१९२७-२८ च्या सुमाराचा एक प्रसंग. शाळांमधून संगीत हा विषय शिकवायला तेव्हा सुरुवात झाली होती. एका शाळेत संगीत-शिक्षिकेची जागा रिक्त होती. त्यासाठी गायिका हिराबाई जव्हेरी मुलाखतीला गेल्या. या मुलाखतीत गाणे म्हणणे आवश्यक होते. त्या काळात स्त्रियांनी गायन मैफल करणे हे समाजमान्य नव्हते. नोकरीसाठी झालेल्या मुलाखतीत हिराबाई गाण्यास राजी होत्या, परंतु त्यांना साथ करण्यासाठी कोणी वादक मिळेना. तेव्हा हिराबाईंनी आधी पेटीवर सूर धरला, तो मनात साठवला आणि मग स्वत:च तबला वाजवून गाणे गायले. ती नोकरी त्यांना मिळाली. परंतु गाण्यासाठी कोणी साथ करेना, हा सल मात्र त्यांच्या मनात कायम राहिला.

अशा संगीतसंपन्न घरात एका गायिकेचा जन्म झाला. तिच्या गळ्यात संगीत रुजले. बहरले. मराठी भावगीत-प्रवासात पुढील काळात हे नाव महत्त्वाचे ठरले. ते नाव म्हणजे सुप्रसिद्ध गायिका मधुबाला चावला! गायिका हिराबाई जव्हेरी यांच्या कन्या! मधुबालाबाईंच्या मावशी श्यामला माजगावकर याही उत्तम गायिका होत्या. हिराबाई व श्यामलाबाई यांनी १९२९ मध्ये स्वामी समर्थ संगीत विद्यालयाची स्थापना केली. विशेष म्हणजे हे विद्यालय महिलांनी महिलांसाठी चालवलेलं मुंबईतील पहिले संगीत विद्यालय. तिथे सर्व वाद्येसुद्धा महिलाच वाजवीत.

Indian Man who earns Rs 5 crore daily his parents wanted him to pursue PhD Google CEO Sundar Pichai Daily Salary Morning Habits
भारतीय तरुणाला दिवसाचा पगार ५ कोटी, नावाचा जगभर डंका; आई वडिलांची इच्छा होती PhD करावी पण त्यानं..
Best Bus Monthly Pass Rate Increase Mumbai
बेस्टचा पास महागला; पासधारकांच्या खिशाला कात्री
dwarka pm modi
प्राचीन द्वारका नगरीच्या दर्शनातून पंतप्रधान मोदींचा अहिर समुदायाला संदेश
Yash Mittal Murder Noida
व्यावसायिकाच्या मुलाची चार मित्रांकडून हत्या; वडिलांकडून मागितली सहा कोटींची खंडणी

गायिका मधुबाला चावला यांनी याच विद्यालयात संगीताचे प्राथमिक शिक्षण घेतले. आई आणि मावशीकडून संगीताचा उत्तम वारसा त्यांना लाभला. विद्यालयातील कार्यक्रमांतून मधुबालाबाईंना गायनाची संधी मिळत गेली. पुढे १९५०-६० च्या दशकारंभी विविध संगीतकारांनी मधुबाला चावला यांच्याकडून गीते गाऊन घेतली. मराठी भावगीतांच्या प्रवासात या स्वराने भरीव योगदान दिले. त्यांच्या एका गाजलेल्या भावगीताने रसिकांना आपलेसे केले. गीतकार संजीवनी मराठे, संगीतकार यशवंत देव आणि गायिका मधुबाला चावला या त्रयीचे आजही रसिकांच्या स्मरणात राहिलेले आणि श्रोत्यांनी पसंतीचा कौल दिलेले गीत म्हणजे- ‘जीवाच्या जिवलगा नंदलाला रे..’

तुमच्या नावावर किमान एक सुपरहिट गीत हवंच, ही संकल्पना तेव्हापासून रुजू आहे. ‘जीवाच्या जिवलगा..’ या गीताच्या अमाप लोकप्रियतेमुळे गायिका मधुबाला चावला यांना हिंदीतील संगीतकारांनी गायनासाठी बोलावले अन् चित्रपटांसाठी पाश्र्वगायनाचे दरवाजे त्यांच्यासाठी खुले झाले.

‘जीवाच्या जिवलगा नंदलाला रे

नंदलाला रे, नंदलाला रे।

यमुनेत तुझ्या माझ्या बिंब मुखाचे

बासरीत तुझ्या माझ्या गीत सुखाचे

चुरला रे जीव माझा धुंद झाला रे।

चांदण्यांची नित्य नवी रासलीला रे

पाखरांच्या गळा नवी गीतमाला रे

कमलदलात नवा गंध आला रे।

माझ्या कानी ओळखीचा साद आला रे

प्रभू तुझ्या पावलांचा नाद झाला रे

धावले मी तुझ्या पदवंदनाला रे

नंदलाला रे, नंदलाला रे।’

