भावगीताच्या वाटचालीत वेगळी शब्दयोजना आणि संगीतरचनांमध्ये वेगळा बाज दिसू लागला. वाद्यमेळातसुद्धा वेगळ्या वाद्यांचा उपयोग दिसू लागला. संगीतरचनेला अनुकूल अशा वाद्यांचा अंतर्भाव होऊ लागला. गीतकार वेगळा, संगीतकार वेगळ्या पठडीतल्या चाली देणारा असे झाल्यावर आवाजही वेगळा हवाच. काही भावगीतांमध्ये वेगळा आवाज, म्हणजे किती वेगळा.. तर चक्क मराठी भावगीतासाठी अमराठी गायकाचा आवाज घेतला गेला. ते गायक म्हणजे- जगप्रसिद्ध पाश्र्वगायक महंमद रफी. रफीसाहेबांच्या मधुर आणि सुरेल आवाजातील मराठी गाणी हे एक स्वतंत्र विश्व आहे. असे वेगळे विश्व निर्माण करणारे संगीतकार श्रीकांत ठाकरे आणि गीतकार वंदना विटणकर. या गीतकार-संगीतकार-गायक त्रयीने अनेक उत्तम मराठी भावगीते दिली. त्यातील गाजलेले एक गीत म्हणजे-

‘हा रुसवा सोड सखे! पुरे हा बहाणा

Loksatta kutuhal Artificial intelligence that avoids potholes
कुतूहल: खड्डे चुकवणारी कृत्रिम बुद्धिमत्ता!
conceit of painter whose exhibition made critics take the term Ambedkari art seriously
हे विचार, हे जगणं दृश्यात आणलं पाहिजे…
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips
यूपीएससीची तयारी :  भूगोल (भाग २)
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे

सोड ना अबोला!

झुरतो तुझ्याविना घडला काय गुन्हा?

बनलो निशाणा सोड ना अबोला।

इष्काची दौलत उधळी तुझा हा नखरा

मुखचंद्राभवती कितीक फिरती नजरा

फसवा राग तुझा, अलबेला नशिला

करी मदहोश मला, नुरले भान अतां,

जाहला जीव खुळा।

तुझे फितूर डोळे गाती भलत्या गजला

मदनानें केलें मुष्किल जगणें मजला

पाहुनी मस्त अदा, फुले अंगार असा

सावरूं तोल कसा?

नको छळवाद अतां, झालो कुर्बान तुला।’

प्रेयसीला उद्देशून केलेला हा लाडिक आणि खटय़ाळ संवाद त्यातील शब्द आणि स्वररचना यांमुळे उठावदार झालाय. गाण्याची सुरुवात मेंडोलिन या वाद्याने होते. त्यानंतर लगेचच ‘ए’ आणि ‘अगं’ हे शब्द येतात. त्या क्षणी पुढचे गाणे फुलणार, बहरणार याची जाणीव होते. हे शब्द मूळ गीतात नाहीत; पण या शब्दांमुळे श्रोता गाण्याच्या वातावरणात सहज शिरतो हे नक्की! ही दाद संगीतकाराला आहे. अंतरा सुरू होताना एकीकडे ताल सुरू आहे आणि एखादा ‘शेर’ पेश केल्याच्या भावनेत ‘इष्काची दौलत उधळी’ हे गायन सुरू होते.  आपण सारे श्रोते त्या भावनेकडे ओढले जातो. एरवी गीताच्या दोन अंतऱ्यांमध्ये म्युझिक पीस असतोच, तसा या गाण्यात नाही. दुसऱ्या अंतऱ्याची सुरुवात होण्याआधी सतार, मेंडोलिन खास ऐकावे असे आहे. ‘तुझे फितूर डोळे’ हा संवाद ‘जगणें मजला’ या शब्दांनी टिपेच्या सुरापर्यंत जातो. तबला, ढोलक या वाद्यांनी सजलेला ताल हा गाण्याची खुमारी वाढवतो. गाण्याच्या शब्दामधील आर्जव, मधाळपणा, आपलेपणा या सर्व भावना महंमद रफीसाहेबांच्या आवाजाने उंचीवर नेल्या. शेवटी ‘सोड ना अबोला’ हे शब्द गाताना ‘‘ए’ सोड ना अबोला..’ ही गोड विनंती आहेच. इष्क, नशिला, मदहोश, अदा, कुर्बान हे हिंदी शब्द या मराठी प्रीतीगीतात विरघळून गेले आहेत. एक उठावदार काव्य आणि उत्कृष्ट संगीतरचना निर्माण झाली.

