प्रत्येक आवाज भिन्न असतो. तंतोतंत सारखा दुसरा आवाज सापडणे कठीण. मानवी आवाज हे संगीताचे साधन आहे आणि स्वर हे त्यातले माध्यम आहे. तालीम मिळालेल्या गळ्यातून उत्तम स्वर ऐकायला मिळतो.

शब्द हा कधी साहित्यातला, तर कधी संगीतातला असतो. शब्द गायल्यावर जेव्हा त्यातून साहित्यातला अर्थ समजतो तेव्हा ते गायनाचे व स्वररचनेचे यश असते. शब्दाला उत्तम स्वर मिळणे हे भाग्यच. तो मिळाला तरच शब्द नादमय होतो. नादाची अगणित रूपे आहेत. ती सर्व जेव्हा शब्दाच्या उच्चारणात दिसतात तेव्हाच त्याला ‘संस्कारित आवाज’ म्हणतात. अशा आवाजातील गाणे हे खऱ्या अर्थाने ‘जनसंगीत’ होते. अशा आवाजाच्या यशाचे गमक हे दैवी देणगी आणि रियाजी मेहनत या दोहोंमध्ये असते. या आवाजातील मींड हे आपणा प्रत्येकाच्या मनाचे आंदोलन असते. या गायनातील लय म्हणजे हृदयाचा ठोकाच असतो. तालामध्ये तो ठेका असतो. त्या ठेक्याला तो स्वर मिळतो म्हणून गाणे ऐकणाऱ्याच्या जगण्यातले प्रवाहीपण टिकून राहते. त्या स्वराचे व शब्दाचे बोट पकडून आपले मन चालत असते. संगीतात चाल असते. त्या चालीतले गुंजन गायनभर सांभाळायचे असते. ते जिथे सांभाळले जाते त्याला ‘सुसंस्कृत आवाज’ म्हणता येईल. अशा आवाजातील भावना मनाला थेट

IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: धोनीच्या वादळी खेळीने आनंद महिंद्राही झाले चकित, माहीचे कौतुक करताना म्हणाले, “कृतज्ञ आहे की माझं नाव Mahi-ndra…”
A vision of changing politics in Chandrakat Khaire campaign
चंद्रकात खैरे यांच्या प्रचारात बदलत्या राजकारणाचे दर्शन
lok sabha muhurt marathi news, lok sabha marathi news
उमेदवारी अर्जासाठी मुहुर्ताची लगबग
Dealing with anti-recipe trolls on social media
एका पाककृतीविरोधातील ट्रोलधाडीला सामोरे जाताना…

भिडते. मग ती भावना शब्दाच्या उच्चारांतील असो की पाण्याच्या उसळण्याइतक्या वेगाने घेतलेली तान असो, अथवा भावगीतात भरलेला आलापाचा रंग असो, किंवा भावगीतासाठी घेतलेला शास्त्रीय रागाचा आधार असो.. साडेतीन ते चार मिनिटांच्या तबकडीमध्ये निर्माण झालेला हा शब्द-स्वरांचा महाल असतो. त्याच्या अस्तित्वामुळे आपले आयुष्य समृद्ध होते. ‘आयुष्यात आपण काय कमावलं?’ या वरवर सोप्या वाटणाऱ्या, पण अवघड अशा प्रश्नाचे उत्तर आपल्याला त्यातून मिळालेले असते. कारण त्या स्वराने हे उत्तर गायनातून दिलेले असते. आपणही अशा गायनावर जिवापाड प्रेम करतो. ते गायन, तो आवाज म्हणजे भारतरत्न लता मंगेशकर!

भावगीतांच्या प्रवासाच्या व लतादीदींच्या गायन कारकीर्दीच्या आरंभीच्या काळात त्यांनी संगीतकार दत्ता डावजेकर तथा डी. डीं.च्या संगीत दिग्दर्शनात दोन भावगीते गायली. एक- ‘तुज स्वप्नी पाहिले रे गोपाळा’ आणि दुसरं- ‘गेला कुठे बाई कान्हा..’

