25 February 2021

News Flash

संगीत नाटकांचा (पुण्य)प्रभाव!

उत्तम शब्द आणि त्यातील भावाला अनुसरून स्वररचना, हे नाटय़संगीताचे पहिले लक्षण.

(संग्रहित छायाचित्र)

मुकुंद संगोराम

राम गणेश गडकरींच्या ‘पुण्यप्रभाव’ या संगीत नाटकाचे कथानक कदाचित नाही आठवणार; पण ‘नाचत ना गगनात नाथा’ हे त्यातील पद, पं. जितेन्द्र अभिषेकींच्या आवाजात अनेकांच्या कानी आजही गुंजते! संगीत नाटकाच्या महाराष्ट्रीय परंपरेने ब्रजभाषेतील बंदिशी व कर्नाटक संगीताची लय यांतून ‘नाटय़संगीत’ हा प्रकार रुजवला आणि चित्रपटगीते, भावगीतांनाही वाट मोकळी करून दिली..

स्वातंत्र्यापूर्वीचा पाच दशकांचा काळ भारतीय संगीतासाठी अक्षरश: अभूतपूर्व म्हणावा असा. त्याआधीच्या शतकाच्या शेवटाला, म्हणजे ३१ ऑक्टोबर १८८० रोजी पुण्यातील आनंदोद्भव नाटय़गृहात किर्लोस्कर नाटक मंडळीने सादर केलेल्या ‘संगीत शाकुंतल’ या संगीत नाटकाने अभिजात संगीताचे ललितसुंदर रूप रसिकांसमोर सादर केले आणि या नव्या कला प्रकाराने लोकप्रियतेची कमाल उंची गाठली.

बालगंधर्व, केशवराव भोसले, मा. दीनानाथ यांच्यासारख्या अतिशय सुरेल, तरल आणि अभिजात कलावंतांनी या संगीत प्रकाराला चार चाँद लावले. पारशी रंगभूमीने सादर केलेले ‘इंद्रसभा’ हे नाटक पाहून अण्णासाहेब किर्लोस्करांनी प्रेरणा घेतली असली तरीही त्यांनी ‘शाकुंतल’चे सगळे रूपच पालटवून टाकले. बोलता बोलता साभिनय गायन ही कल्पना तेव्हा नवी होती आणि तरीही रसिकांना अभिनयाकडे लक्ष द्यावे की गायनाकडे, असा प्रश्न पडला नाही. वसंत शांताराम देसाई यांनी याचे वर्णन करताना रसोत्कर्षांसाठी संगीत हे मराठी संगीत रंगभूमीचे ध्येय आहे, असे स्पष्ट विधान केले आहे. त्यापूर्वी विष्णुदास भावे यांनी तीन बाजूंना साधे कापडी पडदे टांगून ‘नाटक’ म्हणून जो काही खेळ उभा केला, तो सारा प्रकार ‘न मिळे मौज पुन्हा पाहण्या नरा’ अशा रूपांचा चमत्कृतींसह वाटचाल करणारा आनंदच म्हणावा लागेल!, हे सीताकांत लाड यांचे विधान महत्त्वाचेच म्हणावे लागेल. (लाड हे आकाशवाणीवर संगीत निर्माता होते आणि संगीताचे मर्मज्ञ जाणकार होते.) पहिले नाटक सादर झाले १८४३ मध्ये आणि अण्णासाहेबांचा जन्मही त्याच वर्षांतला. नाटक या प्रकारासाठी प्रथमच रंगमंच आणि समोर प्रेक्षक बसू शकतील असे प्रेक्षकगृह ही संकल्पना अस्तित्वात आली. तोपर्यंतच्या भारतीय संस्कृतीमधील रंगमंच मध्यभागी आणि प्रेक्षक गोलाकार बसलेले, अशीच कल्पना होती.

