25 February 2021

News Flash

‘माती सांगे कुंभाराला, पायी मज तुडविसी..’

गोविंद पोवळे यांचे वास्तव्य १९३२ पासून- म्हणजे त्यांच्या जन्मापासून पनवेलजवळील चिरनेर येथे होते.

गोविंद पोवळे

काही वर्षांपूर्वी पुण्यामधील एका समारंभात कवी-गीतकार सुधीर मोघे म्हणाले.. ‘आजचे सत्कारमूर्ती म्हणजे वाटवे युगाचा सर्वार्थाने शेवटचा शिलेदार.. जो नव्या काळाशीसुद्धा जोडला गेलाय.’ हे उद्गार ज्यांच्याबद्दल होते ते कलाकार म्हणजे गायक-संगीतकार गोविंद पोवळे. आज वयाच्या ८५ व्या वर्षी मुंबईत आपल्या सुगम गायन क्लासमध्ये रोज चार-चार तास गायन शिकवण्यामध्ये व्यग्र असलेले गायक गोविंद पोवळे माझ्याशी भरभरून बोलत होते. अनेक आठवणी सांगत होते. शेकडो शिष्य घडवण्याचे काम आजही ते आनंदाने करत आहेत. गेली सत्तर वर्षे आकाशवाणीवर ते गात आहेत. अगदी चारच महिन्यांपूर्वी पाच गीतांचे काम त्यांनी आकाशवाणीसाठी केले.

गोविंद पोवळे यांचे वास्तव्य १९३२ पासून- म्हणजे त्यांच्या जन्मापासून पनवेलजवळील चिरनेर येथे होते. त्यांचे शालेय शिक्षणसुद्धा पनवेलमध्येच झाले. त्यांचे वडील त्रिंबक लक्ष्मण पोवळे हे कीर्तनकार होते. पोवळे घराण्यात एकूण नऊ भाऊ व दोन बहिणी असे त्यांचे मोठे कुटुंब होते. थोरले बंधू गोपीनाथ पोवळे हे रेडिओवर गात असत. ते कार्यक्रमदेखील करत. त्यांच्या कार्यक्रमातील मध्यान्तरात गोविंद पोवळे यांना एखादे गाणे गायची हमखास संधी मिळे. त्यादरम्यान गोविंदराव गायनाचे वेगवेगळे कार्यक्रम ऐकण्यासाठी सर्वत्र जात असत. त्यावेळचे ते गायक दोन गाण्यांच्या मधे रसिकांशी संवाद करायचे. म्हणून शाळेत असताना (व्ही. के. हायस्कूल, पनवेल) गोविंद पोवळे यांनी वादस्पर्धेत भाग घेतला. त्यानिमित्ताने आपल्याला बोलण्याचा सराव होईल असे त्यांना वाटे. वयाच्या पंधराव्या वर्षी आईकडे दोन रुपये मागून त्यांनी ‘मला मुंबईला जायचे आहे,’ असे तिला सांगितले. त्यावेळी पनवेल ते मुंबई गाडीचे तिकीट सहा आणे होते. मुंबईत धोबीतलाव येथे त्याकाळी रेडिओ स्टेशन होते. त्यावेळी दिनकर अमेंबल तिथे होते. गोविंदरावांनी त्यांना सांगितले, ‘मला ऑडिशनची संधी द्या. माझा स्वर काळी तीन आहे.’ रेकॉर्डिग स्टुडिओचा लाल लाइट लागला आणि गोविंदरावांनी गदिमांचे एक गाणे म्हटले.. ‘कशानं बाई काजळला गं हात..’ पण लाल लाइट लगेचच बंद झाला. गोविंदरावांना वाटले, आपण नापास झालो. पण अधिकारी धावत येऊन म्हणाले, ‘आम्हाला चांगला कलाकार मिळाला.’

३० मार्च १९४८ रोजी गोविंद पोवळे यांचा रेडिओवर पहिला कार्यक्रम झाला. तेव्हापासून रेडिओवर सर्वात लहान कलाकार म्हणून ते प्रसिद्ध झाले. उस्ताद अल्लारखाँसाहेब त्यावेळी तिथे होते. ‘आईये छोटा आर्टिस्ट’ असे ते त्यांना नेहमी म्हणायचे. ‘त्यावेळी ‘वन मॅन शो’ करणारे आम्ही सातजण होतो,’ असे गोविंदराव सांगतात. म्हणजे  आम्ही पेटी वाजवत गात असू आणि  तबलासाथीला एक कलाकार. गजानन वाटवे, सुधीर फडके, आर. एन. पराडकर, दशरथ पुजारी, विठ्ठल शिंदे, दत्ता वाळवेकर आणि गोविंद पोवळे हे ते सातजण. ‘एच. एम. व्ही.च्या कामेरकरांनी माझे कार्यक्रम ऐकले आणि वयाच्या सतराव्या वर्षी मी या कंपनीसाठी पहिले गीत ध्वनिमुद्रित केले..’ पोवळे सांगत होते.