कोल्हापुरात मुक्कामाला असताना दत्ता डावजेकर तथा डी. डी.  हे मास्टर विनायक यांच्या प्रफुल्ल पिक्चर्समध्ये संगीतकार म्हणून नोकरीला होते. मा. विनायक त्यांना म्हणाले, ‘अरे दत्ता, आज एक मुलगी गाण्याची ऑडिशन द्यायला येईल.’ त्यांनी सांगितल्यानुसार सडपातळ, खूप लांब केस असलेली आणि दोन वेण्या घातलेली एक मुलगी ऑडिशनला आली. ती साधारण १३-१४ वर्षांची असावी. डी. डीं.ना प्रश्न पडला.. एवढी लहान मुलगी काय गाणार? पण तिचे गाणे सुरू झाले आणि सारेच आश्चर्यचकित झाले. मधुर आवाज, तालाची उत्तम समज, हरकती यामुळे ऐकणारे थक्कच झाले. अर्थातच ती मुलगी ऑडिशन उत्तीर्ण झाली. तिने नाव सांगितले.. लता मंगेशकर.

अशा तऱ्हेने लतादीदींची ऑडिशन घेण्याचा मान संगीतकार डी. डीं.ना मिळाला. लतादीदींच्या संगीत क्षेत्रातील आरंभीच्या काळातील दोन भावगीते हा भावगीत प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे.

‘तुज स्वप्नी पाहिले रे गोपाळा

जमल्या ललना चतुरा

मोदे स्वागत करण्याला।

आळविती कुणी सुरस रागिणी

कोमल मंजुळ वाणी

तव श्रांत वदन शमवाया

नंदकिशोरा सुखवाया, झुळुझुळु वायुही आला।

थांबती विहगही नभी या

पसरूनी शीतल छाया

दिपतील नयन तुझे रे म्हणूनी

रवीवरी मेघमालिका जमली

अंजिरी पडदा मनींवरी धरीला

तुज स्वप्नी पाहिले रे गोपाळा।’

दरबारी कानडा या रागातील या गीताचा आरंभ उत्कृष्ट आलापाने होतो. गंधार, धैवत व निषाद हे कोमल स्वर असलेला हा राग मंद्र सप्तकाकडे गायला जातो. ‘तुज स्वप्नी पाहिले रे..’ मधील ‘रे’ या अक्षरावरील छोटय़ा तानेची जागा दाद देण्याजोगी आहे. दुसऱ्या अंतऱ्यामध्ये ‘नभी या’ या शब्दाच्या उच्चारानंतर अतिशय आकर्षक अशी आलाप व तानेची जागा आहे. हा आनंद घेण्यासाठी हे गाणे आवर्जून ऐकावेच.

अहिर भैरव या रागातील दुसरे भावगीत तालातील ढोलक पॅटर्नच्या साथीने रंगले आहे. त्यातला प्रारंभीचा म्युझिक पीस चित्तवेधक आहे.

‘गेला कुठे बाई कान्हा, कान्हा येई ना।

गेला कुठे माझा राजा, राजा येई ना।

किती बघु वाट तरी, जा ना,

जा ना  सखया लोपूनी

आता धीर धरवेना, गेला कुठे बाई कान्हा।

सांगा माझ्या मोहना, बोलणार ना तुला पुन्हा रे

नको धरू राग, या क्षणाचा,

गेला कुठे बाई कान्हा।

पंचप्राण माझे बाई ओवाळूनी

अलिंगी ना तेही धरूनी

माझ्या हृदयीचा राणा, गेला कुठे बाई कान्हा।’

लतादीदींचा सतेज स्वर व उत्कट भावना यांचा आनंद घेण्यासाठी ही दोन्ही भावगीते ऐकाच असा माझा आग्रह आहे. याचे गीतलेखन संगीतकार डावजेकर यांचेच आहे. त्यांना उत्स्फूर्त असे काव्य सुचत असे आणि त्यास सुयोग्य चालही!

