मुकुंद संगोराम

संगीताचे श्रवण ही पैसे देऊन मिळणारी गोष्ट आहे, या कल्पनेची- व्यापाराची – संकल्पना मूळ धरू लागली तसतसे भारतीय संगीतही संस्थानी राजेरजवाड्यांच्या बैठकांतून नाटकांत, तबकडीत आणि परिषदा-महोत्सवांमध्ये गेले…

devendra fadnavis manoj jarange patil
‘ब्राह्मणी कावा’, ‘विष देण्याचा प्रयत्न’, जरांगेंच्या आरोपांना फडणवीसांचं उत्तर; शरद पवारांचा उल्लेख करत म्हणाले…
Sambhaji Bhide News
मनमाडमध्ये संभाजी भिडेंची कार अडवत घोषणाबाजी, काळे झेंडेही दाखवले, जाणून घ्या काय घडलं?
Rajasthan Minister
“अकबर बलात्कारी होता, सुंदर मुलींना उचलून…”, राजस्थानचे शिक्षण मंत्री मदन दिलावर यांचं वक्तव्य
What Amit Shah Said About Uddhav Thackeray?
“उद्धव ठाकरेंना त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री करायचं आहे, म्हणून…”; अमित शाह यांचा गंभीर आरोप

लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेला स्वातंत्र्यलढा महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली अधिक व्यापक झाला आणि त्याचा परिणाम भारतीयांच्या जीवनशैलीवरही आपोआपच होऊ लागला.  ब्रिटिशांच्या आगमनापूर्वी मुसलमानी आमदनीत भारतीय अभिजात संगीताची एक नवी रचना निर्माण झाली होती. परंपरेशी नाळ न तोडता, नव्या कल्पनांनी हे संगीत बहरले होते. पण ब्रिटिशकाळात ध्वनिमुद्रणाचे तंत्र आल्याने प्रथमच कलावंतापासून दूर राहूनही संगीत ऐकता येऊ लागले. संगीताच्या व्यावसायिकतेची ही पहिली जन्मखूण. तोवर मैफली करून मिळणाऱ्या बिदागीवर गुजराण करणाऱ्या कलावंतांना कार्यक्रमाच्या निमंत्रणाच्या प्रतीक्षेत राहावे लागत असे. भारतीय अभिजात संगीत ही प्रयोगशरण कला आहे. घरी तासन्तास रियाज करून गळ्यावर चढवलेले ‘अलंकार’ प्रत्यक्ष मैफलीत सादर करताना आणखी झळाळून बाहेर येतात, याचे कारण समोर बसलेल्या संगीत कळणाऱ्या, न कळणाऱ्या रसिकांकडून मिळणारी दाद. हे असे अपूर्वाईचे क्षण कलावंताच्या कलाजीवनात येतात, तेव्हा त्याला श्रोते साक्षीदार असतात. विज्ञानाच्या साह््याने अशी एक सांगीतिक कलाकृती साठवून ठेवता येणे ही साधीसुधी गोष्ट नव्हतीच. परंतु त्यालाही सामोरे जात भारतीय कलावंतांनी या नव्या वैज्ञानिक शोधाचा संगीताच्या प्रचार-प्रसारासाठी पुरेपूर उपयोग करून घेतला. संगीत ही कला असली तरी तिचे व्यवसायातही रूपांतर होऊ शकते, याचे भान ध्वनिमुद्रणामुळे आले. सुरुवातीच्या काळात त्याला नाके मुरडणारे कलावंत त्यांच्या उत्तरायुष्यात हळहळले. ध्वनिमुद्रिका बाजारात आल्या तर आपल्या प्रत्यक्ष होणाऱ्या कार्यक्रमांना कोण येईल, अशी भीती त्या कलावंतांना वाटत होती. संगीताचा हा नवा व्यवसाय पचनी पडायला वेळ लागला; परंतु त्यामुळे संगीतासाठी मात्र एक नवे दालन खुले झाले. आजच्या काळात हा व्यवसाय किती भरभराटीला आला आहे, हे कुणाच्याही सहज लक्षात येईल.

