News Flash

ध्वनिमुद्रणावर स्वरमुद्रा

कोणत्याही कलेला अनेकानेक संकटांना तोंड देतच टिकून राहावे लागते.

गौहरजान यांच्या ध्वनिमुद्रणापूर्वीचे छायाचित्र (मध्यभागी ध्वनिक्षेपण-कर्णा!)

मुकुंद संगोराम

ध्वनिक्षेपणाचे तंत्रज्ञान ९५ वर्षांपूर्वी आले, पण ध्वनिमुद्रण त्याही आधीपासून होते. तंत्राच्या मर्यादा समजून घेत, त्याला शरण न जाता प्रतिभेने आणि कल्पकतेने एक अवघड लढाई कलावंतांनी जिंकली…

आठवतो… तो ‘हिज मास्टर्स व्हॉइस’चा मोठा कर्णा, ज्यातून ध्वनिमुद्रिकेत साठवून ठेवलेला आवाज ऐकू येतो? तो कर्णा जेव्हा ध्वनिवर्धक नव्हता, तर ध्वनिक्षेपक होता, तेव्हा त्या कण्र्यात तोंड घालून गाणे गायला लागत असे! पाठीमागे तबला, सारंगी यांसारखी साथीची वाद्ये आहेत, पण फारसे काही ऐकू येत असेलच असे नाही.. तरीही अंदाजाने आपण आपले गाणे त्या कण्र्यात तोंड घालून गायचे. वेळ किती म्हणाल, तर अवघे दीड ते दोन मिनिटे. तेवढ्याच अवधीत तुमचे गाणे गाऊ न संपले पाहिजे अशी पहिली अट. जास्त वेळ गायलात, तर त्याचा काहीच उपयोग नाही, कारण तुमचा आवाज साठवण्याची त्या यंत्राची क्षमताच तोकडी. कल्पना करा, ज्या काळात रात्रभर मैफली झडत होत्या आणि कलावंत आपल्या कलेशी समरसून एकेक राग तास-दीड तास, अगदी दोन तासही गात होता; त्या रागातील स्वरांच्या मांडणीतील जेवढ्या म्हणून शक्यता असू शकतील, त्या सगळ्या मांडण्याचा आटापिटा करत होता, त्याच काळात ही दीड-दोन मिनिटांच्या ध्वनिमुद्रणाची लढाई सुरू झाली होती. ज्यांनी ती के ली, त्यांना कदाचित भविष्याची किंचित चाहूल लागली असावी. ज्यांना ती लढाईच वाटली नाही, त्यांच्यापुरते फारसे काही बिघडलेही नसेल, परंतु संगीताचे मात्र मोठेच नुकसान झाले.

तंत्राशी सुरू झालेली संगीताची ही लढाई आजही इतक्या वर्षांनंतरही थांबलेली तर नाहीच, उलट ती संगीताच्या अभिव्यक्तीच्या अनेक शक्यतांना नवनवी आव्हाने देत आहे.

कोणत्याही कलेला अनेकानेक संकटांना तोंड देतच टिकून राहावे लागते. त्यातून त्या कलेचा कस लागतो आणि अस्तित्वाची लढाईही सुरू होते. या लढाईतील सर्वात महत्त्वाचे शस्त्र असते, ते प्रतिभा आणि सर्जनशीलता यांचे. त्यांच्या मदतीने सगळ्याच कलांसमोर उभी ठाकलेली अनेक कठीण आव्हाने पेलण्याची ताकद कलांना प्राप्त होते. अभिजात संगीतही त्याला अपवाद नव्हतेच. प्रयोगशरण कला म्हणून संगीताची जी जडणघडण अनेकानेक शतके  होत आली, त्याला थेट आव्हान मिळाले, ते कलाबाह्य कारणामुळे. परंतु त्यामुळे कलेचे स्वरूपच अंतर्बाह्य बदलून जाते की काय, अशी भीती निर्माण होणारी कठीण परिस्थिती अभिजात संगीतासमोर उभी के ली ती तंत्रज्ञानाने. संगीताच्या सादरीकरणातील तंत्र कलांतर्गत होते. मात्र तंत्रज्ञानाचा संगीताशी, त्यातील कलात्मकतेशी काहीच संबंध नव्हता. ध्वनिमुद्रणाच्या या तंत्रज्ञानाने भारतीय संगीतासमोर त्सुनामीसारखी प्रचंड मोठी, महाकाय लाट येऊ न थडकली. ही घटना घडली विसाव्या शतकाच्या आरंभी. त्याचे पडसाद आणि परिणाम आज सुमारे सव्वाशे वर्षांनंतरही संगीत अनुभवतेच आहे. आज एकविसाव्या शतकाच्या तिसऱ्या दशकात पाय ठेवताना, आलेल्या आरोग्याच्या जागतिक संकटात कलांना टिकवून ठेवण्यासाठी जी काही केविलवाणी धडपड सुरू राहिली आहे, ती या तंत्रज्ञानाच्याच मदतीने.