संगीतकार यशवंत देव यांच्या कारकीर्दीच्या अगदी आरंभीच्या काळातील हे गीत. अतिशय आकर्षक असा आरंभीचा म्युझिक पीस, मुखडय़ाची उत्तम चाल आणि तिन्ही अंतरे वेगवेगळ्या चालींत- हा या गीताचा विशेष आहे. दुसऱ्या अंतऱ्यात पहिली ओळ म्हणताना शेवटी छोटय़ा तानेची जागा केलेली आहे. तसंच तिसऱ्या अंतऱ्यातील छोटय़ा आलापाची जागा दाद देण्यासारखी आहे. हे संपूर्ण गीत यशवंत देवांनी इतके उत्तम बांधले आहे, की कुठल्याही गायिकेला हे गीत म्हणण्याचा मोह होतो. मूळ गायिका मधुबाला चावला यांनी हे गीत गोड गायले आहे. मुखडय़ातील ‘नंदलाला रे’ हा शब्द तीन वेळा आणि वेगवेगळ्या स्वरांत बांधलेला आहे. मधुर शब्द आणि तितकाच मधुर स्वर यांचा जणू संगमच झाला आहे! शब्दांतला भाव संपूर्ण गीतात भरून राहिला आहे.

ज्या स्वामी समर्थ संगीत विद्यालयात मधुबाला चावला यांनी संगीत शिक्षण घेतले त्याच विद्यालयात पुढे अभिनेत्री म्हणून नावारूपाला आलेल्या नलिनी जयवंत आणि जयश्री गडकर या गायन शिकण्यासाठी येत असत. गायिका मोहनतारा अजिंक्य यासुद्धा याच विद्यालयाच्या विद्यार्थिनी. त्या काळात मध्यमवर्गीय घरातील मुलींना गाणे शिकता यावे म्हणून या विद्यालयात महिना फक्त तीन रुपये इतकीच फी होती. एका संगीत कार्यक्रमात संगीतकार स्नेहल भाटकरांनी मधुबालाबाईंचे गाणे ऐकले आणि लगेचच एका चित्रपट गीतातील दोन ओळींसाठी का होईना, भाटकरांनी त्यांना स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यासह गाण्याची संधी दिली. ते गाणे ऐकून संगीतकार हंसराज बहेल यांनी मधुबालाबाईंच्या आवाजाचे कौतुक केले. पुढे काही चित्रपटांसाठी त्यांनी या मधुर आवाजाचा उचित असा उपयोगही केला. हिंदी चित्रगीतांमध्ये मधुबालाबाईंनी मुकेश, मोहम्मद रफी, तलत महमूद यांच्यासह युगुलगीते गायली. सी. रामचंद्र यांनी ‘झांजिबार’ चित्रपटासाठी, तर संगीतकार जमाल सेन यांनी ‘कस्तुरी’ आणि ‘धर्मपत्नी’ या चित्रपटांसाठी त्यांचा आवाज वापरला. शंकर-जयकिशन यांच्या ‘बूट पॉलिश’ चित्रपटातील गीतातही मधुबालाबाईंचा आवाज आहे. त्यांच्याकडे शास्त्रीय संगीताची बैठक होती व गायनासाठी आवश्यक असा उत्तम दमसासही होता. ‘सांगत्ये ऐका’ या चित्रपटातील प्रदीर्घ ‘वग’ त्यांनी एका टेकमध्ये ओके केला. पुढील काळात वसंत पवार, श्रीधर पार्सेकर, सुधीर फडके, राम कदम या संगीतकारांनी मधुबालाबाईंना गाणी दिली. नागपूरमधील एका अधिवेशनात त्यांना पं. जवाहरलाल नेहरू यांच्यासमोर गायनाची संधी मिळाली. मान्यवर गायकांसह त्यांनी परदेश दौरेही केले. पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या ‘भावसरगम’ या मंचीय कार्यक्रमातही मधुबालाबाईंचे योगदान असे.

कवयित्री संजीवनी मराठे या १९३२-३३ साली रसिकांसमोर आल्या. त्यावेळचे कोल्हापूरचे साहित्य संमेलन त्यास कारणीभूत ठरले. काव्यवाचनासह त्या काव्यगायनही करीत असत. त्यांचा आवाज श्रवणीय होता. श्रोत्यांनी अशा प्रकारच्या काव्यगायनाला स्वीकारले. शास्त्रीय गायक पं. विनायकबुवा पटवर्धन यांनी संजीवनीबाईंकडून बरीच पदे लिहून घेतली. त्यांच्या काव्यात आपसूक गेयता येऊ लागली. ‘जे गुणगुणावेसे वाटते, ज्यात भावोत्कटता आणि नादमयता असते ते गीत..’ असे संजीवनीबाईंचे मत होते.

‘गाण्याचे गोड वेड दिवसभरी मज जडले

जे सुंदर त्यावर मी गाणे गुंफित बसले..’

