08 March 2021

News Flash

‘निघालो घेऊन दत्ताची पालखी..’

मार्गशीर्ष पौर्णिमा आली आणि एक गाणे माझ्यासमोर ‘दत्त’ म्हणून उभे राहिले आणि भक्तिभावाने मी हात जोडले.

संगीतकार नंदू होनप , गायक अजित कडकडे

मार्गशीर्ष पौर्णिमा आली आणि एक गाणे माझ्यासमोर ‘दत्त’ म्हणून उभे राहिले आणि भक्तिभावाने मी हात जोडले. या गाण्यामुळे रसिकांना दत्ताच्या पालखीचे भोई होण्याचं समाधान मिळालं आहे. ही किमया साधणारी त्रिमूर्ती आहे-गीतकार प्रवीण दवणे, संगीतकार नंदू होनप आणि गायक अजित कडकडे. दत्तगीतांमधील अत्तर ठरलेलं हे गाणं..

‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।

निघालो घेऊनी दत्ताची पालखी

आम्ही भाग्यवान आनंद निधान

झुलते हळूच दत्ताची पालखी।

रत्नांची आरास साज मखमली

त्यावर सुगंधी फुले गोड ओली

झुळुक कोवळी चंदनासारखी।

सातजन्मांची ही लाभली पुण्याई

म्हणून जाहलो पालखीचे भोई

शांत माया मूर्ती पहाटेसारखी।

वाट वळणाची जीवाला या ओढी

दिसते समोर नरसोबाची वाडी

डोळीयात गंगा जाहली बोलकी।’

या ध्वनिमुद्रित गीतामध्ये गजर सुरू होण्यापूर्वी गायक अजित कडकडे यांच्या स्वरातील ‘गुरुब्र्रह्मा गुरुर्विष्णु..’ हा गुरुमहती सांगणारा श्लोक म्हणजे निर्मळ, प्रासादिक आवाजाचा आनंद! हे गाणे ऐकताना ईश्वराची मानसपूजा करताना भक्तीची जी अवस्था असते त्यात आपण अगदी तल्लीन होतो. अन् ‘डोळीयात गंगा जाहली बोलकी’ ही भावावस्था कधी होते, ते कळतदेखील नाही.

संगीतकार नंदू होनप यांनी जेव्हा पहिलं गीत संगीतबद्ध केलं तेव्हापासून त्यांच्याकडे संगीत संयोजक म्हणून काम पाहणारे विलास जोगळेकर गेल्या पाच दशकांतल्या त्यांच्या संगीतप्रवासाच्या आठवणी सांगतात.. नंदूजींचे वडील विष्णू होनप हे जोगळेकरांच्या ‘संगीत कला मंदिर’ या संगीत शिकवणीमध्ये शिकवायचे. नंदू होनप यांच्या गीतांच्या संगीत संयोजनामध्ये हार्मोनियमसाठी विलास जोगळेकर, व्हायोलिनवर स्वत: नंदूजी, पखवाजसाठी माधव पवार, इतर तालवाद्यांसाठी दर्शन इंदोरकर, दीपक बोरकर, बासरीवादक सुधीर खांडेकर, गिटारवादक ज्ञानेश देव, व्हायब्रोफोनसाठी राजेश देव, सतारवादक शशांक कट्टी, कीबोर्डसाठी अरविंद हसबनीस, किशोर करमरकर, शशांक जोशी ही मंडळी असायची. नंदूजींनी मुंबई दूरदर्शनवर त्यांचं पहिलं गीत केलं आणि ते अतिशय गाजलं. त्यावेळी दूरदर्शनवर ‘फिर वही’ या नावाचा कार्यक्रम होता. त्यात नंदूजींचं गीत सादर झालं. ते गीत घेऊन ते कॅसेट कंपन्यांकडे जायचे. मात्र, कॅसेट गीताची पहिली संधी त्यांना ‘मोवॅक’ या कॅसेट कंपनीनं दिली. उत्तम मार्केटिंगचे तंत्र अवगत असलेला हा संगीतकार अष्टावधानी होता. पुढील काळात त्यांनी शेकडो भक्तिगीते केली. ‘दत्ताची पालखी..’ हा त्यातला कळस ठरला! कवी प्रवीण दवणेंच्या मनात ‘दत्ताची पालखी’ या गीतामुळे गुरुकृपेचं दालन उघडल्याची भावना आहे. ते सांगतात : ‘या गीतामुळे पंढरपूरच्या विठ्ठलापासून विमानतळाच्या सुरक्षा चाचणीपर्यंत सर्व प्रवेशाद्वारे माझ्यासाठी उघडी झाली. या गाण्याची ऊर्जा कणाकणांत सळसळते. माझ्यासारख्या कवीवर प्रचंड प्रयत्नवादाचे संस्कार करण्याचं श्रेय मी संगीतकार नंदू होनप यांना देईन. कोणत्याही कामाला ‘नाही’ म्हणायचं नाही, हा नंदूजींच्या पाठशाळेतील धडा आहे. नंदूजी नेहमी सांगत, की कुठलंही काम हे छोटं नसतं. ते आपल्या कर्तृत्वानं मोठं करायचं. आज तुला जे छोटं वाटणारं काम आहे तेच तुला उद्या कुठं घेऊन जाईल ते बघ..!’

