आपल्या प्राचीन संस्कृतीत घोडय़ाचे स्थान घोडबंदर रोडइतकेच महत्त्वाचे आहे. समुद्रमंथनातून उच्चैश्रवा नावाचा घोडा समुद्रातून वर आला. तो हॉर्स- फिश नावाचा मासा होता, पाणघोडा होता की पाण्यात बुचकळून काढलेला जमीनघोडा होता, यावर संशोधन चालू आहे. पण आजच्या घोडय़ाचा पूर्वज तोच. तिथपासून विविध देवदेवतांचे वाहन होत होत पुढे विविध डाकूंचे वाहन अशी त्याची घोडदौड अगदी गेल्या शतकापर्यंत चालू होती! ‘जंजीर’ या चित्रपटात श्री. अ. ह. बच्चन यांच्या स्वप्नात त्याने थैमान घातले. तो त्याचा शेवटचा स्वतंत्र पराक्रम. त्यानंतर चित्रपटात कामे मिळवून त्याने काही काळ गुजराण केली. नंतर घोडय़ावर बसू शकतील असे देव राहिले नाहीत व डाकूही! असा हा देदिप्यमान इतिहास असलेला प्राणी आज राहिला आहे फक्त भाषेपुरता. घोडनवरी, घोडामैदान, घोडेबाजारपासून घोडा म्हणजे पिस्तुले इथपर्यंत त्याचा प्रवास झाला आहे. घोडय़ाला अशा वाईट अर्थाच्या शब्दांमध्ये कुठल्या घोडय़ाने गोवले ते पाहिलेच पाहिजे!
घोडा घोडा खेळणे हा एक मोठा कार्यक्रम असे. घरच्या मोठय़ा माणसांनी लहान मुलांशी मैत्री करण्याचे एक प्रमुख साधन म्हणजे ‘घोडा घोडा’ हा खेळ. जोपर्यंत लहान मूल मोठय़ांच्या पाठीवर स्वार होत नसे तोपर्यंत त्यांची नाळ जुळत नसे! मात्र, खेळाचे नाव ‘घोडा घोडा’ असूनही त्या मैत्रीचे श्रेय घोडय़ाला मिळत नसे. पण पुढे तेच मूल तरुण झाल्यावर पैसे लावून वेगळ्या प्रकारचा ‘घोडा घोडा’ खेळत सुटे तेव्हा मात्र त्याच्या अध:पतनाचे श्रेय घोडय़ाला जात असे! मनुष्यप्राणी अशा रीतीने फक्त घोडय़ालाच वाईट वागवतो असे नाही, इतरही प्राणी त्याच्या तडाख्यात सापडतात.
आपली भाषा केवळ घोडय़ाचाच अपमान करून थांबत नाही. गाढव, डुक्कर, कुत्रा ऊर्फ कुत्तरडा इत्यादी प्राणी शिव्या म्हणून वापरले जातात. मुलांना कोंबडा होण्याची शिक्षा दिली जाते. एखाद्याचा खिमा करण्याची धमकी दिली जाते. रिकामटेकडय़ांना ‘अंडी उबवत होते’ म्हटले जाते. कुणाची ‘गेलास उडत’ म्हणून हेटाळणी केली जाते. उर्मट माणसांना ‘शिंगे फुटली का?’ असे विचारले जाते. अशा अनेक प्राणी व प्राणिजन्य शब्दांना अपमान म्हणून वापरले जाते. आपल्याकडे विष्णूचे अवतार म्हणून मासा, कासव, डुक्कर हे प्राणी भाव खाऊन गेले. पण पुढे माणसाने त्यांना खाण्यासाठी चढा भाव दिल्याने त्यांनाच पळता भुई थोडी झाली! या पौराणिक प्राण्यांमध्ये नाग, साप व गरुड यांचाही मोठा इतिहास आहे. एकीकडे थेट देवत्वाचा कळस, तर दुसरीकडे त्यांच्या होणाऱ्या शिकारीची दरी- अशा विचित्र कात्रीत हे प्राणी अडकले आहेत.
