मुकुंद संगोराम

स्वातंत्र्यपूर्व काळ हा ध्वनिमुद्रणाचा उदयकाळ, संगीत नाटकांचा उत्कर्षकाळ आणि भारतीय संगीतात नवनवे प्रयोग होण्याचाही काळ! परवशतेचा पाश गळ्याला लागलेला असतानाही हा नवनवलश्रवणोत्सव कसा काय शक्य झाला?

महाराष्ट्रातील संगीत नाटकाने विसाव्या शतकाच्या प्रारंभी आपला झेंडा देशभर मिरवला. ज्या काळात रागदारी संगीताच्या क्षेत्रात उस्तादी गायक-वादक कलावंतांची मांदियाळी आपल्या कलेने अभिजात संगीतात मोलाची भर घालत होती, त्याच काळात अनेक पंडित कलावंतांनीही देशभर आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर ग्वाल्हेरास जाऊन संगीत विद्या मिळवून परत महाराष्ट्रात आले, तसे पुण्याहून केवळ संगीत शिकण्यासाठी गेलेले परांजपेबुवा मात्र परत आले नाहीत. ते त्या भागातील अनेक संस्थानांमध्ये राजगवई म्हणून साधना करीत राहिले. देवजीबुवा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या कलावंताला, त्या काळात केवळ कलेमुळे मोठा मान होता. संगीत नाटक रसिकांच्या गळ्यातील ताईत बनलेले असतानाही या सगळ्या कलावंतांनी त्यात प्रत्यक्ष सहभाग न घेण्याचा निर्णय घेतला. भास्करबुवा बखले यांच्यासारख्या मैफली गवयाने मात्र संगीत नाटकांमध्ये जी चमक आणली, ती कमालीची होती. जेव्हा स्त्रीला नाटकांमध्ये काम करायची संधी नाकारली जात होती, तेव्हा कमलाबाई गोखले यांच्यासारख्या स्त्री कलावंताने रंगभूमीवर काम करण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु काळच असा, की त्यांना स्त्री भूमिकेऐवजी पुरुष भूमिका करण्याची सूचना करण्यात आली. महात्मा जोतिबा फुले यांनी सुरू केलेल्या स्त्री शिक्षणाच्या चळवळीतून झालेल्या क्रांतीचे परिणाम हळूहळू होत होते, याचे हे निदर्शक. पण तरीही याच चळवळीमुळे स्त्री कलावंतांबद्दल समाजात आदरभाव निर्माण होऊ  लागला होता. त्याचे पहिले दर्शन १९१९ मध्ये रंगभूमीवर आलेले आणि लोकप्रियतेचे शिखर गाठलेले ‘एकच प्याला’ हे संगीत नाटक. राम गणेश गडकरी आणि बालगंधर्वाची मोहिनी शिगेला पोहोचलेली आणि त्यातच अभिजाततेने नटलेल्या सुमधुर नाटय़गीतांनी या नाटकाला कमालीची झळाळी प्राप्त करून दिली.

बाई सुंदराबाई हे या नाटकाच्या संगीत रचनाकाराचे नाव. या नाटकासाठी राम गणेशांनी पदे लिहिली नव्हती, म्हणून वि. सी. गुर्जर यांच्याकडून ती लिहून घेण्यात आली. त्यातील सिंधू (बालगंधर्व)च्या तोंडी असलेल्या पदांच्या चाली सुंदराबाईंनी दिल्या. त्या नभोवाणीवरील कलावंत होत्या. सुंदराबाई जाधव यानी त्या काळात रूढींविरुद्ध दिलेला लढा असामान्य म्हणावा असा. मैफलीत मध्यभागी बसून अभिजात संगीत सादर करायची संधी स्त्री कलावंताला मिळण्यास तेव्हाही अवकाश नव्हताच. सुंदराबाई यांना अभिजात संगीतातील मानाचे पान ठरायलाही त्यामुळे काही काळ जावा लागला. विसाव्या शतकाचा प्रारंभच मुळी तंत्रज्ञानाच्या आविष्काराने झाला. भारतीय कलांच्या अवकाशात ध्वनिमुद्रण या तंत्रज्ञानाचा आणि चित्रपट या तंत्राधारित कलेचा प्रवेश याच काळातला. त्याचे दूरगामी परिणाम त्याच्याशी निगडित असलेल्या संगीतावर होणे स्वाभाविकच होते. अगदी पहिल्या दशकाच्या प्रारंभीच भारतात ध्वनिमुद्रणाचे तंत्रज्ञान अवतरले. संगीत नाटकांची लोकप्रियता शिखरावर असताना आलेल्या या नवतंत्रज्ञानाने त्या काळातील सगळ्या कलावंतांचे आवाज साठवून ठेवता आले. भारतातील संगीताची महती ब्रिटिशांच्याही लक्षात आली होती. त्यामुळे गौहरजान (१८७३-१९३०), जोहराबाई आग्रेवाली (१८६८-१९१३) यांच्या ध्वनिमुद्रणाने तेव्हा हाहाकार उडाला होता.