दवणे यांचं बालपण नाशिकमध्ये गेलं. शालेय जीवनातच कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांची शाबासकी त्यांना मिळाली. साने गुरुजी कथामालेचा प्रभाव त्यांच्यावर होताच; शिवाय शाळकरी वयात त्यांनी कवी बा. भ. बोरकरांना ऐकलं आणि गेयता, लय, ताल या गोष्टी त्यांच्यात आपसूक भिनल्या. अमेरिकेचं यान चंद्रावर पोहोचलं तेव्हा दवणेंनी ‘अमेरिकेची आली दिवाळी’ ही पहिली कविता लिहिली. त्यावेळी ते बारा वर्षांचे होते. पुढे ते डोंबिवलीत वास्तव्याला आले. गीतकार ग. दि. माडगूळकर हे त्यांचे गीतगुरू. या काळात मुंबईत कविवर्य सुरेश भट यांच्याशी त्यांची भेट झाली. दवणेंच्या कविता वाचून भटांनी ‘नव्या युगातला रोमँटिक कवी’ असं त्यांचं वर्णन केलं. कवी शंकर वैद्य यांनी त्यांच्या कवितांना ‘निवड : शंकर वैद्य’ या कॉलममध्ये स्थान दिलं. दवणे सांगतात : ‘डोंबिवलीतील माझं वास्तव्य म्हणजे सांस्कृतिक प्रयोगशाळाच. इथं पु. भा. भावे, शं. ना. नवरे, प्रभाकर अत्रे भेटले. सुलोचनाबाई घोटीकरांनी मला ‘काव्यरसिक मंडळा’मध्ये प्रवेश दिला. वयाच्या बाविसाव्या वर्षी या काव्य मंडळाच्या संमेलनात मी अध्यक्ष झालो. गीतकार म्हणून माझा पाच दशकांचा प्रवास आहे. याचं श्रेय संगीतकार यशवंत देव आणि संगीतकार प्रभाकर पंडितांकडे जातं. आकाशवाणीचा ‘भावसरगम’ आणि दूरदर्शनवरील ‘शब्दांच्या पलीकडले’ हे कार्यक्रम माझ्या गीतलेखनासाठी महत्त्वाचे ठरले. सुहास कर्णिक आणि राजू पोतदार हे दोन मित्र म्हणजे ‘सुहास-राज’ हे माझ्या गीतांचे पहिले संगीतकार.’