संगीत म्हणजे पाण्यावरची अक्षरे. उमटताच नाहीशी होणारी. कानात, मनात कितीही साठवून ठेवायचे म्हटले, तरी ते संपूर्णतया लक्षात राहणे अशक्य. एकदाच ऐकून ते मेंदूत साठवता येणे शक्य नसले, तरी त्या संगीताचा झालेला परिणाम पुसता म्हणून पुसता येत नाही. मैफल ही एक घटना असते. कलावंत आणि रसिक यांच्या एकत्र येण्यानेच घडू शकणारी घटना. संगीतातील ही अपूर्वाई प्रत्यक्ष मैफलीत बसून कलावंताच्या सर्जनप्रक्रियेत सहभागी होत अनुभवणे, हेच तर भारतीय अभिजात संगीताचे ठळक वेगळेपण.

समजा, समोर रसिक नसतानाच कलावंत बंद खोलीत बसून गात आहे आणि नंतर केव्हा तरी रसिक एकेकट्याने त्या गायनाचा आस्वाद घेत आहे, तेव्हा त्यास मैफलीत घडणारी घटना अनुभवता येईल काय? परंतु ध्वनिमुद्रणाच्या तंत्रज्ञानाने ते घडले. ध्वनिमुद्रण ही भयानक आपत्ती असू शकेल, त्यामुळे मात्र या सगळ्या प्रक्रियेवर काही परिणाम होईल, अशी भीती त्या काळात कोणी क्वचितच व्यक्त के ली असेल. हे आव्हान नंतरच्या शतकभरात पृथ्वीवरील प्रत्येकाच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनेल आणि त्याने एक प्रकारची क्रांतीच घडून येईल, याचा पुसटसा अंदाज कदाचित काही द्रष्ट्या कलावंतांना आलाही असेल, परंतु सुरुवातीच्या काळात बहुतेकांनी त्याकडे पाठ फिरवणेच पसंत केले. या तंत्रज्ञानाचा परिणाम म्हणून रात्रभरच्या मैफलींचा बाज बदलेल, संगीताला तालाने जे काळाचे कोंदण प्राप्त करून दिले, तसेच वेळेच्या बंधनाने आविष्कारातही बदल घडतील, अशी भीती खचित कु णाला वाटली असेल. भारतीय वातावरणात तेव्हा कलावंतांमध्ये जी स्पर्धा (खरे तर खुमखुमी) होती, ती नवतेची. नवे, प्रयोगशील, सौंदर्याच्या नव्या परी दाखवणारे काही उत्कट घडण्याचा तो काळ होता. संगीतातील नव्या घराण्यांच्या निर्माणाचा, त्यांच्या टिकून राहण्याचा हा सांगीतिक अवकाश प्रज्ञेने भारून गेलेला होता. किती तरी महान कलावंत स्वत:चीच परीक्षा घेण्यात दंग होते. परिसरात स्वातंत्र्ययुद्धाची तयारी सुरू असतानाच नवतंत्रज्ञानाने शिरकाव केला होता. तेव्हाच कलावंतांनाही परंपरांच्या जोखडातून बाहेर पडून भव्यतेची स्वप्ने पडत होती. ध्वनिमुद्रणाने या स्वप्नांना पंख देण्याचे ठरवले, परंतु ते कलावंतांच्या दृष्टीने तेवढे महत्त्वाचे नव्हते. याच काळात ध्वनिक्षेपक यंत्रणाही अस्तित्वात आली आणि त्याचाही संगीताच्या अभिव्यक्तीवर परिणाम होऊ  लागला. ध्वनिक्षेपणाच्या तंत्रज्ञानाचा शोध १९२५ मधला. या यंत्रणेने गायक कलावंतांच्या गळ्यावरील ताण कमी करण्यास प्रचंड साहाय्य केले. त्यामुळेच शेवटच्या रांगेत बसलेल्या रसिकापर्यंतही संगीतातील अतिसुंदर जागा पोहोचणे सहजसाध्य झाले. तोपर्यंत त्या रसिकासाठी मोठ्या आवाजात गाण्याशिवाय पर्याय नव्हता.

