08 March 2021

News Flash

‘गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे..’

कवी आरती प्रभू अर्थात चिं. त्र्यं. खानोलकर यांचा जन्म ८ मार्च १९३० रोजी कुडाळमध्ये झाला.

विनायक जोशी कवी आरती प्रभू, संगीतकार हृदयनाथ मंगेशकर आणि गायिका आशा भोसले या त्रयीचे गाजलेले भावगीत..

‘गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे

माझ्यापास आता कळ्या आणि थोडी ओली पाने।

आलो होतो हासत मी काही श्वासांसाठी फक्त

दिवसांचे ओझे आता, रात्र रात्र शोषि रक्त।

आता मनाचा दगड, घेतो कण्हत उशाला

होते कळ्यांचे निर्माल्य आणि पानांचा पाचोळा।’

सतार आणि ग्रुप व्हायोलिन्स या प्रमुख वाद्यांचा आकर्षक भरणा ही या भावगीताच्या संगीत संयोजनामधील विशेष गोष्ट आहे. संगीतकाराची स्वररचना आणि कवीचे शब्द आपल्याला एका  आगळ्या विश्वात घेऊन जातात. एक अनोखे भावविश्व मनात तयार होते. कवीने शब्दांत मांडलेली खंत यथायोग्य स्वरातून आपल्या हृदयापर्यंत पोहोचते. या शब्दांमध्ये हुरहूर आहे, व्याकूळ भाव आहे. आशा भोसले यांचा स्वर हा भाव एका वेगळ्या उंचीवर नेतो. ‘आता मनाचा दगड’ ही एरवी जड वाटणारी शब्दरचना स्वरांसह सहज ओघात येते. गीताचा दुसरा अंतरा तारसप्तकात सुरू होतो. कवीने मुखडय़ामध्ये ‘कळ्या’ आणि ‘पाने’ यांचा उल्लेख केला आहे. शेवटच्या ओळीमध्ये ‘कळ्यांचे निर्माल्य’ आणि ‘पानांचा पाचोळा’ हे धक्का देणारे भावविश्व निर्माण झाले आहे. शब्द-स्वरांची ताकद असे विश्व निर्माण करते. यातल्या स्वरांच्या हरकती आणि खटके हे भावनेसाठी रसपरिपोषक ठरतात. हृदयनाथ मंगेशकरांच्या संगीतातील ही आणखी एक अलौकिक रचना ठरावी. मंचीय कार्यक्रमांत त्यांच्या आवाजात ही रचना ऐकायला मिळावी अशी अनेक जणांची इच्छा असते. संगीतरचना करताना ते नेहमीच शब्दार्थाचा सखोल विचार करतात. गायनभर पसरलेली त्या शब्दांतील भावना हा त्यातील सांगीतिक विशेष असतो. गायिका आशा भोसले आणि संगीतकार हृदयनाथ मंगेशकर या जोडीच्या कितीतरी भावगीतांनी आपल्याला आजवर अमाप आनंद दिलाय.