असे असूनही इसापनीती व पंचतंत्र या ग्रंथांतील प्राण्यांनी माणसांना तत्त्वज्ञान शिकवण्यासाठी खूप खस्ता खाल्ल्या आहेत. हजारो वर्षे या पुस्तकांतील बगळे, कोल्हे, सिंह, उंदीर, सुसर माणसांना शहाणे करण्यासाठी विविध प्रसंगांतून गेले आहेत; जात आहेत. अपकारांची फेड त्यांनी उपकारांनी केली आहे. गेली हजारो वर्षे तेच माकड त्याच सुसरीच्या तोंडात इमानेइतबारे मरता मरता वाचत आहे. माशानी भरलेली चोच उघडण्याचा मूर्खपणा कावळे वारंवार करत आहेत. कबुतरे पारध्याच्या जाळ्यात अडकून नेमाने ते जाळे उडवून एकीचे बळ दाखवत आहेत. सशाच्या युक्तीला सिंह बळी पडण्याची सुतराम शक्यता नसूनही वर्षांनुवर्षे त्याच विहिरीत जीव देऊन टाकण्याचे बेअकली कृत्य तो करतो आहे.. केवळ आपल्याला अक्कल यावी म्हणून!
मात्र, आपल्याला अक्कल आली नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्या प्राण्यांचे बलिदान आपण वाया घालवले. आता ती पुस्तके अपडेट करण्याची वेळ आली आहे. आज काही वेगळे प्राणी आपल्याला काही वेगळे धडे देत आहेत, देऊन गेले आहेत. आणि म्हणूनच आज आम्ही हे प्राणीविषयक चिंतन प्रकट करत आहोत.
आता हा खंडय़ा नावाचा पक्षी पाहा. मूर्ती लहान- कीर्ती महान. खूपच चमकदार व रंगीबेरंगी. हे पक्षी उडण्यासाठी प्रसिद्ध नाहीत, तर दिसण्यासाठी प्रसिद्ध आहेत. मासेमारी हा त्यांचा पिढीजात धंदा. खरे तर निसर्गातील पक्षी-प्राणी नेमून दिलेले अन्न खातात. हरीण कधी सापाला तुडवून त्याचे उंदीर खात नाही की गरुड पोपटाचा पाठलाग करून त्याची मिरची पळवत नाही. पण दुष्काळ व इतर कारणांनी आता अनेकांचे म्युटेशन होत आहे. या संक्रमित प्राण्यांची दखल घ्यावी लागेल व त्याप्रमाणे आपले ठोकताळे परत एकदा तपासून घ्यावे लागतील; त्या ठोकताळ्यांचेही म्युटेशन करावे लागेल. तर हा खंडय़ा ऊर्फ किंगफिशर अर्थात राजमासेमार उडण्यासाठी प्रसिद्ध कधीच नव्हता. पण दुष्काळामुळे जमिनीचे तापमान वाढल्याने तो अधिक काळ हवेतच राहू लागला. त्याचे पंख बळकट होऊ लागले, ‘एक्स मेन’मधील वोल्वरीनसारखी नखेही वाढली. नद्याच उरल्या नाहीत तर त्यात मासे कुठून असणार? त्याने मासेमारी सोडली. मधून मधून थंड पेये पिऊन तो सव्‍‌र्हाइव्ह होऊ लागला. अखेर जमिनीसारखेच हवेचेही तापमान वाढले तेव्हा त्याने थंड प्रदेशात स्थलांतर केले. दिसण्यासाठी प्रसिद्ध असणारा हा सुरेख पक्षी आता दिसेनासा झाला आहे. आता हा पक्षी फक्त जुन्या डॉक्युमेंटरीज्मध्येच दिसतो. जेव्हा जेव्हा तो दिसतो तेव्हा ती ब्रेकिंग न्यूज बनते. सर्व वाहिन्या या अदृश्य झालेल्या पक्ष्याची दखल घेतात. प्रसिद्ध पक्षीतज्ज्ञांनासुद्धा हा खंडय़ा माहीत नव्हता. आता मुळात तो ‘किंग’ तर नाहीच, ‘फिशर’ही राहिला नसून त्याचे नाव बदलावे असा प्रस्ताव आला आहे. तात्पर्य- कोरडय़ा पडलेल्या पात्रात मासे अंडी देत नाहीत!
