लग्नाच्या हंगामात मेकअपच्या जाड थरांना निरोप देऊन नैसर्गिक सौंदर्य असलेल्या त्वचेचं स्वागत करा. लग्नाच्या बेडीतील प्रत्येक  वधूसाठी तिच्या लग्नाचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो. अशा विशेष दिवशी प्रत्येक वधूला आपल्या नितळ त्वचेच्या जोरावर सर्वाधिक ग्लॅमरस दिसायचं असतं.
लग्नाचा हंगाम जवळ आला की कर्तव्य असणारी प्रत्येक मुलगी सौंदर्यतज्ज्ञांकडे धाव घेते. कारण तिला आपलं सौंदर्य खुलवणाऱ्या टिप्स हव्या असतात. आपल्या लग्नाच्या दिवशी आपण स्पेशल दिसलं पाहिजे, असा ध्यास तिने घेतलेला असतो. भारतीय लग्नांमध्ये श्रीफळ अर्थात नारळाला अनन्यसाधारण महत्त्व असतं. याच नारळाच्या गुणवैशिष्टय़ांचा वापर लग्नापूर्वीच्या त्वचेच्या खास संवर्धनासाठीही करता येईल. आपल्या नेहमीच्या सौंदर्याराधनेत नारळाचा वापर करून वाग्दत्त वधू आपली त्वचा अधिक चमकदार बनवू शकते.

*टिप्स

० दररोज नारळ हे प्राथमिक आणि प्रमुख घटक असणारं मॉइश्चरायझर त्वचेला लावावं. त्यामुळे त्वचा मऊ आणि चमकदार बनेल. बरीच बॉडी लोशन्स इतर लॉकिंग घटकांचा वापर करून त्वचेतली आद्र्रता टिकवून ठेवतात.

० त्वचेतल्या नैसर्गिक घटकांशी मिळतेजुळते घटक नारळात असतात. म्हणजे त्वचेतले जे घटक हरवले आहेत ते आपण पुन्हा त्वचेला परत देतो. नारळामुळे मॉइश्चरायझर्स त्वचेच्या चार थरांपर्यंत आत खोलवर झिरपतात, ज्यामुळे त्वचा मऊ बनते आणि तिच्यातली आद्र्रता दिवसभर टिकून राहते.

० आंघोळीच्या बादलीभर गरम पाण्यात खोबरेल तेलाचे थोडे थेंब टाकावेत यामुळे त्वचा मऊ बनते व योग्य ते पोषणही मिळते.

० कोपर आणि ढोपराची त्वचा खरखरीत असणं ही सर्वसामान्य तक्रार असते. कारण या ठिकाणी मृत त्वचा साठत असते. ब्लाऊजच्या खाली असणारी कोपराची त्वचा रूक्ष दिसते. लग्नाच्या दिवशी त्वचा अशी कुरूप दिसू नये यासाठी नियिमतपणे बॉडी स्क्रबिंग तसंच मॉइश्चरायझेशनही करावं. त्वचेची आद्र्रता हरवत असल्याने तिथे मृत त्वचेचे थर जमू लागतात. हा त्रास टाळायचा असल्यास तिथली त्वचा स्वच्छ ठेवावी आणि त्या त्वचेला पोषण पुरवावं.
लिंबाचा रस आणि खोबरेल तेल एकत्र करून त्वचेला लावावं. लिंबाचा अर्धा चमचा ताजा रस काढून त्यात एक टी-स्पून खोबरेल तेल मिसळावं. हे मिश्रण कोपराला वावावं. ते १५ मिनिटं ठेवून नंतर धुवावं.

० खोबरेल तेल किंवा दूध हा प्राथमिक आणि महत्त्वाचा घटक असणाऱ्या मॉइश्चरायझरला साखर, मध किंवा लिंबाच्या रसाची जोड देऊन त्वचा नैसर्गिकरीत्या उजळवता येते. त्वचेचे काळवंडलेले भाग उजवळण्यासाठी मोहरीच्या तेलाचाही वापर करता येतो. त्यात खोबरेल तेल मिसळल्यास आणखी उत्तम..

घरात लग्नकार्य म्हटल्यावर त्या घराला एक वेगळंच रूप येतं. प्रत्येक जण सतत काही ना कामात असतं. या धावपळीत त्वचेची काळजी घेणं त्याचबरोबर इतर अनेक गोष्टींकडे आपण सर्रास दुर्लक्ष करतो. ऐन लग्नाच्या काही दिवस आधी मग केवळ ब्यूटी पार्लरला भेट दिली की झालं, असं एक समीकरण आजही आपल्याला दिसत आहे. परंतु लग्नाच्या केवळ दोन दिवस आधी ब्यूटिशियनला भेट देण्यापेक्षा लग्नाच्या आधीचे काही महिने सौंदर्याबाबत आपण जागरूक असायला हवं.