कवी आरती प्रभू अर्थात चिं. त्र्यं. खानोलकर यांचा जन्म ८ मार्च १९३० रोजी कुडाळमध्ये झाला. त्यांचे बालपण कुडाळ आणि बागलांची वाडी या निसर्गरम्य ठिकाणी व्यतीत झाले. १९५९ साली ते मुंबईला आले. त्यांनी कथा, कादंबरी, नाटक, कविता अशा सर्वच साहित्यप्रकारांत लक्षवेधी लेखन केले. कवितालेखनासाठी त्यांनी ‘आरती प्रभू’ हे नाव घेतले. आरती प्रभू हे नाव कसे घेतले याला पाश्र्वभूमी आहे. त्यांनी ‘प्रभू-खानोलकर’ या आडनावातील ‘प्रभू’ हे आडनाव घेतले. घरी त्यांना ‘रघुनाथ’ या नावाने हाक मारीत. त्या नावातील रोमन लिपीतील ‘आर’ आणि ‘टी’ ही अक्षरे त्यांनी घेतली आणि त्यातून ‘आरती प्रभू’ हे नाव तयार केले. कवी आरती प्रभू हे शालेय जीवनापासूनच कविता लिहीत. ‘बालार्क’ या शालेय हस्तलिखितात ‘पुष्पकुमार’ या नावाने त्यांनी काही कविता लिहिल्या. ‘सत्यकथा’मध्ये प्रसिद्ध झालेली ‘शून्य शृंगारते’ ही त्यांची कविता ‘आरती प्रभू’ या नावाने प्रसिद्ध झाली. त्यांनी लिहिलेल्या ‘कोंडुरा’, ‘रात्र काळी घागर काळी’ या कादंबऱ्या मराठीतील महत्त्वाच्या कादंबऱ्या मानल्या जातात. त्यांचे ‘एक शून्य बाजीराव’ हे नाटक ‘रंगायन’ या नामवंत संस्थेने रंगमंचावर आणले. १९६२ मध्ये त्यांचा ‘दिवेलागण’ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. ‘चानी’ ही त्यांची कादंबरी इतकी लोकप्रिय झाली, की व्ही. शांताराम यांनी त्यावर आधारित त्याच नावाने चित्रपट काढला. खानोलकरांनी ‘कालाय तस्मै नम:’ आणि ‘असाही एक अश्वत्थामा’ ही नाटकेही लिहिली. काही काळ त्यांनी आकाशवाणीत मंगेश पाडगांवकर यांच्यासोबत काम केले. श्री. पु. भागवत, मंगेश  पाडगांवकर, मधु मंगेश कर्णिक, विजय तेंडुलकर या दिग्गज मंडळींनी त्यांना नेहमीच प्रोत्साहनपर साथ केली. १९७८ साली आरती प्रभूंच्या ‘नक्षत्रांचे देणे’ या काव्यसंग्रहाला अत्यंत प्रतिष्ठेचा असा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. परंतु हा सोहळा प्रत्यक्ष अनुभवण्याचे भाग्य मात्र त्यांना लाभले नाही. भावगीतांमध्ये ‘ती येते आणिक जाते..’, ‘ये रे घना, ये रे घना..’, ‘समईच्या शुभ्र कळ्या उमलवून लवते..’ ही त्यांची गाणी अफाट लोकप्रिय झाली. वयाच्या अवघ्या ४६ व्या वर्षी ते गेले. (२६ एप्रिल १९७६)

कवितेला गेयतेची कवचकुंडले लाभणे आणि त्यातून गीत जन्माला येणे ही निर्मितीप्रक्रिया भावगीतांच्या इतिहासात महत्त्वाची ठरली. गेल्या ९० वर्षांत भावगीतांना असंख्य आवाज लाभले. भावगीतगायनाच्या वेगवेगळ्या शैली विकसित होत गेल्या. रविकिरण मंडळातील कवींनी कविता गायला सुरुवात केली. आणि तिथेच खऱ्या अर्थाने भावगीत रुजले. यथावकाश हळूहळू भावगीताने रसिकांच्या मनात प्रवेश केला. भावगीताच्या कक्षा रुंदावत गेल्या. आरंभीच्या काळात बाई सुंदराबाई, सरस्वती राणे, वत्सला कुमठेकर यांची गीते श्रवणीय ठरली. ना. घ. देशपांडे यांचे ‘रानातली शीळ..’ गाणारे गायक-संगीतकार जी. एन. जोशी हे श्रोत्यांच्या मनात ठसलेले प्रमुख नाव. बापूराव पेंढारकरांच्या स्वराने सुरू झालेला भावगीतांचा हा प्रवास गजानन वाटवे, सुधीर फडके, श्रीनिवास खळे, वसंत प्रभू अशा अनेक प्रतिभावंतांनी अक्षरश: समृद्ध केला. काळानुरूप असंख्य बदल, वळणे स्वीकारत भावगीत आज एका वेगळ्याच टप्प्यावर उभे आहे. भविष्यातही भावगीत प्रतिभेचे आगळेवेगळे धुमारे घेऊन येईल आणि त्याचेही स्वागतच होईल.