‘गोदाकाठी माझ्या इथल्या प्रभूचि अवतरले

उमटली रामाची पाऊले’

गीत योगेश्वर अभ्यंकर यांचे आणि गायिका होत्या जानकी अय्यर. त्यानंतर लगेचच माणिक वर्मा यांच्या स्वरात दोन गाणी ध्वनिमुद्रित झाली. ‘पैंजण हरीची वाजली’ आणि ‘शुभंकरोती कल्याणम्’ ही ती दोन गीते. त्यावेळी रेकॉर्ड दीड रुपये किमतीला उपलब्ध असे.

१९५७ साली पोवळेंनी गिरगावमध्ये सुगम गायनाचे क्लासेस सुरू केले. एकदा क्लासमध्ये गोविंदरावांना भेटण्यासाठी डोंबिवलीहून गीतकार मधुकर जोशी आले. त्यांनी त्यांना आपली पाच-सहा गीते दिली. त्यातली दोन गीते गोविंद पोवळे यांनी निवडली व स्वरबद्ध केली. कोलंबिया रेकॉर्ड कंपनीकडे ते गेले व त्यांच्या स्वत:च्या आवाजात ती गाणी ध्वनिमुद्रित झाली. त्यातील ‘माती सांगे कुंभाराला’ हे गीत प्रचंड लोकप्रिय झाले. काही वर्षांनंतर ‘मिलेनियम साँग्ज’मध्ये ते समाविष्ट केले गेले. गीतकार मधुकर जोशींचे शब्द आगळे सत्य सांगणारे होते..

‘माती सांगे कुंभाराला पायी मज तुडविसी

तुझाच आहे शेवट वेडय़ा माझ्या पायाशी, रे।

मला फिरवीशी तू चाकावर

घट मातीचे घडवी सुंदर

लग्नमंडपी कधी असे मी, कधी शवापाशी।

वीर धुरंधर आले गेले

पायी माझ्या इथे झोपले

कुब्जा अथवा मोहक युवती, अंती मजपाशी ।

गर्वाने का ताठ राहसी

भाग्य कशाला उगा नासशी

तुझ्या ललाटी अखेर लिहिले मीलन माझ्याशी।’

साधे, सोपे शब्द आणि तेही नेमक्या स्वरात बांधलेले; त्यामुळे हे गीत रसिकमान्य झाले. त्याचबरोबर गोविंद पोवळे यांचे भावपूर्ण गायन ही गोष्टही महत्त्वाची आहेच. दुसरे गीतसुद्धा रोजच्या व्यवहारातील अर्थ सांगणारे असे आहे..

‘गोल असे ही दुनिया आणिक गोल असे रुपया

सूर्य फिरे हा पृथ्वीभवती,

फिरते रुपयाभोवती दुनिया।

फसवाफसवी करून लबाडय़ा,

धनिकांच्या त्या चालती पेढय़ा

हवेशीर त्या रंगीत माडय़ा

गरिबाला नच थारा वेडय़ा नसता जवळी माया।

मजूर राबती हुजूर हासती, घामावरती दाम वेचिती

तिकिटावरती अश्व धावती

पोटासाठी करिती विक्रय अबला अपुली काया।

नाण्यावरती नाचे मैना, अभिमानाच्या झुकती माना

झोपडीत ते बाळ भुकेले

दूध तयाला पाजायास्तव नाही कवडी-माया

फिरते रुपयाभोवती दुनिया..’

परिस्थितीचे विदारक, पण सत्य चित्र या गीतात चितारलेले आहे. श्रोत्यांच्या मनातली भावनाच या गीतामध्ये अवतरली आहे. या गीतांसह गीतकार मधुकर जोशी आणि गायक-संगीतकार गोविंद पोवळे या जोडीची आणखी दोन गीते रेकॉर्ड झाली.

‘धागा धागा शोधित फिरशी का वेडय़ा उन्हात

अखेर तुजला जागा लागे साडेतीन हात..’

आणि दुसरे गीत..

‘पुन्हा पुन्हा तू कशांस बघसी आरशात मुखडा

तुझे तुला प्रतिबिंब सांगते तू माणूस वेडा।’

मधुकर जोशी यांचे शब्द समजायला सोपे, सहज आलेले असे असतात. त्यांची हीच गोष्ट गायक-संगीतकार गोविंद पोवळे यांना आवडली.

मधल्या काळात गायक-संगीतकार गोविंद पोवळे यांनी गायिका सुमन कल्याणपूर यांच्याकडून दोन गीते गाऊन घेतली. ती दोन्ही गीते कमालीची लोकप्रिय झाली.

