भावगीतांच्या वाटचालीत तरुणाईला भुरळ पाडणारी, डौलदार बाजाची अनेक भावगीते रसिकांसमोर आली. त्यांत सवंगपणा वा थिल्लरपणा औषधालाही नाही. शब्द, संगीत आणि स्वरांच्या बाबतीत ती उच्च दर्जाची आहेत. त्यांच्या तालात पाश्चात्त्य प्रभाव असला तरी त्यातला नाद हरवलेला नाही. ही गाणी ऐकता ऐकता आपण त्यांच्याशी सहजगत्या एकरूप होतो. आपल्याला आयुष्यभर आनंद देणारी अशी दोन गाणी आहेत. ती म्हणजे- ‘मनाच्या धुंदीत लहरीत ये ना..’ आणि ‘ही चाल तुरुतुरु..’ गायक जयवंत कुलकर्णी, गीतकार शान्ता शेळके आणि संगीतकार देवदत्त साबळे या त्रयीची भन्नाट आनंद देणारी ही दोन गाणी आहेत.

‘मनाच्या धुंदीत लहरीत ये ना

Ram Divya ABhishek
Ram Navami : प्रभू रामाच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक! अयोध्येतल्या मंदिरातील रामलल्लाचं मूळ रुप दर्शन
There is no end to the songs of Dalits
गीतांचा भीमसागर… : दलितांच्या सुरांना अंत नाही!
exam burden on children marathi news
सांदीत सापडलेले… : खरी परीक्षा!
lokrang article, book review, ekla chalo re, Autobiographical book, sanjeev sabnis, loksatta,
सकारात्मक आत्मकथन

सखे ग साजणी ये ना

जराशी सोडून जनरीत ये ना

सखे ग साजणी ये ना।

चांदणं रूपात आलंय भरा

मुखडा तुझा गं अति साजरा

माझ्या शिवारी ये तू जरा

चारा घालीन तुज पाखरा

माझे डोळे शिणले ग, तुझी वाट पाहुनी ग

गुलाबी गालात हासत ये ना, सखे ग..।

जराशी लाजत मुरकत ये ना।

आता कुठवर धीर मी धरू

काळजी करतंय बघ हुरहुरू

सजणी नको ग मागे फिरू

माझ्या सुरात सूर ये भरू

माझे डोळे शिणले ग, तुझी वाट पाहुनी ग

बसंती वाऱ्यात तोऱ्यात ये ना, सखे ग..

सुखाची उधळीत बरसात ये ना, सखे ग..।’

खुला आवाज, गावरान ठसका आणि शहरी खटय़ाळपणा या सगळ्याचा उत्तम मिलाफ असणारे १९७० च्या दशकातील आघाडीचे गायक जयवंत कुलकर्णी यांचा स्वर या भावगीताला लाभला आहे. अर्थात त्याआधी काही वर्षांपूर्वी त्यांनी संगीतकार दत्ता डावजेकरांकडे ‘वाट संपता संपेना..’ हे गीत गायले होते. मात्र, त्या गीताचा बाज वेगळा होता.

जयवंतरावांची कन्या संगीता किरण शेंबेकर यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. शास्त्रीय गायक लक्ष्मणराव देवासकर यांच्याकडे जयवंतरावांनी शास्त्रीय गायनाची तालीम घेतली. त्यांच्याचकडे हार्मोनियमवादनाचे शिक्षणही घेतले. पु. ल. देशपांडे यांनी जयवंतरावांच्या आवाजातले गुण हेरले आणि पार्ले टिळक विद्यालयाची प्रार्थना त्यांच्या सुरेल आवाजात ध्वनिमुद्रित केली. ‘शाब्बास बिरबल शाब्बास’ या नाटकाच्या नांदीमध्ये जयवंतरावांचा गायन सहभाग आहे. काही वर्षे चित्रपटसृष्टीत दादा कोंडके यांच्यासाठी जयवंतरावांचा आवाज हे समीकरणच झाले होते. जयवंतराव ‘स्वरवंदना’, ‘स्वरांच्या मळ्यात’ असे गायनाचे मंचीय कार्यक्रमही सादर करीत. या कार्यक्रमांना रसिकांचा तुफान प्रतिसाद मिळत असे. त्यांनी अनेक संगीतकारांकडे उत्तमोत्तम गाणी गायली. संगीतकार देवदत्त साबळे यांच्याकडे जयवंतरावांनी गायलेले हे दुसरे गीत-

