गाणे हे अनुभवांचे शब्दचित्र असते. कवितेचे गाणे होताना तो अनुभव सार्वत्रिक होतो. भावना व स्वरांचा हा संगम असतो. शब्दांतील भावना स्वरबद्ध होऊन गीत जन्माला येते. गेल्या नव्वद वर्षांत मराठी भावगीत असेच रुजले, बहरले. कवितागायनाचा अनुभव रसिकांना आपला वाटू लागला. असंख्य भावगीतांमधून वेगवेगळे विषय आले. रसिकांनी ते आपलेसे केले. निसर्ग, राधा-कृष्ण, सासर-माहेर, प्रीती अशा अनेक विषयांवरील भावगीते श्रोत्यांच्या पसंतीस उतरली. गीत गुणगुणण्याची क्रिया सहजगत्या घडू लागली. त्यातला आनंद वाढत गेला. त्याकाळी आता कोणते नवे गाणे ऐकायला मिळणार, त्याची चाल कशी असेल, ही उत्सुकता शिगेला पोचत असे. श्रोत्यांच्या आवडत्या भावगीतांमध्ये ‘माहेर’ हा विषय ‘वीक पॉइंट’ होता. माहेरावरील प्रत्येक गाणे लोकप्रिय झाले. मग ते ‘माझिया माहेरा..’ असो वा ‘हे माहेर सासर ते, हे काशी, रामेश्वर ते’ हे गीत असो; प्रत्येक गाणे रसिकप्रिय झाले. या माहेरगीतांमध्ये व इतरही भावगीतांमध्ये एका गायिकेचे योगदान मोलाचे आहे. ती गायिका म्हणजे.. मोहनतारा अजिंक्य.

मधुर, थोडासा लाडिक, सुरेल आवाज आणि प्रभावी गायन यामुळे हा आवाज रसिकांना भावला. मोजकीच भावगीते या गायिकेने गायली. पण तिचे प्रत्येक गाणे ऐकावे असेच आहे. त्यातले अधिक आवडलेले गाणे म्हणजे ‘जाणार आज मी माहेराला, ओटी भरा, माझी ओटी भरा..’ या गाण्याचे शब्द आणि चाल इतकी अप्रतिम, की ते म्हणण्याचा मोह होतोच!

kiran mane shares post about propaganda films
“छुपा मुस्लीमद्वेष परसवणाऱ्या प्रोपोगंडा चित्रपटांमध्ये…”, किरण मानेंची पोस्ट चर्चेत, घेतला महत्त्वाचा निर्णय
actor pratik gandhi talks about experience working with vidya balan
‘चरित्रपटांचं आव्हान अधिक भावतं’
freedom of artist marathi news
‘कलानंद’ हवा असेल तर ‘कलाकाराचं स्वातंत्र्य’ मान्य करता आलं पाहिजे…
Loksatta kutuhal Artificial intelligence that avoids potholes
कुतूहल: खड्डे चुकवणारी कृत्रिम बुद्धिमत्ता!

‘जाणार आज मी माहेराला, आज माहेराला,

ओटी भरा गं ओटी भरा, माझी ओटी भरा।

हिरवी चोळी, शालू हिरवा,

हाती भरला हिरवा चुडा

हिरवा मरवा वेणीत घाला, माझ्या वेणीत घाला।

हिरव्या वेली हिरव्या रानी,

मधे मी बसले हिरवी राणी

हिरवा चौरंग बसायला, मला बसायला।

माझी मला जड झाली पाऊले,

डोळ्याभवती काळी वर्तुळे

आशीर्वाद तुम्ही द्या गं मला, तुम्ही द्या गं मला।

हसू नका गं हसू नका, गुपित सांगते

आज जरी मी एकली जाते,

आणिन संगे युवराजाला, माझ्या युवराजाला।’