बालगंधर्वासारख्या लोकप्रिय कलावंताच्या ध्वनिमुद्रिका तर व्यावसायिक नफा मिळवून देणाऱ्या. त्या काळातील बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर, त्यांचे शिष्योत्तम विष्णु दिगंबर पलुस्कर, भास्करबुवा बखले, जयपूर घराण्याच्या शैलीचे अध्वर्यू उस्ताद अल्लादिया खाँ, यांच्यासारख्या दिग्गजांचे गायन ध्वनिमुद्रित न होणे, हे करंटेपणाचे. हे सगळे कलावंत ध्वनिमुद्रणाचे तंत्रज्ञान स्थिरस्थावर होईपर्यंत गात होते. तरीही पुढील पिढय़ांसाठी त्यांचे गायन ऐकण्याची अपूर्व संधी मात्र अगम्य कारणांमुळे हुकली. संगीत नाटकांमुळे अभिजात संगीताची तहान काही अंशाने तरी पूर्ण होत होती. तरीही उस्तादी आणि पंडिती परंपरा मात्र अतिशय जिद्दीने आपापल्या गाद्या सांभाळत होत्या. नवनवीन शैलींच्या उगमासाठी भारतातील पारतंत्र्याचा, अस्थिरतेचा कठीण काळच उपयोगी ठरला, असे दिसून येते. ख्याल गायन परंपरेतील जे कलात्मक बदल याच काळाच्या टप्प्यात घडून आले, ते स्वातंत्र्यानंतरच्या चार-पाच दशकांपर्यंत टिकून राहिले. अर्थात किराणा, जयपूर, भेंडीबझार यांसारख्या अनेक घराण्यांची मुहूर्तमेढ जरी स्वातंत्र्यपूर्व काळातली, तरी त्या घराण्यांच्या शैलीचा विकास मात्र स्वातंत्र्योत्तर काळात उठून दिसेल, इतका झाला.

संगीत नाटकांच्या लोकप्रियतेमुळे संगीताला जनाधारही मिळू लागला. संगीताचे जलसे म्हणजे मैफिली सुरू झाल्या. कोणत्या ना कोणत्या निमित्ताने देशभरात अभिजात संगीताचे वारे वाहू लागले. ते जनसामान्यांपर्यंत पोहोचू लागले. एकीकडे स्वातंत्र्याची चळवळ ऐन भरात आलेली असताना, दुसरीकडे कलांच्या क्षेत्रात भयंकर अशा महत्त्वाच्या घडामोडी घडून येत होत्या. या दोन्हींचा एकमेकांशी संबंध मात्र निश्चितच होता.

१८५७ नंतरच्या काळात ब्रिटिशांनी आपली सत्ता अधिक बळकट करण्याचा प्रयत्न केला. येथील राजा महाराजांना, संस्थानिकांना एक प्रकारच्या अनामिक दहशतीखाली ठेवण्यात त्यांना यश येत होते. त्यामुळे आपण बरे की आपले राज्य बरे, अशा मानसिक स्थितीत सापडलेल्या या सगळ्या तथाकथित सत्ताधीशांनी संगीताची, कलांची निगराणी करण्यात धन्यता मानली. ते एक प्रकारे कलांसाठी उपकारक ठरले, खरे. मात्र स्वातंत्र्याच्या चळवळीत थेट भाग न घेता काही वेळा पाठीमागून पाठिंबा देत संस्थानिकांनी ब्रिटिशांची खप्पा मर्जी ओढवून न घेण्यासाठी नाना खटाटोप केले. म्हैसूरच्या महाराजाने कलांना भरभरून प्रोत्साहन दिले, तसेच दिल्लीच्या गादीवर बसलेल्या सम्राटांनीही. अगदी पंजाबातील महाराणा रणजितसिंगांनी जालंधरला असलेल्या स्वामी हेमगिरी यांना मोठा भूखंड बक्षीस दिला आणि तेथे १८७५ मध्ये हरवल्लभ संगीत महोत्सवाची सुरुवात झाली. गेली सुमारे दीडशे वर्षे हा महोत्सव सुरू राहिला आहे. सेवाभावाने देशभरातील कलावंत तिथे आपली कला सादर करायला जातात आणि त्यामुळे अभिजात संगीतालाही संजीवनी मिळत राहिली. तिकडे पश्चिम बंगालमध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी अभिजात संगीतातून प्रेरणा घेत संगीतात नवचैतन्य आणण्याचा रवींद्र संगीताचा प्रयोग सुरू केला.