गेल्या वर्षभरातील भावगीतांच्या सिंहावलोकनाच्या या प्रवासात हजारो संगीतप्रेमींशी व्यक्तिगत भावबंध जुळले. वेगवेगळ्या कोनांतून या विषयावर लिहिणाऱ्यांकडून माहिती मिळत गेली. ज्येष्ठ कलाकारांचे प्रत्यक्ष भेटीत मार्गदर्शन मिळाले. जगभरातील संगीतप्रेमींशी कायमचे मैत्र जुळले. नागपूर, कोल्हापूरपासून न्यू जर्सी, न्यूयॉर्क आणि आखाती देशापर्यंत अनेकांकडून भरभरून दाद मिळाली. त्यातून हा स्वरसंवाद आणखी बहरू लागला. काही वाचकांनी काही भावगीतांमध्ये त्यांना जाणवलेले वेगळे अर्थही आवर्जून सांगितले. आणि हीच खरी भावगीताची ताकद आणि यश आहे. प्रत्येक श्रोत्याला एखादे गीत वेगवेगळ्या प्रकारची आठवण करून देणारे असूू शकते. गाणे ऐकताना प्रत्येकाच्या मनातील चित्र वेगळे असू शकते. भावगीतांच्या या प्रवासात आकाशवाणी, दूरदर्शन आणि रेकॉर्ड कंपन्यांचा मोलाचा सहभाग कोणीही विसरू शकणार नाही. भावगीतांच्या या प्रदीर्घ प्रवासात असंख्य वादक, संयोजक, गायक-गायिका यांनीही साथ दिली. तरीही या प्रवासात ‘गेले द्यायचे राहून..’ अशी भावना दाटून यावी अशा बऱ्याच गोष्टी आहेत.

‘काही बोलायचे आहे, पण बोलणार नाही, देवळाच्या दारामध्ये भक्ती तोलणार नाही..’ हे गीत लिहिणारे कवी कुसुमाग्रज दुसऱ्या एका गीतात ‘जीर्ण पाचोळा पडें तो उदास’ असा वेगळाच भाव व्यक्त करतात. हे अजरामर भावगीत मनातच राहिले.

‘असेच होते म्हणायचे तर अशी अचानक भ्यालीस का?’ या गीताचे कवी विंदा करंदीकर ‘देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे..’ ही विश्वभावना व्यक्त करतात. माझं भाग्य असं, की हे गीत सर्वप्रथम संगीतबद्ध करण्याचा मान डोंबिवलीचे संगीतकार उदय चितळे यांना आणि ते सर्वप्रथम गाण्याचा मान मला आणि गायिका रंजना जोगळेकर यांना मिळाला! आम्हाला या आनंदाचे मोजमाप करताच येणार नाही. एका आल्बमसाठी हे गीत रेकॉर्ड झाले.

पं. जितेंद्र अभिषेकी, पं. वसंतराव देशपांडे, पं. कुमार गंधर्व, पं. राम मराठे, गानसरस्वती  किशोरी आमोणकर या शास्त्रीय मैफली गाजवणाऱ्या गायकांचे भावगीतांतील योगदानही महत्त्वाचे आहे. कविवर्य शंकर वैद्य सरांनी सांगितले होते, ‘‘इंदिरा संतांची कविता म्हणजे कवितेच्या प्रांगणातील तुळशी वृंदावन!’’ या तुळशी वृंदावनापुढे नतमस्तक व्हायचे राहून गेले. शंकर वैद्य, पु. शि. रेगे, रा. ना. पवार, मनोहर कवीश्वर या आणि अशा अनेकांच्या गीतांवर लिहिण्याचे ‘अपुरे माझे स्वप्न राहिले..’

तरीही सोलापूरचे कवी दत्ता हलसगीकर यांच्या शब्दांत सांगायचे तर-

‘ज्यांची बाग फुलून आली त्यांनी दोन फुले द्यावीत

ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी दोन गाणी गावीत।’

‘गेले द्यायचे राहून..’ या गीताबद्दल लिहिताना बरेच काही लिहिण्याचा मोह आवरू शकलो नाही. निरोपासाठी व्यक्त होताना ‘गलबलून जातो तेव्हा..’ ही भावना येतेच. पण ‘लोकसत्ता’च्या स्वरानुबंधामुळे ‘इवलेसे रोप लावियले द्वारी’ हा आश्वासक भावही मनात आहेच. कविवर्य वसंत बापट यांचे शब्द आठवतात..

‘तुम्ही जीव लावला मैत्र आपुले जुने

केलेत माफ तुम्ही शंभर माझे गुन्हे

हे एकच आता अखेरचे मागणे

ही मैफल अपुली अखंड चालो अशी

आम्ही जाणारच की कधीतरी पटदिशी..’

vinayakpjoshi@yahoo.com

(समाप्त)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 31, 2017 12:36 am

Web Title: chintamani tryambak khanolkar and hridaynath mangeshkar nakshatranche dene
Next Stories
1 ‘कशी जाऊ मी वृंदावना..’
2 ‘मनाच्या धुंदीत लहरीत ये ना..’
3 ‘मालवून टाक दीप..’
Just Now!
X