या गीतात माहेराला जाण्याचे निमित्त फार महत्त्वाचे आहे. माहेरची आठवण आणि त्याचे कारण या भावनेशी हे गीत जुळले आहे. या भावनेतला आनंद वेगळा आहे. गाणे म्हणून हा आनंद ती नायिका सर्वाना वाटते आहे. त्या आनंदातील खास बात ती व्यक्त करते आहे. ‘माझी मला जड झाली पाऊले’ हे गीतकार मा. ग. पातकरांचे शब्द तिच्या मनातले खरेखुरे कारण सांगतात. ‘माझी ओटी भरा..’ हे त्या आनंदाचे मागणे आहे. तो तिचा प्रेमाचा हट्ट आहे. अंतऱ्यामध्ये आठ वेळा आलेला ‘हिरवा’ हा शब्द थेट तिच्या अंतरंगाशी नाते जोडतो. अतिशय प्रफुल्लित अंत:करणाने ती व्यक्त होते आहे. संकोच व भीडभाड या गोष्टींना इथे स्थान नाही. संपूर्ण गाण्यात हर्ष पसरला आहे. गायिका मोहनतारा अजिंक्य यांचा मधुर, धारदार स्वर उत्तम गाण्याचा आनंद देतो. आनंद आपल्या सखींना वाटणे..देणे हे गजानन वाटवेंच्या सुमधुर चालीतून प्रतीत होते. ‘माझी मला जड झाली पाऊले’ हा क्षण स्वरात सांगताना कोमल निषाद हा स्वर दिसतो. तोही मंद्र सप्तकातला. यामुळे शब्दांतील भाव अधोरेखित झाला आहे. यालाच संगीतकाराची प्रतिभा म्हणतात. गीताच्या शेवटच्या अंतऱ्यातील गुपित हे आनंदाचा कळस आहे. अनेक वेळा हे गीत कोरसमध्ये गायले जाते. सर्वानी एकत्र म्हणण्याचे हे गीत आहे. बऱ्याचदा ‘माझी, मला, माझ्या, मी’ या शब्दांच्या जागी ‘हिची, हिला, हिच्या, ही’ हे शब्द घेऊनसुद्धा हे गीत गायले जाते. टाळ्या वाजवून हाताने ताल धरला जातो. हे गीत समूहाने गाण्याचा आनंद स्त्रिया घेतात. गीतकार, संगीतकार व गायिका यांची नावे माहीत नसलेल्या रसिकांना हे गीत पारंपरिकच वाटते. याच त्रयीचे आणखी एक भावगीत लोकप्रिय झाले..

‘खुदकन् गाली हसले, मी जाणुनबुजून फसले।

जाता येता हसुनी बघता

वाट रोखिता, मिचकावून डोळे।

सहज चांगला वेध घेतला

तीर मारिला जखमी मजला केले।

मी व्याकुळले, वेडी झाले,

परि मी हसले, अघटित हे घडले।

खेळ खेळला, जीव गुंतला

निघून गेला, काय पुन्हा रुतले।’

तालाच्या अंगाने केलेली उडती चाल हे या गीताचे वैशिष्टय़. यातही आनंदाची रूपे व्यक्त झाली आहेत. ‘फसले, डोळे, केले, घडले, रुतले’ हे शब्द तीन वेळा तीन वेगळ्या चालीत आले आहेत. या शब्दांच्या उच्चारानंतर तबल्याची ‘पिकअप् थाप’ अतिशय आकर्षक आहे. मन डोलायला लावणारी आहे. संगीतरचनेतला आनंदभाव इथे दिसतो. गायनातल्या हरकती, मुरक्यांतून गायिकेची तयारी व रियाज जाणवतो. गायिका मोहनतारा अजिंक्य यांनी या गीतातले शब्द व लय उत्तम सांभाळली आहे.

ध्वनिमुद्रिका संग्राहक अशोक ठाकूरदेसाई यांनी मोहनतारा अजिंक्य यांची भावगीते ऐकण्यासाठी उपलब्ध करून दिली. कुमार संजीव व श्रीनिवास खारकर या गीतकारांची गाणी त्यांनी गायली आहेत. संगीतकार श्रीधर पार्सेकर यांनी संगीतबद्ध केलेल्या दोन रचना या गायिकेच्या स्वरात आहेत. ‘चल चांदण्यात सजणा, चल चंदेरी साजरी’ आणि ‘तुझ्या प्रीतीच्या हाकेला, जीव हा भुकेला’ ही ती दोन गीते. जनकवी पी. सावळाराम व संगीतकार वसंत प्रभू यांची दोन मधुर गाणी या गायिकेने गायली आहेत.

‘मार्चिग साँग’ वाटावे अशा म्युझिक पीसने सुरू होणारे हे गोड गीत..