स्वातंत्र्यलढय़ात अग्रभागी असलेल्या नेत्यांना कलांकडे लक्ष देण्याएवढी फुरसत नव्हती. महाराष्ट्रात सुधारकाग्रणी आगरकर, नामदार गोखले किंवा लोकमान्य टिळक अशा नेत्यांना संगीतादी कलेचे वावडे आहे किंवा काय, असे वाटण्यासारखी स्थिती होती खरी. तरीही नारायणराव राजहंसांना ‘बालगंधर्व’ हा मानाचा किताब लोकमान्यांनीच दिला. त्यांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवातील कार्यक्रमांमध्ये अभिजात संगीताला प्राधान्य दिले जात होते (टिळकवाडय़ात भास्करबुवा बखले यांच्या गायनावेळी काहींनी जराशी गडबड केली, तेव्हा टिळकांनी या लोकांना जाहीरपणे समज दिल्याचे ध्वनिमुद्रण उपलब्ध झाले आहे.). स्वातंत्र्यलढय़ाला समांतर वाटावी अशी ही कलांच्या क्षेत्रातही कलावंतांनी आपली सर्जनक्षमता चौखूर उधळायला सुरुवात केली होती. भक्ती आणि संगीत असा संयोग तर भारतातल्या त्या काळातील बहुतेक प्रांतांमध्ये पाहायला मिळतच होता. ज्या पंजाबने शौर्याच्या गाथा निर्माण केल्या, तेथेच आजमितीसही लोकप्रिय असलेले पतियाळा घराणेही जन्मले. बडम्े गुलाम अली खाँ, सलामत अली – नजमकत अली यांच्यासारख्या त्या घराण्याच्या कलावंतांनी स्वरांच्या अतिसुंदर नक्षीकामाने संगीताला एक देखणेपणही दिले. महात्मा जोतिबा फुले यांनीही लोकसंगीताच्या आधारे समाजसुधारणांचा कार्यक्रम जाहीर केला. त्यासाठी पोवाडे रचले. ते लोकप्रियही झाले. नंतरच्या काळात महात्मा गांधींनी संगीताला काठावर तरी येऊ  दिले. बेळगावला झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात राष्ट्रगीत गाण्यासाठी गंगुबाई हनगल यांना बोलावण्यात आले होते. त्या पोरसवदा वयातही गंगुबाईंचे नाव रसिकांना माहीत होते. अभिजात संगीत स्वातंत्र्यलढय़ाच्या तप्त वातावरणापासून अलिप्त राहिले, असे जरी वरकरणी दिसत असले, तरीही त्या सगळ्या घडामोडींचा संगीतावर परिणाम होतच होता. त्याच काळात अभिजात संगीतातील अनेक कलावंत नवनवोन्मेषाच्या धुमाऱ्यांना सामोरे जात होते. एकीकडे ब्रिटिशांविरुद्ध लढा आणि दुसरीकडे संगीत अशा कात्रीतही कलावंतांनी संगीताची सेवा सुरूच ठेवली. वातावरणात कमालीची काहिली असतानाही, भविष्यात काय वाढून ठेवले आहे, याची तमा न बाळगता, कलावंतांनी आपल्या स्वरविश्वातल्या चंद्राच्या शीतल प्रकाशात आपले स्वरायन टिकवून ठेवण्याचा कसोशीने प्रयत्न केला.

mukund.sangoram@expressindia.com