटल कमकुवत असते आणि त्यांना इन्फेक्शन्स लवकर होतात. स्तनपान आणि फक्त आईच्याच दुधाचे सेवन केलेल्या बाळांना हा त्रास कमी होतो. डब्याच्या दुधाने हा धोका जास्त असतो.

आपली शरीररचना अशी आहे की मेंदू, फुप्फुसे, हृदय असे अवयव हाडांनी बनलेल्या मजबूत कवचात- कवटी, बरगडय़ा, इ. असतात. मज्जारज्जूसुद्धा मणक्यांच्या माळेत सुरक्षित असतो. पण या नाजूक अकाली जन्मलेल्या बाळांच्या कवटीचे हाड पातळ असते. प्रसूतीच्या वेळी निर्माण होणारा दाब, ताण यामुळे या बाळांच्या मेंदूला तसेच मेंदूमधील पोकळीतील रक्तवाहिन्यांना इजा होऊ शकते आणि रक्तस्राव होतो. जर बाळ खूप मलूल राहात असले, दूध पित नसले, खूप तारस्वरात (हाय पीच) रडत असले, त्याच्या टाळूचा भाग फुलला, रक्ताचे प्रमाण घटले तर डॉक्टर डोक्याची सोनोग्राफी वगैरे करतात. ज्या औषधांनी या बाळांची फुप्फुसे सक्षम होतात त्या औषधांनी हा मेंदूतील रक्तस्राव टळायलासुद्धा मदत होते. अकाली जन्मलेल्या बाळांना, जन्मानंतरची कावीळ अधिक होऊ शकते, अ‍ॅनिमिया (पण्डुरोग) होऊ शकतो.

हा वादळी काळ संपला की क्वचित प्रसंगी काही डेव्हलपमेंट डिले (वाढीबरोबर ज्ञानेंद्रियांची कार्यक्षमता उशिराने होणे) हे परिणाम हळूहळू  लक्षात येतात. काही बाळांना श्रवणक्षमता कमी असते. स्नायूंच्या वाढ आणि समन्वयावर परिणाम झाल्याने त्यांच्या उठण्याबसण्यावर, हालचालींवर परिणाम होतो. याला सेरेब्रल पाल्सी म्हणतात. या बाळांना खास प्रशिक्षणाची गरज असते.

जसजसे शास्त्र प्रगत होते आहे, नवनवी साधने उपलब्ध होत आहेत तसतसे अति अकाली उदा. साडेसहा महिन्यांच्या बाळांनाही वाचवता येते. त्यांचे सुकर भविष्य आणि आईवडिलांच्या चिंतांचे निराकरण होणे हे ‘इन युटेरो ट्रान्स्फर’ (गर्भस्थ स्थलांतरण) करून सुसज्ज प्रसूतिगृहात अथवा रुग्णालयात प्रसुती केल्यास शक्य आहे.
डॉ. पद्मजा सामंत – response.lokprabha@expressindia.com