‘कलेकलेने चंद्र वाढतो चिमणा नंदाघरी

काजळल्या या अमृतज्योती देवकीच्या अंतरी।

प्रतिबिंबाचे लखलख आता घरोघरी विधीले

देवकीच्या या आनंदाने विश्व उजळले नवे

निरांजनाच्या सवे उतरले नक्षत्रांचे थवे

त्रलोक्याची आज दिवाळी करावया साजरी।

हर्षपुराने चढू लागले यमुनेचे पाणी

देवकीच्या या नयनामधुनी यशोदेच्या नयनी

घडे भरूनिया बघा चालल्या गोकुळच्या गवळणी

झडत चौघडे माया येता मथुरा गोकुळपुरी।

चंदन चर्चूनी हर्षजलाने न्हाऊ घातले बाळा

नाव ठेवण्यां जमला होता सुवासिनींचा मेळा

घ्या गोविंदा घ्या गोपाळा अनंत नामे बोला

जगदोद्धारा धरी यशोदा पाळण्याची दोरी।’

चार-चार ओळींचा मोठा अंतरा असलेले हे भावगीत आहे. अशाच आशयाचे साधम्र्य असलेले सावळाराम-प्रभू जोडीचे या गायिकेने गायलेले आणखी एक गीत आहे..

‘चालल्या गवळणी मथुरेकडे

झुलत शिरी, दह्य़ादुधाचे घडे।

कुणी कामिनी, कुणी भामिनी

रूप देखणी त्यात पद्मिनी, राधा गवळण पुढे।’

गायिका मोहनतारा अजिंक्य यांची आणखीही काही भावगीते आठवतात.. ‘अशी कशी गं झाली दुनिया’, ‘रात्र जायची अजुनी गडे’, ‘झोक्याला घेऊया बाई’, ‘उजळू दीपमाला’, ‘तुझी नि माझी प्रीत जशी’.. ही ती गाणी!

मोहनतारा तळपदे (माहेरचे नाव) असताना त्यांनी अनेक हिंदी चित्रपटगीतेही गायली. यात जशी ‘सोलो’ गीते आहेत, तशीच मोहंमद रफी, मुकेश, सुरैया यांच्यासह गायलेली गाणीही आहेत. ‘उद्धार’, ‘इम्तिहान’, ‘दिल की दुनिया’, ‘धरती’, ‘प्रभू के घर’, ‘सौदामिनी’, ‘वीर घटोत्कच’ या चित्रपटांची गाणी त्यांनी गायली आहेत. या गीतांमध्ये विशेष गाजलेली गाणी म्हणजे.. ‘आई पिया मीलन की बहार’, ‘जब मैं छेडू प्रेमतराना’, ‘आओ रे मनमोहन माधव’, ‘बदर की चादर में’, ‘पहली पहचान में नैना’, ‘मन का अलबेला पंछी’, ‘हम चले तेरे दिल के मकान से’.. १९४५ ते १९५० या काळातील ही गीते आहेत.

१९४२-४३ या काळात कवी बा. सी. मर्ढेकर मुंबई आकाशवाणीमध्ये अधिकारीपदावर होते. पाश्चिमात्त्य संगीतकारांसारखा ‘ऑपेरा’ आपण हलक्याफुलक्या संगीतकांमधून सादर करावा असे त्यांना वाटे. याच विचारातून त्यांनी ‘बदकांचं गुपित’ हे संगीतक आकाशवाणीसाठी लिहिले. डी. अमेल या नावाने दिनकरराव अमेंबल संगीत देत असत.

‘मी ही खुळा तशी तूं। तू ही खुळी मनू गे!

ही खुळखुळा पिपाणी। ही वाजवूंच दोघे।’

हे त्या संगीतकातील शंतनु-मनोरमेचे गीत. यात मधुसूदन कानेटकर आणि मोहनतारा अजिंक्य यांनी शंतनु-मनोरमाच्या भूमिका केल्या होत्या. मोहनतारा अजिंक्य यांचे हे एका वेगळय़ा शैलीचे गाणे नभोवाणी श्रोत्यांना ऐकायला मिळाले.

मोहमयी भावगीतांची भुरळ पडलेले रसिक मोहनतारा अजिंक्य या गायिकेला विसरू शकणार नाहीत.

 vinayakpjoshi@yahoo.com