ब्रिटिशांच्या काळात भारतातील संस्थानिक राजे-महाराजे यांच्या दरबारात ‘राजगवई’ हे पद असे. कलावंत पदरी असणे हे त्या काळी प्रतिष्ठेचे लक्षण होते. संस्थानिकांनाही गायनाची आवड असे. त्यामुळे आपल्या दरबारात उत्तमातला उत्तमच गवई असायला हवा, यासाठी त्यांची धडपड असे (किराणा घराण्याचे अध्वर्यू उस्ताद अब्दुल करीम खाँ यांनी बडोदा संस्थान सोडल्यानंतर म्हैसूरच्या महाराजांना पत्र धाडून तिकडे येण्याबद्दल विचारणा केली. तेव्हा त्यांना लगेच निमंत्रण मिळाले. करीम खाँसाहेब म्हैसूरला पोहोचले, तेव्हा दस्तुरखुद्द राजे त्यांच्या स्वागताला हजर राहिले आणि त्यांनी हत्तीवरून मिरवणूक काढून उस्तादांना दरबारात नेले, असे सांगतात.). त्याचा संगीताच्या कलात्मक प्रगतीसाठी निश्चितच उपयोग झाला. परंतु विसाव्या शतकाच्या आरंभी हा राजाश्रय लोप पावू लागला आणि त्याची जागा समाजातील धनिकांनी घेतली. १८४३ मध्ये विष्णुदास भावे यांनी केलेला नाटकाचा पहिला खेळ हा सांगलीच्या महाराजांच्या मदतीने झाला आणि १८८० मधील अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी सादर केलेला ‘संगीत शाकुंतल’ या नाटकाचा पुण्यातील खेळ सादर झाल्यानंतर संगीत नाटकांच्या दुनियेतही ‘मंडळी’ या नावाने अनेक व्यावसायिक नाटक कंपन्या निर्माण झाल्या. आजच्या काळातील उद्योगांमधील स्पर्धा लाजतील, असे अनेक ‘बोर्डरूम ड्रामा’ या नाटक कंपन्यांमध्येही घडत होते. कर्जे काढून नाटकाचे खेळ लावणाऱ्या अनेक कंपन्या कर्जाचा डोंगर झाल्याने लिलावात निघाल्याच्याही घटना घडल्या.

थोडक्यात, संगीत व्यवसायाचीही ती एक प्रकारची ‘नांदी’च होती. समाजातील धनिकांमध्ये उत्तम संगीत ऐकण्याचा षौक होता. त्यामुळे अनेक नामवंत कलाकारांच्या मैफली आयोजित करून त्यांना उत्तम बिदागी, म्हणजे मानधन दिले जात असे. ‘विश्रब्ध शारदा’ या ह. वि. मोटे यांच्या पत्रसंग्रहाच्या अभिनव ग्रंथमालेतील दुसऱ्या खंडाच्या प्रस्तावनेत ज्येष्ठ संगीत समीक्षक आणि आस्वादक वामनराव देशपांडे यांनी या काळाचे अतीव सुंदर वर्णन केले आहे… ‘सेठ कैखुस्रो नौरोसजी काब्राजी यांनी मुंबईमध्ये ‘ज्ञानप्रसारक मंडळी’ आणि ‘गायनोत्तेजक मंडळी’ या जोडसंस्था स्थापन केल्या. संगीतविषयक जाहीर व्याख्याने, चर्चा, जलसे, लेख, पुस्तक प्रकाशन, खानदानी अभिजात कलावंतांकरवी शिक्षणाची सोय वगैरे नाना मार्गांनी ही मंडळी संगीताचा प्रचार करी, तो निष्ठेने व सातत्याने… त्या वेळी नव्या जमान्याचे प्रथम केंद्र मुंबई. पुणे नंतर. पुण्यातही स्थापन झालेला गायन समाज संगीतसेवेचे कार्य करीतच आहे… या सगळ्यातून एक बोध मिळतो; पूर्वी देवळे-मठ वगैरे सोडल्यास कलावंतांना श्रीमंतांविना, विशेषत: राजेरजवाड्यांशिवाय खात्रीचा आश्रय नव्हता. मात्र नवा गृहस्थी आश्रयदाता वर्ग संगीताला मिळाला आणि कायम झाला. व्यक्तीची जागा रसिक समाजाने घेतली.’ …संगीत सर्वांपर्यंत पोहोचण्याचा एक मुख्य प्रयत्न वि. ना. भातखंडे यांनी केला. त्यांनी संगीताचे लेखन करण्यासाठी स्वतंत्र भाषाच तयार केली. ही प्रेरणा पाश्चात्त्य संगीताकडून मिळाली असली, तरीही ती प्रयोगशरण असलेल्या भारतीय अभिजात संगीतासाठीही उपयोगात येऊ शकते, शिवाय संगीत शिकणाऱ्यांसाठी या लेखन पद्धतीचा वापर करता येऊ शकतो, अशी त्यांची भूमिका होती.