उत्तरेच्या वनात एक पांढरा हत्ती आला. आला तो एक सायकल चालवत आला! त्याच्या त्या कौशल्याने सर्व प्रभावित झाले. पूर्वी तो एका सर्कशीत काम करीत असे. सर्कस बंद पडली व तो हत्ती वनात पोहोचला. पण त्याने सायकलीवर स्वार होणे सोडले नाही. त्याची प्रसिद्धी झाली. वाघ-सिंहाऐवजी त्यालाच वनाचा राजा केले गेले. पण हत्तीचा आहार आपल्याला माहीत आहेच. त्याला खूप खायला लागे. वनस्पती संपू लागल्या. मग त्या हत्तीचेही म्युटेशन झाले. तो मांसाहारी बनला. प्राणीही संपू लागले. खरे तर हा हत्ती सामान्य प्राण्यांचा प्रतिनिधी! पुढे तो असामान्य प्राण्यांचा प्रतिनिधी बनला. कारण मुळात त्या वनातील सर्व प्राणीच असामान्य बनले. मात्र, शेवटी झाले असे, की हत्ती खूप फुगला खाऊन खाऊन व स्वत:चे वजन सहन न होऊन पाय मोडून पडला. आता हत्ती नाही, तर त्याची सायकल वनाची राणी बनली! तात्पर्य- वनातील तलावात कमळे हवीच!
आपल्याकडे दंडकारण्यात एक वाघ आला. आता मुळात वाघ हा एन्डेंजर्ड प्राणी असल्याने त्याची शिकार कोणी केली नाही. पण गेली अनेक वर्षे त्याच्या संवर्धनाचे अनेक प्रयोग होऊनसुद्धा त्याची वाढ झाली नाही. कधी कधी त्याला हातांनी गोंजारले, कधी हौसेने वाघाला घडय़ाळ बांधून लाड केले गेले; पण त्याचा टाइम खराबच निघाला. काही राखीव जंगले त्याला वावरण्यासाठी दिली; पण यश आले नाही. मध्यंतरी पाच वर्षे त्याचा दरारा उत्पन्न झाला, पण तरीही तो जंगलचा राजा होऊ शकला नाही. मधेच गुजरातचा सिंह आला आणि त्याच्या आयाळीमुळे तोच आकर्षक वाटला. तात्पर्य- प्राण्यांच्या वाहतुकीसाठी रेल्वे इंजिन वापरावे!
असे पाहा की, समस्यांचे मूळ काम म्हणजे असणे! हिंदुस्थान-पाकिस्तान असो की प्राणिस्तान; समस्या सगळीकडेच आहेत. देशापुढील सर्वात मोठी समस्या कोणती, याची विविध उत्तरे आहेत. प्रत्येक पक्षाची वेगवेगळी उत्तरे आहेत. उदाहरणार्थ, भाजप आणि काँग्रेस एकमेकांना ‘आप ही है समस्या!’ असे म्हणत असतात. काहींच्या मते, भ्रष्टाचार ही मुख्य समस्या; तर काहींच्या मते- तो पकडला जाणं, ही! या सर्व मानवी खेळामध्ये प्राण्यांच्या समस्यांकडे कोणाचे लक्ष नव्हते. परवा त्या शक्तिमान घोडय़ाचा पाय मोडला, त्यानिमित्ताने त्यांचा प्रश्न ऐरणीवर आला. मग तो पाय कोणी मोडला, याची जोरात व मोठय़ा आवाजात चर्चा होऊ लागली. आज प्रत्येक समस्या व त्यावरील उपाय भाजप आणि काँग्रेस या दोन गटांत विभागले जातात. प्रत्येक समस्येला एकतर या दोघांपैकी कोणीतरी जबाबदार तरी असते, किंवा त्यावरील उपायही हेच दोघे असतात! आणि प्रकांड पत्रकारांची प्रगल्भता काय विचारावी! मुळात मानवासारख्या हिंस्र प्राण्यांचे मोर्चे वगैरे नियंत्रित करण्यासाठी शाकाहारी घोडय़ांना घेऊन कशाला जायला हवे, हे कुणीच विचारले नाही!
परेश मोकाशी  lokrang@expressindia.com