अशाही अवस्थेत संगीत  नाटकातील कलावंतांनी आपली गायनकला टिकवून ठेवली. संगीत कलेला या तंत्रज्ञानाने अधिक व्यापक स्वरूप प्राप्त होऊ  शकले. शेदोनशे रसिकांसमोर कला सादर करताना, गळ्यातून येणाऱ्या अतिशय नाजूक आणि तरल ‘जागा’ प्रत्येकाला ऐकू जाण्यासाठी जी धडपड करावी लागत होती, तिची ध्वनिक्षेपणामुळे सुटका झाली. परिणामी संगीतातील श्रुतिमनोहरता अगदी प्रत्येक रसिकापर्यंत पोहोचणे सहजसाध्य झाले. तोपर्यंत त्या रसिकासाठी कलावंतांना गळ्याला ताण देत, मोठ्या आवाजात गाण्याशिवाय पर्याय नव्हता. अशाही अवस्थेत संगीत नाटकातील कलावंतांनी आपली गायनकला  आणि त्यातील अभिजातता टिकवून ठेवली. संगीत कलेला या ध्वनिक्षेपणाच्या तंत्रज्ञानाने अधिक व्यापक स्वरूप प्राप्त होऊ  शकले.

तंत्रज्ञानाच्या विकासाचा वेग तेव्हाच्या जगण्याच्या वेगाच्या तुलनेत प्रचंड म्हणावा असाच होता. दीड-दोन मिनिटांवरून तीन ते सात मिनिटांचे ध्वनिमुद्रण करण्याची वाढलेली क्षमता संगीतातही बदल घडवणारी होती. केवळ गंमत किंवा चूष म्हणून नव्हे, तर ध्वनिमुद्रणाच्या तंत्राला बाजारपेठीय मंचही उपलब्ध होऊ  लागला. एचएमव्ही, कोलंबिया, ओडियन, बेका, ग्रामोफोन यांसारख्या कंपन्यांनी या क्षेत्रात शिरकाव सुरू के ला. परिणामी ध्वनिमुद्रिका निर्मितीच्या हळूहळू विकसित होणाऱ्या व्यवसायाचीच पायाभरणी होऊ  लागली तरी संगीतातील अभिजाततेला मात्र त्याने नख लावले नव्हते. बैलगाडीवर ग्रामोफोन ठेवून त्यावर नव्या ध्वनिमुद्रिका मोठ्या कण्र्याच्या साह््याने ऐकवण्यासाठी कंपन्यांनी देशभर मोहीमच सुरू केली. (किराणा घराण्याचे अध्वर्यू उस्ताद अब्दुल करीम खाँ यांच्या ध्वनिमुद्रिका ऐकून असेच गाणे आपल्यालाही आले पाहिजे, असा हट्ट धरून कर्नाटकातील गदगसारख्या छोट्याशा गावातून भीमसेन नावाचा शाळकरी मुलगा घरातून पळून गेला होता!)

काळ असा की, देवळात कीर्तन करणाऱ्या कथेकरी बुवांच्या संसाराची कु णाला चिंता नव्हती, तशी आपले सारे आयुष्य पणाला लावून फक्त संगीतच करू इच्छिणाऱ्या शेकडो युवकांच्या भविष्याचीही काळजी नव्हती. ही काळजी ज्या समाजाने करायची त्याने, ‘भिकेचे डोहाळे’ अशा शब्दांत हिणवत, अभिजात संगीताकडे धाव घेणाऱ्या नव्या पिढीच्या कलावंतांकडे पाठ फिरवली, तरी कलात्मकतेचा ध्यास मात्र तेवढ्याच तीव्रतेने सुरू राहिला. हे घडले नसते, तर कदाचित भारतीय संगीतापुढे अस्तित्वाचेच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असते. देशाच्या कानाकोपऱ्यातील अनेकांना अभिजात संगीताने आकर्षित केले होते आणि जिवाची बाजी लावून सर्वस्व अर्पण करणाऱ्या शेकडो कलावंतांनी भारतीय संगीताचा अवकाश व्यापायला सुरुवात केली होती.

तंत्राला शरण न जाता, त्याला समजून घेत सामोरे जाणे, हेच कलावंतांपुढील तेव्हापासून आजपर्यंतचे आव्हान राहिले आहे.

mukund.sangoram@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 20, 2021 12:06 am

Web Title: article on soundtrack on recording abn 97
Next Stories
1 .. तरीही संगीत ‘हिंदूुस्तानी’!
2 अस्वस्थ काळातले संगीतस्वास्थ्य
3 संगीत नाटकांचा (पुण्य)प्रभाव!
Just Now!
X