अशी त्यांची त्याकाळी भावावस्था होती. विविध वाद्यांवर हुकूमत असणारे त्यांचे वडील आणि आई हे त्यांचे प्रेरणास्थान होते. कविता करण्यासाठी त्यांना वडिलांचे पाठबळ होते. कवी यशवंत, गिरीश, भा. रा. तांबे, रवींद्रनाथ, माधव ज्युलियन यांच्या कवितांचे संस्कार त्यांच्यावर होते. संजीवनीबाईंची कविता गायनानुकूल होऊ लागली. लयबद्ध रचनांमध्ये भाव व स्वराचा संगम झाला. ‘जीवाच्या जिवलगा..’ या गीतात ‘नंदलाला रे, धुंद झाला रे, गंध आला रे, पदवंदनाला रे’ अशी नादमय शब्दांची पखरण आहे. हे सर्व शब्द सहज गुणगुणताना सुचले असावेत असे वाटते. मुखडय़ामधील आणि अंतऱ्यामधील ‘रे’ या शेवटच्या अक्षरामुळे भावनिर्मिती झाली. या कवयित्रीच्या अन्य काही कवितांमध्येसुद्धा ‘रे’ आलेला आढळतो. ‘मजमुळे तुझे जनात होतसे हसे रे’, ‘मोगरीचे बहर आज सुकूनि चालले रे’ किंवा ‘प्रीतिची ही रित का रे’ या ओळींमध्येसुद्धा ‘रे’ हे अक्षर मात्रा आणि भावना या दोन्हींसाठी उपयोगी ठरले. त्या अक्षरात ‘अरे-तुरे’चा भाव नसून आपुलकीचा भाव आहे. काव्यगायनामुळे त्यांची कविता जास्त रसिकांपर्यंत पोहोचली. पुढे त्यांची कविता संगीतकारांनी स्वरबद्ध केलेल्या भावगीतांच्या रूपात रसिकांना भेटत राहिली. ‘राका’(१९३८) या त्यांच्या काव्यसंग्रहात लोकप्रिय चित्रगीतांच्या चालीवर रचलेली गीते आढळतात. संजीवनीबाई काव्यमैफलीत तबला-पेटीची साथ न घेता गात असत. तशा पद्धतीने गायलेले काव्य त्यांच्या आवाजात ध्वनिमुद्रितही झाले झाले. ‘सांग कधी मम दारावरून जाशील’ किंवा ‘स्तब्ध उभा गडे करी धरूनी बासरी’ हे त्यांचे काव्यगायन गाजले. ‘बाळ करी झोपला’ आणि ‘कैसे करू बोलू काय’ या रेकॉर्डमधील गाण्याचा आवाज संजीवनीबाईंचा आहे. या सर्व बाबींमुळे भावगीत- प्रवासात कवयित्री संजीवनी मराठे यांचे योगदान मोलाचे ठरले आहे.

गायिका मधुबाला चावला यांच्या मातोश्री हिराबाई जव्हेरी यांनीही संजीवनी मराठे यांचे एक गीत संगीतबद्ध केले होते. ‘अंबरात नाजुकशी चंद्रकोर हासे’ हे ते गीत. हे गीत पुढील काळात संगीतकार यशवंत देव यांनी मधुबालाबरईकडून पुन्हा गाऊन घेतले. या गीताच्या लोकप्रियतेमुळे लगेच एच. एम. व्ही. कंपनीने त्याची ध्वनिमुद्रिकाही काढली.

‘अंबरात नाजुकशी चंद्रकोर हासे

मंदिरात का गं सखे सोडिसी उसासे।

कुस्करूनी टाकिलीस माळ ही कळ्यांची

चालविली उघडझाप नेत्र पाकळ्यांची

मोकळाच केशपाश वसन तुझे साधे

का धरिसी हरीवरती मधुरूसवा राधे।

कंसदमन करण्या हरी मथुरेला गेलेला

येईल परतूनी खचित घेऊनी जयमाला

रथ दारी राही उभा कोण गे तयात

आण गडे पंचारती आले यदुनाथ

प्रणय सागरावरती रमणीहृदय नाचे

अंबरात नाजुकशी चंद्रकोर हासे।’

यशवंत देव हे श्रोत्यांच्या मनात शब्दप्रधान गायकी रुजविणारे संगीतकार आहेत. अशा गायकीला त्यांनी अभ्यासरूप दिले. गीत कसे असावे, चाल कशी बांधावी, गीताची चाल त्यातील आशय सांगणारी आहे का, प्रत्येक शब्दाचा उच्चार गायक-गायिकेने योग्य तऱ्हेने केला आहे का, गायकाचा कवितेचा अभ्यास असावा का, वाद्यमेळातील उचित वाद्यांचा पूरक उपयोग केला गेलाय का, मात्रा-लय-ताल हे समीकरण जुळले आहे का.. अशा प्रश्नांना संगीतकार यशवंत देव यांच्याकडे सप्रयोग उत्तर आहे. शास्त्र तळाशी जाऊन समजावणे ही त्यांची आवड आहे.

भावगीतामध्ये गायिक, गीतकार, संगीतकार या तिन्ही घटकांचे एकत्रितरीत्या उत्तम काम झाले तर ते गीत रसिकांच्या नक्की आवडीचे होतेच. ‘जीवाच्या जिवलगा..’ हे साठ वर्षांपूर्वीचे गीत म्हणूनच रसिकांचे ‘जीवलग’ झाले आहे!

विनायक जोशी

vinayakpjoshi@yahoo.com