गेल्या वर्षी १५ नोव्हेंबर रोजी संगीतकार दत्तात्रय शंकर डावजेकर यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू झाले. त्यांची संगीत या विषयाशी अगदी बालपणीच ओळख झाली. त्यांचे वडील शंकर डावजेकर हे मराठी नाटके आणि कीर्तनांमध्ये तबलासाथ करीत. संगीतरचनेसह दत्ता डावजेकरांची प्रयोगशीलता अनेकविध विषयांत होती. डी. डीं.नी इयत्ता पाचवीत असताना साबणाच्या डबीत रेडिओ बांधला होता. सातवीत असताना त्यांना लंडनच्या मॅकॅनो स्पर्धेतही पहिले पारितोषिक मिळाले होते. शाळेत असताना वर्गमित्र दादा खरेंकडून ते तबलावादन शिकले. स्वातंत्र्यलढय़ातील प्रभात फेऱ्यांमधील गीतांना चाली लावून गाणे हे त्यांचे आवडते काम होते. मोठेपणी जलतरंग, दिलरुबा, हार्मोनियम, तबला ही वाद्ये ते लीलया वाजवू लागले. क्ले व्हायोलिन हे डी. डीं.नीच प्रथम बनवले. पुढे निष्णात वादक केर्सी लॉर्ड यांनी शेकडो रेकॉर्डिग्जमध्ये हे वाद्य वाजवले. ‘इलेक्ट्रॉनिक संगीत’ या विषयात डी. डीं.ना विशेष रस होता. चित्रपटसृष्टीत त्यांनी पुढे संगीतकार सी. रामचंद्र, रोशन, चित्रगुप्त, आनंद-मिलिंद या संगीतकारांकडे मुख्य अ‍ॅरेंजर म्हणून काम केले.

डी. डीं.च्या कन्या व गायिका डॉ. अपर्णा मयेकर यांनी एका गप्पांमध्ये आपल्या वडिलांप्रति ऋण व्यक्त केले. त्या म्हणाल्या, ‘डी. डी. हे संतप्रवृत्तीचे कलाकार होते. मी लहान असताना त्यांनी एखादी चाल तयार केली की ते माझ्याकडून गाऊन घ्यायचे. तेव्हापासून सुगम गायनाचे तंत्र-मंत्र मला मिळत गेले. ‘गाण्याची आऊटलाइन तुला कळली आहे.. आता तुझ्या ढंगाने सजव,’ असे ते सांगायचे. तुझ्या गाण्यात प्रभावी भावना नसेल तर तू कलाकार नाहीस, असे ते नेहमी सांगत. एका रेकॉर्डिमध्ये गाता गाता शेवटी माझ्या कंठातून हुंदका आला, त्या क्षणी ते म्हणाले, ‘आता तू गायिका झालीस!’ डी. डी. उत्तम संगीतकार, कवी, लेखक व चित्रकार होते. ‘मंगळावरचा माणूस’ या विषयाचे डी. डीं.नी रेखाटलेले चित्र कित्येक वर्षे ग. दि. माडगूळकरांनी आपल्या बंगल्यात ठेवले होते. मुलगी म्हणून मला डी. डीं.चे आशीर्वाद लाभले. आम्हा चारही भावंडांना डी. डी. ‘तीन ताल’ म्हणून संबोधत. विजय, रेखा, ललिता, विनय असा आमच्या घरी तीन ताल आहे असे ते म्हणत.’

लता मंगेशकर यांनी गायलेल्या वरील दोन गाण्यांच्या निमित्ताने कितीतरी भारलेल्या आठवणी जाग्या झाल्या. या गाण्यांमधील स्वर आणि संगीताचे ऋण आपण कधीच फेडू शकणार नाही. यालाच निखळ आनंदाचे ऋण म्हणतात..

विनायक जोशी vinayakpjoshi@yahoo.com