त्यामुळे गायनकला सादर करण्याची रीतही बव्हंशी तशीच. तीन बाजूला कापडी पडदे लावून एक सभागृह तयार करण्याची विष्णुदास भावे यांची कल्पना नंतरच्या काळात अधिक नेटकी झाली आणि रंगमंदिर, त्याची व्यवस्था आणि त्याचे व्यवस्थापन हा एक नवाच विषयही पुढे आला. संगीत रंगभूमीने नाटय़वस्तूला महत्त्व दिले की संगीताला, या विषयावरील वाद अद्यापही संपलेले नाहीत. नाटक या संकल्पनेत अभिजात संगीताचा झालेला हा प्रवेश अनेकार्थाने महत्त्वाचा ठरला. संगीत सामान्यांपर्यंत पोहोचण्याची सोय झाली आणि शब्द-संगीताचा एक सुरेख संकर घडून आला. अभिजात संगीतातील बंदिशींमध्ये साहित्य किती, याबद्दलही हिरिरीने वाद सुरू असतातच. प्रत्यक्षात या बंदिशींमधील स्वरवाक्ये वापरूनच नाटय़संगीताची उभारणी झाली. असे करताना अण्णासाहेब किर्लोस्करांनी एक महत्त्वाची गोष्ट केली, ती म्हणजे ब्रजभाषेतील या बंदिशींमधील अभिजात संगीताला त्यांनी मराठी वळण दिले. ती नाटय़गीते मूळच्या बंदिशींचे रूप घेऊन समोर येताना त्यातील मराठी मातीचाच सुगंध रसिकांपर्यंत पोहोचला पाहिजे, हा त्यांचा अट्टहास अतिशय महत्त्वाचा आणि नंतरच्या काळात येऊ घातलेल्या भावगीत, चित्रपटगीत या संकल्पनांना जन्म देणारा! एकोणिसाव्या शतकाच्या अखेरच्या दोन दशकांत संगीत नाटक महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात गाजू लागले. विसाव्या शतकाच्या पहिल्या तीन दशकांत तो एक अतिशय मानाचा, प्रतिष्ठेचा आणि क्वचितप्रसंगी नफ्यातलाही व्यवसाय झाला. संगीतातील मूठभरांची सद्दी संपण्यासाठी हे फारच उपकारक ठरले.

संगीत नाटकांमुळे दरबारातील संगीत लोकांपर्यंत पोहोचले, त्यामध्ये त्यांना रुची निर्माण झाली; हे या नाटकांना मिळालेल्या अभूतपूर्व यशाचे थेट फायदे. त्याबरोबरच संगीत म्हणजे भिकेचे डोहाळे असे मानणाऱ्या समाजात संगीताला ऊर्जितावस्था प्राप्त झाली. गायन करणारे कलावंत सामाजिक उतरंडीमध्ये अतिशय खालच्या स्तरावरून एक पायरी तरी वर आले. त्याच काळात विष्णु दिगंबर पलुस्करांसारखा योगी कलावंत उत्तमातील उत्तम वेश परिधान करून प्रवास करत असे. संगीतकारांना त्या काळात मिळणाऱ्या वागणुकीला त्यांचे हे उत्तर होते. पण म्हणून सगळी परिस्थिती लगेच बदलली असे झाले नाही. परंतु त्या दिशेने वाटचाल तरी सुरू झाली. संगीत नाटक ही मराठी समाजाची संगीताला दिलेली मौल्यवान देणगी. ज्यांच्या कल्पनेतून तिचा प्रारंभ झाला ते अण्णासाहेब किर्लोस्कर कर्नाटकातून आलेले. त्यांनी मराठी मनांत हे संगीताचे वेड पेरले आणि एका नव्या नांदीलाही सुरुवात केली. दक्षिणेकडील भारतात गायले जाणारे संगीत ‘कर्नाटक संगीत’ म्हणून ओळखले जाते. उत्तर हिंदुस्तानी संगीतही आपला आब राखून होतेच, कारण त्या काळातील सगळ्या संस्थानिकांमध्ये संगीताची आवड होती. त्यामुळे त्या संगीताची भरभराट होण्यास मदत झाली. आताचा महाराष्ट्र या दोन्ही संगीत प्रणालींच्या मध्यभागी असलेला. उत्तरेकडील कलावंतांसाठी महाराष्ट्र दक्षिणेत गणला जाई, तर कर्नाटक संगीतातील कलावंतांसाठी महाराष्ट्र उत्तर हिंदुस्तानी संगीताकडे झुकलेला. अशा अवस्थेत किर्लोस्करांनी शब्दस्वरांच्या संकराबरोबरच हिंदुस्तानी आणि कर्नाटक संगीताचाही अतिशय सुंदर संकर घडवून आणला. संगीत नाटकातील साक़ी, दिंडी यांसारख्या प्रकारांना कर्नाटक संगीतातील चाली देऊन किर्लोस्करांनी एक नवा प्रयोग घडवून आणला. त्यापूर्वीच्या भाव्यांच्या नाटकातही कर्नाटक संगीतातील रागांवर आधारित संगीत होतेच. भावे सांगलीचे, त्यामुळे त्यांचा उत्तर कर्नाटकातील संगीताशी परिचय होताच.