‘कामधाम संसार विसरली

हरिभजनी रंगली, राधिका, हरिभजनी रंगली..’

आणि दुसरे गीत..

‘देऊळातल्या देवा या हो उतरा ही पायरी

थांबली बहिणाई दारी..’

यापैकी ‘कामधाम संसार’ या गीताचे संगीतकार वसंत प्रभू यांनी कौतुक केले तेव्हा गोविंदराव म्हणाले, ‘‘अहो, तुमच्या ‘आली हासत..’ या गीतावरून मला ही चाल सुचली.’’ त्यावर वसंतराव म्हणाले, ‘‘माझ्या गीतावरून तुला ही चाल सुचली हे मला समजले नाही, हे तुमचे यश आहे.’’ पुढील काळात गोविंद पोवळे यांनी ‘महाराष्ट्र सुगम संगीत समिती’ स्थापन केली. त्यात प्रवेशिका, प्रथमा, सुबोध, सुगमा, प्रवीण, अलंकार अशा परीक्षांचा अभ्यासक्रम तयार केला. हजारो विद्यार्थी दरवर्षी या परीक्षा देतात. भावगीतांच्या प्रवासातील हा एक लक्षवेधी प्रयत्न आहे.

गेली अनेक वर्षे डोंबिवलीकर असलेले गीतकार मधुकर जोशी यांचे बालपण नाशिकमध्ये गेले. पुढे नाशिकमधील वास्तव्यात अनेक साहित्यिकांशी त्यांच्या ओळखी झाल्या. वि. वा. शिरवाडकर, वसंत कानेटकर, कृ. ब. निकुंब यांच्यासह ‘गावकरी’चे संपादक पोतनीस आदी मंडळींचा सहवास त्यांना मिळाला. मधुकर जोशींचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना लगेचच एक्साइज डिपार्टमेंटमध्ये नोकरी लागली. या सगळ्या व्यापांत वेळ मिळेल तेव्हा ते कविता करत. भावगीते करत. रेडिओचे तर ते मान्यताप्राप्त कवी झाले. कंपनीने त्यांची गीते संगीतकारांकडे देऊन रेकॉर्ड केली. या भावगीतांसह मधुकर जोशी यांनी चरित्रात्मक गीतांचीही रचना केली. त्यात महाभारत, स्वामी समर्थ गीतांजली, श्रीसाईबाबा चरित्र, नानामहाराज तराणेकर चरित्र अशा अनेक गीतमाला रचल्या. रणजित देसाई यांच्या ‘स्वामी’ कादंबरीवर आधारित ‘कथा गोड शाहीर गाती रमा-माधवाची’ ही गीतमाला लिहिली. तसेच अथर्वशीर्ष, श्रीरामरक्षास्तोत्र यांचे भावार्थरूप मराठीमध्ये गीतबद्ध केले. लोकप्रिय गीतकार गंगाधर महाम्बरे यांनी एका कार्यक्रमात मधुकर जोशींचे कौतुक करताना त्यांना ‘महाराष्ट्राचे बुधकौशिक’ उपाधी देऊन त्यांचा गौरव केला. डोंबिवलीभूषण मधुकर जोशी यांची गीते अनेक संगीतकारांनी स्वरबद्ध केली. गायक-संगीतकार वसंत वाळुंजकर यांनीदेखील मधुकररावांची काही गीते संगीतबद्ध केली अन् गायली. गायक-संगीतकार गोविंद पोवळे यांचे एक गीत.. ‘राम सर्वागी सावळा, हेम अलंकार पिवळा..’ हे आकाशवाणीच्या मुंबई, औरंगाबाद, नागपूर, जळगाव, गोवा या केंद्रांवरून प्रसारित झाले आणि गाजले. त्यांचे दोन्ही सुपुत्र सुयोग आणि सुरदास तसेच कन्या स्मिता (औंध, पुणे) हे संगीत क्लासेसमध्ये मुंबई व पुणे येथे असंख्य विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देत आहेत.

भावगीतांच्या प्रवासातील गाणी, आठवणी सांगताना गोविंद पोवळे आवर्जून कवी रमण रणदिवेंच्या कवितेचा उल्लेख करतात..

‘ज्याच्या गळ्यात गाणे तो भाग्यवंत आहे

गातो अजून मीही म्हणूनि जिवंत आहे..’

विनायक जोशी vinayakpjoshi@yahoo.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2017 2:24 am

Web Title: govind powle marathi bhavgeet
Next Stories
1 ‘तोच चंद्रमा नभात, तीच चैत्रयामिनी..’
2 ‘पत्र तुझे ते येता अवचित, लाली गाली खुलते नकळत..’
3 ‘तुझे गीत गाण्यासाठी..’
Just Now!
X