संगीतप्रेमींसाठी महंमद रफीसाहेब म्हणजे जणू ‘तानसेन’! गायनाच्या प्रत्येक प्रश्नपत्रिकेत रफीसाहेब हे शंभरपैकी शंभर गुण मिळवणारे गायक होते. गीत प्रकारातील सर्व भावनांचे क्षण त्यांच्या स्वरात ऐकणे हा निखळ आनंदाचा क्षण असतो. ते परिपूर्ण गायक होते. संगीतकारांच्या उत्तमोत्तम रचनांना हा स्वर मिळाला आहे. प्रत्येकाने आपल्या आयुष्यात रफीसाहेबांचे किमान एक तरी गाणे गायले आहे. त्यांच्या गाण्यावर लाखो रसिकांचे जिवापाड प्रेम आहे. ‘गाण्यासाठी जन्म आपुला’ हा त्यांच्या जगण्यातला भाव असे. त्यांच्या आवाजाला स्वररचना गाण्यामधली कोणतीही गोष्ट अशक्य नव्हती. तो आवाज म्हणजे ‘परिमाण’ झाले. त्यांचे गाणे वरवर सहजसोपे वाटते, मात्र गाणे गाण्याचा प्रयत्न करताना ‘त्या’ आवाजाची विशाल क्षमता समजते. ती विशालता शोधता शोधता क्षितिज दूर दूर जाते. तेव्हा लक्षात येते, की रफीसाहेबांच्या स्वरांनी आपले आयुष्य समृद्ध केले आहे. या आनंदाचे वर्णन करायला शब्द अपुरे पडतात. ‘हा रुसवा सोड सखे..’ हे भावगीत एका अमराठी गायकाने गायले तरीही या गाण्याने आपल्या हृदयात जागा मिळविली आहे. असा आवाज मराठी भावगीतात आला तो संगीतकार श्रीकांत ठाकरे यांच्यामुळेच.

श्रीकांत ठाकरे यांच्या पत्नी मधुवंतीताई ठाकरे यांनी मनापासून काही आठवणी सांगितल्या. मराठी भावगीतांमध्ये वेगळ्या पठडीतल्या संगीतासाठी श्रीकांत ठाकरे हे नाव महत्त्वाचे आहे. त्यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे यांची ‘डेक्कन स्पार्क’ या नावाची नाटक कंपनी होती. घरात ‘बुलबुलतरंग’ हे वाद्य होते. हे वाद्य आज क्वचितच पाहायला मिळते. श्रीकांत ठाकरे यांना त्यांच्या लहानपणीच सी. व्ही. पंतवैद्य हे संगीत शिक्षणातील गुरू भेटले. त्यांच्याकडे व्हायोलिन वादनाची शिकवणी सुरू झाली. पुढील काळात आकाशवाणीवर व्हायोलिनवादनाचा स्वतंत्र कार्यक्रम सादर केला. सुगम गायनाच्या मैफलीमध्ये व्हायोलिनची साथ केली. गजल, ठुमरी या गीतप्रकारांवर त्यांचे विशेष प्रेम होते. सारंगी या वाद्याचं आकर्षण होतं. त्यांना स्वररचना करण्याची संधी मिळाली. त्यांनी भक्तिगीतांपासून ठुमरी, कव्वालीपर्यंत सर्व बाज चालींमध्ये आणले. जशी गायक महंमद रफीसाहेबांनी श्रीकांतजींची गीते गायली तशी प्रसिद्ध गायिका शोभा गुर्टू यांनीदेखील गायली. ‘उघडय़ा पुन्हा जहाल्या’, ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’, ‘बोल कन्हैया’ ही त्यांची गीते लोकप्रिय झाली. गायिका उत्तरा केळकर, रंजना जोगळेकर, पुष्पा पागधरे यांनी गायलेली श्रीकांतजींची गीते ध्वनिमुद्रित झाली. श्रेष्ठ गायक सुरेश वाडकर यांच्यापासून ठाण्याचे गजलगायक अनिरुद्ध जोशींपर्यंत अनेक गायकांनी श्रीकांतजींच्या रचना समरसून गायल्या. त्यांच्या वाद्यमेळात सुराज साठे, अनिल मोहिले, नंदू होनप, अण्णा जोशी ही नामवंत वादक मंडळी असायचीच. श्रीकांतजी स्वत: उर्दू भाषा शिकले. त्यांनी मराठी गीतांचे शब्द रफीसाहेबांना उर्दू भाषेत लिहून दिले. त्यांच्या कानामनांत चोवीस तास संगीत हाच विषय असे. त्यांनी पत्नीचे नाव ‘मधुवंती’ असे ठेवले. तर कन्येचे नाव ‘जयजयवंती’ व चिरंजीवांचे नाव- ‘स्वरराज’असे ठेवले. ‘स्वरराज’- म्हणजेच आपल्याला परिचयाचे असलेले लोकप्रिय व्यक्तिमत्त्व ‘राज ठाकरे’- हे उत्तम तबलावादन शिकले आहेत. गाणी व संगीतविषयक माहितीचा त्यांच्याकडे खजिना आहे, हा त्यांचा सुरेल असा पैलू या निमित्ताने समजला. संगीतप्रेमींसाठी ही आनंदाची गोष्ट आहे.