उत्तम शब्द आणि त्यातील भावाला अनुसरून स्वररचना, हे नाटय़संगीताचे पहिले लक्षण. नट वा नटीने संवाद म्हणत असतानाच उभे राहून गायन करणे, हा प्रकार तेव्हा रूढ नव्हता. संगीताच्या मैफलींमध्ये कलावंताने बसून गाण्याचाच प्रघात होता. बसून गायन करण्याने स्वरांवरील हुकमत अधिक नेटकेपणाने साधता येते, असे आवाज साधना करणाऱ्या अभ्यासकांचे आणि कलावंतांचे मत होते. भारतीय संगीत बसून गाण्यासाठीच आहे, असे मत व्यक्त करताना शरीररचनाशास्त्राचेही अनेक दाखले परंपरा उलगडणाऱ्यांनी सांगितले. त्यामुळेच या परंपरेला छेद देत संगीत नाटकातील गायक नटांनी उभे राहून अभिजात संगीताचे गायन करण्याची नवी पद्धत रूढ झाली, ती नाटकाची गरज म्हणून. या नाटकातील पदे कथानकाला पुढे नेण्यासाठी असल्याने ती बसून गाणे शक्यच नव्हते. कलावंताला असे उभे राहून साभिनय गायन करायला लावण्याशिवाय पर्यायही नव्हता. त्यामुळे शौर्य गाजवणारा शौर्यधर रंगमंचावर येऊन तलवारीच्या म्यानावर हात ठेवून थेट ताला-सुरात नाटय़गीत गाऊ लागला. नाटकातील पात्रांच्या स्वगतासाठी जशी पदांची रचना होती तशीच, संवादही स्वरमय होण्यासाठी पदे होती. या संगीतातून शब्द आणि अर्थ समजणे ही निकडीची गरज होती. शब्द न समजता केवळ स्वर रसिकापर्यंत पोहोचणे ही कथानकाची हानी करणारी गोष्ट होती. त्यामुळे शब्दांच्या भावार्थाला अनुसरून गायन करणे, ही पहिली आणि त्यात भावोत्कर्ष निर्माण करणे ही दुसरी अट. अभिजात संगीतातील गायनात या अटी पाळण्याची सक्ती कोणत्याच कलावंताने फारशी मनावर घेतलेली नव्हती. तशी गरजही कदाचित त्यांना वाटत नसावी. त्यानंतरच्या काळात म्हणजे विसाव्या शतकाच्या तिसऱ्या दशकात मराठी भावगीताच्या जन्मासाठी या नाटय़संगीतातील अटींचा फारच उपयोग झाला.

मराठी प्रेक्षकांना तरी असे रंगमचावर अचानक येऊन गायन करणाऱ्या कलावंतांबद्दल आश्चर्य वाटत नव्हते. पुढे चित्रपटांतही संवाद सुरू असताना, मध्येच ते पात्र गायन करू लागले, तेव्हाही प्रेक्षकांना आश्चर्य वाटले नसणार. जगातील अन्य देशांमधील चित्रपटांमध्ये पात्रांच्या तोंडी गाणी घालण्याची पद्धत नव्हतीच. चित्रपटांचे असे भारतीयीकरण होण्यास संगीत नाटकांनीही हातभार लावला खरा !

रागदारी संगीताच्या चौकटीत राहूनही ललितसुंदर पद्धतीने संगीत निर्माण करणाऱ्या मराठी संगीत नाटकाने अगदी सत्तरच्या दशकापर्यंत अनेक नवनवे प्रयोग केले. त्यातील शेवटचे बिनीचे शिलेदार पंडित जितेंद्र अभिषेकी. नाटय़ संगीताला नवी झळाळी प्राप्त करून देणारे अभिषेकीबुवा हे आग्रा घराण्याचे ज्येष्ठ कलावंत. त्यांनी अभिजात संगीताच्या क्षेत्रात गाजवलेली कामगिरीही अतिशय महत्त्वाची. संगीत नाटकाची पुनर्बाधणी होत असताना, त्यांनी दिलेले योगदान म्हणूनच मोलाचे. चित्रपटांच्या आगमनानंतर संगीत नाटकांना लागलेली ओहोटी काही प्रमाणात तरी रोखता आली..

.. एकविसाव्या शतकात जन्मलेल्या आणि आता युवावस्थेत असलेल्यांना या संगीत नाटकांबद्दल काय वाटत असेल, हाही म्हणूनच कुतूहलाचा विषय.

mukund.sangoram@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 6, 2021 12:06 am

Web Title: article on effect of musicals virtue abn 97
Next Stories
1 नवनिर्माणाचे ध्यासपर्व
2 लागलीसे आस..
Just Now!
X