‘ही चाल तुरुतुरु, उडती केस भुरुभुरु

डाव्या डोळ्यावर बट ढळली

जशी मावळत्या उन्हात, केवडय़ाच्या बनात

नागीण सळसळली।

इथं कुणी आसपास ना,

डोळ्यांच्या कोनात हास ना

तू जरा माझ्याशी बोल ना,

ओठांची मोहोर खोल ना

तू लगबग जाता, मागे वळून पाहता

वाट पावलांत अडखळली।

उगाच भिवई ताणून,

फुकाचा रुसवा आणून

पदर चाचपून हातानं,

ओठ जरा दाबिशी दातानं

हा राग जीवघेणा, खोटाखोटाच बहाणा

आता माझी मला खूण पटली।’

गीतकार शान्ता शेळके मुलाखतींमध्ये नेहमी सांगत : ‘चालीवर लिहिणे अनेक कवींना रुचत नाही. पण चालीमुळे, त्यातल्या वेगळ्या वजनामुळे, विशिष्ट खटक्यांमुळे कवीला कित्येकदा वेगळ्या कल्पना सुचतात. ‘ही चाल तुरुतुरु’ या गाण्याची चाल शाहीर साबळे यांच्या मुलाने- देवदत्त साबळे यांनी बांधली होती. त्यावर मी गाणे रचले आणि चालीच्या विशिष्ट खटक्यांमुळे लोकांना ते खूप आवडले!’

संगीतकार देवदत्त साबळे यांच्या प्रत्यक्ष भेटीत खूप आठवणी उलगडल्या. देवदत्त हे वयाच्या १७-१८ व्या वर्षांपर्यंत शिक्षणासाठी मुंबईबाहेर होते. तोवर संगीताशी त्यांचा संबंध आला नव्हता. त्यांनी भरपूर चित्रपट पाहिले, त्यांतील गाणी ऐकली. हाच त्यांच्या संगीताचा पाया ठरला. ड्राफ्टस्मनच्या कोर्ससाठी म्हणून घरातून निघालेले ते तिथे न जाता चित्रपट पाहायला जायचे. उत्तम संगीत काय असते हे त्या काळात समजल्याचे देवदत्तजी सांगतात. वाईमध्ये त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतले. त्यांनी पहिले गाणे महाविद्यालयात असताना लिहिले आणि ते संगीतबद्धही केले. शाहीर साबळेंची एक लोकप्रिय चाल होती- ‘नेसते नेसते पैठण चोळी ग, आज होळी ग..’! त्या चालीवर देवदत्तजींनी शब्द लिहिले- ‘थांब राणी, थांब ग जीवाची रमणी ग, माझी साजणी..’ हे गाणे महाविद्यालयात सर्वाना आवडले. महाविद्यालयाच्या गॅदरिंगसाठीही त्यांनी एक गीत लिहिले आणि ते संगीतबद्ध केले. ‘गेलो होतो रानात, गावाच्या शिवारात’ ही त्यांची रचना त्यावेळी गाजली.

हळूहळू देवदत्तजींना चाली बांधणे आवडू लागले आणि त्यातूनच या दोन गीतांच्या चाली त्यांना सुचल्या. गंमत म्हणजे ‘ही चाल तुरुतुरु..’ हे शब्द मिळण्याआधी चाल लक्षात राहावी म्हणून ‘डोईवर घागर, पाण्यानं भरलेली, तुझी घागर डचमळली’ हे डमी शब्द त्यांनी लिहून ठेवले होते; तर ‘मनाच्या धुंदीत..’ हे शब्द मिळण्याआधी ‘दिलाच्या पायघडय़ावरून ये ना, सख्या रे साजणा, ये ना’ हे डमी शब्द त्यांनी घेतले होते. देवदत्तजी सुटीत मुंबईच्या घरी आले असताना एक दिवस घरात शाहीर साबळे यांच्या बांगलादेशच्या पोवाडय़ाची तालीम सुरू होती. त्या तालमीत वेळ मिळताक्षणी देवदत्तजींनी संगीतकार श्रीनिवास खळेंना डमी शब्दांतल्या या दोन चाली ऐकवल्या. त्यांना त्या खूप आवडल्या. खळेजी म्हणाले, ‘गाण्यांत ओघ आणि शब्दरचना परिपूर्ण असायला हवी. म्हणून ही दोन्ही गीते शान्ताबाई शेळके यांच्याकडून लिहून घेऊ.’ शान्ताबाईंनी लगेचच गाणी लिहून दिली. जयवंतराव अक्षरश: विद्यार्थ्यांच्या भावनेने दोन्ही चाली शिकले. ही गोष्ट १९७१ सालची. त्यावेळी देवदत्त साबळेंचे वय होते अवघे १८ वर्षे!