गीतकार वंदना विटणकर यांनी भावगीत प्रांतात त्यापूर्वीच प्रवेश केला होता. त्यांचे आरंभीच्या काळातील काव्यलेखन हे कवयित्री शांता शेळके यांच्या काव्याचे अनुकरण होते. काही वर्षांपूर्वी ‘चतुरंग’च्या एका मुलाखतीत त्यांनी हे सांगितले होते. त्यांनी स्वतंत्रपणे पहिली कविता लिहिली तो प्रसंग लक्षात राहील असा आहे. दोन मुले पतंग उडवीत होती. त्यातील एकाचा पतंग तुटला आणि गिरक्या घेत खाली आला. तेव्हा वंदनाजींनी ‘कापलेला पतंग’ ही पहिली कविता लिहिली. ‘शशी’ या मासिकात ती छापून आली होती. गीत आणि कविता यामध्ये फरक करू नये, असे त्या म्हणत. त्याचे कारण त्या सांगत : ‘अनुभूती मनात रुजते, पण ती लगेचच बाहेर येते असे नाही. कधी कधी काही काळानंतर त्याला अंकुर फुटतो. काही वेळा आंतरिक कविता सुचलेली असते; पण ती शब्दरूप घेत नाही. पण कधी कधी लयबद्ध ओळ सुचते आणि त्याचे गीत होते.’

शब्दांशी खेळणे हा वंदनाताईंचा बालपणापासून छंद होता. लहान मुले रंगीबेरंगी काचा, शंख, शिंपले गोळा करतात तसे आवडलेले शब्द त्या गोळा करायच्या. नकळत ते शब्द कवितेत गुंफले जायचे. शब्दांशी खेळता खेळता जाति, वृत्त, छंद यांच्याशी मैत्री झाली. स्वत:चे अनुभव कवितेत गुंफले. नाद-लयीवरील प्रेमामुळे कवितांनी छंदोबद्ध रूप धारण केले. कवयित्री म्हणून प्रसिद्धी मिळाली. एकेदिवशी  आकाशवाणीवर त्यांनी एक गीत ऐकले. ते गीत होते- ‘त्या क्षणांचे वेड मजला का असें हे वेढिते? मी न माझी राहते..’. या गीतामुळे माझे शब्द स्वरांच्या भाषेत माझ्याशी बोलू लागले, असे त्या सांगत. सुनीती आपटे यांनी हे गीत गायले होते.  गीतरचनेचं चांदणं त्यांना जास्त आकर्षित करत होतं. अनेक संगीतकारांनी त्यांची गाणी स्वरबद्ध करता करता रचनेतले बारकावे शिकविले. ‘परिकथेतील राजकुमारा’ हे त्यांचे गीत लोकप्रिय झाले. एकदा श्रीकांत ठाकरे यांनी वंदनाताईंना चालीवर गीत लिहिण्याचे आव्हान दिले. श्रीकांतजींनी मालकंस रागातील चाल ऐकविली आणि म्हणाले, ‘या चालीवर भक्तिगीत पाहिजे.’ वंदनाताईंनी आव्हान स्वीकारले आणि शब्द लिहिले- ‘शोधिसी मानवा राऊळी मंदिरी..’. थोर गायक महंमद रफीसाहेबांनी हे गीत गायले. वंदनाताई सांगत की, ‘ही कारागिरी आव्हानात्मक आहे आणि यातून नवे आकृतिबंध सापडतात.’ त्यांच्या पतिराजांचे डोळ्यांची शस्त्रक्रिया झाली आणि गीतकार वंदनाताई कोणतेही गीत लिहिण्याच्या मन:स्थितीत नसताना त्यांना ओळी सुचल्या- ‘रसिका मी कैसे गाऊ गीत’. विटणकरसाहेब आणि कवयित्री शिरीष पै ही त्यांची प्रेरणास्थाने, असे वंदनाताई सांगत.

संगीतकार श्रीकांत ठाकरे, गीतकार वंदना विटणकर आणि गायक महंमद रफी या त्रयींच्या दहा-बारा गाण्यांनी संगीतप्रेमींना वेड लावले. ती सर्व गाणी तुफान लोकप्रिय झाली. या त्रिवेणी संगमाची गीते ऐकण्याचा छंद रसिकांना जडला. मराठी मन ज्याला त्याला सांगू लागले.. ‘हा छंद जिवाला लावि पिसे!’

विनायक जोशी vinayakpjoshi@yahoo.com