पुढे ते ठाण्यात राहायला आले. ठाण्याने त्यांच्यातला व्यावसायिक कलाकार घडवला असं ते मानतात. ठाण्याच्या ज्ञानसाधना महाविद्यालयात त्यांनी ३२ वर्षे मराठीचं अध्यापन केलं. त्यांनी ४० ते ५० संगीतकारांकडे गीतलेखन केलं. नंदू होनप, अनिल-अरुण, अशोक पत्की, मीना खडीकर, विश्वनाथ मोरे, दशरथ पुजारी, श्रीधर फडके, अजय-अतुल, दीपक पाटेकर यांच्यासह मिलिंद जोशी, कौशल इनामदार, उदय चितळे या संगीतकारांनी त्यांची गीतं संगीतबद्ध केली आहेत. दवणे यांनी ज्या संगीतकारांबरोबर काम केलं त्या सर्वाबद्दल त्यांनी एका पुस्तकात मनापासून लिहिलंय. आरंभीच्या काळात इन्रेको कंपनीसाठी त्यांनी लिहिलेल्या बालगीतांमध्ये ‘फुलबाजांची झाडे’ हे गीत देवकी पंडित यांनी गायलं. ‘भक्तिरंग’ आल्बममुळे पं. अभिषेकीबुवांचा सहवास लाभला. महेश कोठारे, सचिन पिळगांवकर या अभिनेते-निर्मात्यांसाठी त्यांनी चित्रपटगीते लिहिली. आजवर सव्वाशे चित्रपटगीतं, ८५ पुस्तकं असं विपुल लेखन त्यांनी केलेलं आहे. ‘सावर रे’ या सदरानं त्यांना गद्य लेखकाचा चेहरा दिल्याचं ते सांगतात.

‘दत्ताची पालखी..’ या गीताचे गायक अजित कडकडे आणि संगीतकार नंदू होनप यांनी तब्बल ३२ वर्षे एकत्र काम केलं. कडकडे कुटुंब मूळचं गोव्यातील डिचोली या गावचं. घरच्यांनी त्यांना माडीये गुरुजींकडे गाणे शिकायला पाठवलं. गावात पं. अभिषेकीबुवांची मैफल ऐकली आणि त्यांच्याकडे गाणं शिकावं, हे नक्की झालं. वयाच्या विसाव्या वर्षांपासून बुवांकडे शिकवणी सुरू झाली. दिलीप कोल्हटकर दिग्दर्शित ‘संत गोरा कुंभार’ या नाटकात काम करण्याची पुढे संधी मिळाली. या नाटकातील अभिनयाच्या बळावर पुढे रघुवीर नेवरेकर दिग्दर्शित ‘संगीत संशयकल्लोळ’मध्ये अश्विनशेठची भूमिका मिळाली. या नाटकात ज्योत्स्ना भोळे यांच्या कन्या वंदना खांडेकर आणि स्वत: रघुवीर नेवरेकरही होते. या नाटकाने गायक-अभिनेता म्हणून कडकडे यांची ओळख दृढ झाली. पुढे ‘महानंदा’, ‘कुलवधू’, ‘कधीतरी कोठेतरी’ या नाटकांतूनही त्यांनी कामं केली. अभिषेकीबुवांकडे ११ वर्षे तालीम झाली. तर पं. गोविंदप्रसाद जयपूरवाले यांच्याकडे गजल, भक्तिगीतगायनाची तालीम त्यांना मिळाली. पुढे संगीतकार अशोक पत्कींनी ‘सजल नयन..’ हे गीत कडकडे यांच्याकडून गाऊन घेतलं. हे गीत अफाट लोकप्रिय झालं. संगीतकार प्रभाकर पंडितांकडे त्यांनी ‘देवाचिये द्वारी’ हा आल्बम गायला. टी-सीरीज कंपनीच्या ‘दत्ताची पालखी..’ या गीतानं तर लोकप्रियतेचा उच्चांक गाठला.

एक रसिक गीतकार दवणेंकडे दत्तगीतांची पोथी घेऊन आला आणि म्हणाला, ‘तुमच्या ‘दत्ताची पालखी..’ या गीताखाली ‘गीत पारंपरिक’ असं छापलं आहे.’ त्यावर दवणे म्हणाले, ‘चूक दुरूस्त करायला सांगण्यापेक्षा मी जिवंत असताना कविता ‘पारंपरिक’ झाली तर कवीला त्यासारखा आनंद नाही!’

विनायक जोशी vinayakpjoshi@yahoo.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2017 12:41 am

Web Title: musician nandu honap singer ajit kadkade marathi songs bhavgeet
Next Stories
1 ‘तुला पाहिले मी नदीच्या किनारी..’
2 ‘हा रुसवा सोड सखे..’
3 ‘सखि, मंद झाल्या तारका..’
Just Now!
X