‘मनाच्या धुंदीत..’ या गीताच्या आरंभीच्या म्युझिकमध्ये ओबो हे वाद्य वाजवले आहे. सनईसारखे तोंडाने फुंक  मारून वाजवायचे हे वाद्य आहे. याचा ‘लिड’ मोठय़ा आकाराचा असतो. या गीताचे अ‍ॅरेंजिंग सुरेश यादव या सॅक्सोफोन वादकाने केले आहे. ओबोसाठी शंकर, अ‍ॅकॉर्डियनसाठी भरत, गिटारवादक अजित, ढोलकीसाठी जामगांवकर व रमेश लाखण आणि वादक प्रकाश वडनेरे अशी वादक मंडळी  होती. त्यातील डुग्गीतरंगचा इफेक्ट स्वत: देवदत्त साबळेंनी वाजविला. तसेच ‘माझे डोळे शिणले ग..’ या शब्दांनंतर येणारी ‘ये, ये, ये, ये..’ ही प्रतिभा संगीतकाराची! ‘ही चाल तुरुतुरु..’ या गीतासाठीही हेच वादक होते. त्यातील ऱ्हिदम कसा हवा, बदल, पॉजेस कसे हवेत हे देवदत्तजींनी सांगितले. सोपी संगीतरचना, ओघवते शब्द, उत्तम वाद्यमेळ यामुळे ही दोन्ही गाणी तुफान लोकप्रिय झाली. अलीकडे दूरदर्शनवर एका रशियन व्हायोलिनवादक तरुणीने चक्क ‘ही चाल तुरुतुरु..’ हे गीत गायले. ‘ही दोन्ही गीते माझी ओळख बनली,’ असे देवदत्तजी सांगतात. नंतरच्या काळात त्यांनी वडिलांच्या ग्रुपमध्ये गीतकार- संगीतकार- नायक अशा विविध भूमिका साकारल्या. ‘महाराष्ट्राची लोकधारा’मधील धनगरगीत आणि गोंधळगीत देवदत्तजींनी लिहिली आणि संगीतबद्ध केली आहेत.

‘कोंडू हवालदार’ (१९७५) या लोकनाटय़ाचे त्यांनी केलेले संगीत गाजले आणि त्यातील ‘अहो फिल्लमवालं पावनं जरा ऐका’ हे गीत खूप गाजले. या नाटकात नृत्यकलाकार माया जाधव प्रमुख भूमिकेत होत्या. गीतलेखन विनायक राहतेकर यांचे, तर दत्ता डावजेकरांनी काही चाली बांधल्या होत्या. त्यामुळे नाटकाच्या जाहिरातीत डावजेकरांसह देवदत्तजींचे नाव झळकले. ‘झुलवा’ या माइलस्टोन नाटकाचे संगीतही देवदत्तजींनी केले. या नाटकाला त्यांनी दुपदरी संगीत दिले. एक म्हणजे यल्लम्मा देवीची गाण्यांचे संगीत आणि कथानक पुढे नेणारी सूत्रधाराची गाणी. एकूण ३४ गाणी या नाटकात होती. विशेष म्हणजे ही दोन्ही पद्धतीची गाणी रसिकांना आवडली. ‘दुसरा सामना’ या नाटकाचे पाश्र्वसंगीत, तसेच पृथ्वी थिएटरसाठी ‘राजदर्शन’, ‘सैंया भये कोतवाल’, ‘गधे की बारात’ या हिंदी नाटकांसाठीही त्यांनी संगीत दिले. अगदी अलीकडे देवदत्तजींनी आपला पुत्र दिग्दर्शक शिवदर्शन साबळे याच्या ‘कॅनव्हास’ आणि ‘अजब लग्नाची गजब गोष्ट’ या चित्रपटांसाठीही गाणी केली. धाकटा मुलगा अभिनेता हेमराज साबळे याच्यासाठी नाटकाची गीते संगीतबद्ध केली. ‘बकुळा नामदेव’ या चित्रपटातील त्यांची गीते रसिकांना आवडली.

विनायक जोशी

vinayakpjoshi@yahoo.com