दोन मिनिटांचा ध्वनिमुद्रणाचा काळ वीस मिनिटांपर्यंत वाढण्यास किमान पाच दशकांचा काळ जावा लागला. परंतु या काळात संगीताशी संबंधित अशा अनेक नव्या व्यवस्था निर्माण झाल्या. ध्वनिमुद्रण करण्यासाठीचे स्टुडिओज्, त्यावर प्रक्रिया करण्यासाठीची यंत्रसामग्री, ध्वनिमुद्रिकांच्या विक्रीची देशभर पसरलेली केंद्रे अशा अनेक यंत्रणांचे व्यावसायिक जाळेच देशभर उभे राहिले.

संगीत ही विक्रीयोग्य वस्तू होण्यास जसे तंत्रज्ञान कारणीभूत झाले, तसेच संगीत नाटकांमुळे समाजातील विशिष्ट वर्गात अभिजात संगीताबद्दलची वाढत गेलेली रुचीही कारणीभूत झाली. ही बाजारपेठ हळूहळू फुलत चालली, तरीही संगीताचे जलसे मात्र कमी झाले नाहीत. दरबारातील गायन सामान्यांच्या आवाक्यात येण्यासाठी संगीत परिषदांचे आयोजन सुरू झाले. मोठ्या प्रमाणात रसिक तेथे जाऊ लागले. संगीतातील विविध घराण्यांच्या तालेवार गवय्यांचे गायन ऐकण्याची ही संधी महत्त्वाची होती. एका अर्थाने संगीत जोखडातून मुक्तच झाले. देशभरात होणाऱ्या संगीत महोत्सवांमध्ये अनेक कलावंत हजेरी लावत असत. या महोत्सवांत संधी मिळावी, म्हणून कलावंत वाट पाहात.

हा सारा व्यवहार व्यापाराच्या पातळीवर मात्र पोहोचला नव्हता. धनिकांच्या मदतीने असे अनेक कार्यक्रम विनामूल्य होत असत. मात्र काही महोत्सवांमध्ये श्रोत्यांना तिकीटही काढावे लागे. त्याचे मूल्य जरी फार नसले, तरीही संगीताचे श्रवण ही पैसे देऊन मिळणारी गोष्ट आहे, या कल्पनेची म्हणजेच व्यापाराची संकल्पना हळूहळू मूळ धरू लागली होती. कलावंतांना भरमसाट मानधन देणे शक्य नव्हते, कारण आयोजनाचा खर्च वजा जाता उरणाऱ्या रकमेतून कलावंतांची बिदागी भागवली जात असे. त्याला कलाकारांचाही विरोध नव्हता. याचे आणखी एक कारण कलाकारांना केवळ उपजीविकेचीच आवश्यकता होती, असे नव्हे. त्यांच्यासाठी कलात्मकता, त्याचा ध्यास आणि नावीन्याची हौस हे मुद्दे अधिक महत्त्वाचे होते. कलावंत म्हणून आपल्याच मस्तीत जगण्याची जिद्द अधिक मोलाची होती. तरीही केवळ मैफल जिंकून पोट भरण्यासारखे नव्हतेच.

त्यासाठी शिकवण्यांचा मार्ग होता. संगीत शिक्षणाचा एक महामार्ग गांधर्व महाविद्यालयाच्या माध्यमातून उभारला जात असतानाच, मोठ्या कलाकारांकडून थेट तालीम मिळण्यासाठीचा आटापिटा होतच होता. गुरूने शिष्यत्व मान्य करणे, यालाही महत्त्व होते. त्यासाठी ‘गंडाबंधन’ अशा सांस्कृतिक रीतीचाही अवलंब होत असे. गुरूने शिष्याला गंडा बांधणे ही प्रतीकात्मक गोष्ट असली, तरी तिला संगीतविश्वात कमालीचे स्थान होते. गुरूच्या घरी राहून संगीत शिकण्यास पर्याय नव्हता. गुरूकडून मिळणारी विद्या सहजपणे, पैसे फेकून मिळत नसे. केवळ ‘क्लासा’त जाऊन कलाकार होता येत नाही, अशी जाणीव झालेले सगळे नवशिके चांगल्या गुरूच्या शोधात असत. खरे तर उलटेही घडतच होते. गुरूला चांगल्या शिष्यांची प्रतीक्षा असे. वंशसातत्य ही मानवाच्या ठायी असलेली मूलभूत प्रेरणा संगीतातील ‘घराणी’ टिकण्यासाठीही वेगळ्या पद्धतीने उपयोगात येतच होती.

mukund.sangoram@expressindia.com