19 January 2021

News Flash

फॅमिली डॉक्टर

फॅमिली डॉक्टर ही संकल्पना निर्माण होण्याआधी डॉक्टर आणि पेशंट या नात्यामध्ये डॉक्टरविषयी भीतीयुक्त आदर होता...

वाचक मित्रहो, या सदरामध्ये वैद्यकशास्त्रामधील विविध विषयांबाबतची माहिती सोप्या शब्दात आपल्यापुढे ठेवायचा प्रयत्न करणार आहोत. सुरुवात करताना विषय निवडला आहे – फॅमिली डॉक्टर आणि बदलणारं जग !

फॅमिली डॉक्टर ही संकल्पना निर्माण होण्याआधी डॉक्टर आणि पेशंट या नात्यामध्ये डॉक्टरविषयी भीतीयुक्त आदर होता आणि त्यामुळे बरेचसे भावनिक अंतरदेखील !

शेकडो वर्षांपूर्वी आजार हा देवाचा कोप मानला जात होता तेव्हा औषधोपचाराचे स्वरूप हे देवापुढे नवस बोलणे, होमहवन करणे आणि प्राणिमात्रांचा बळी देणे असे होते. देवळातला पुरोहित किंवा गावातला भगत हेच लोकांचा आधार होते. या मंडळींबरोबर भावनिक नातं अथवा जवळीक अशक्य होती. पुढील काळात वैद्यकशास्त्र आणि औषधोपचार हे विज्ञानावर आधारित झाले आणि या लोकांची जनसामान्यांवरील पकड हळूहळू सैल झाली. औद्य्ोगिक क्रांतीनंतर शहराकडे झालेलं स्थलांतर आणि सर्वसामान्य माणसांना उपलब्ध झालेले ज्ञान हेदेखील त्याला कारण नक्कीच ठरले. वेगाने होणारे शहरीकरण आणि झपाटय़ाने वाढणाऱ्या जनसमुदायाला वैद्यकीय सेवा देण्यासाठी मोठी हॉस्पिटल्स अपुरी पडू लागली. तसेच या हॉस्पिटलमधील गर्दीमध्ये वेळ घालवणे सर्वानाच शक्य नव्हते. यामुळे लोक खासगी सेवा देणाऱ्या वैद्यकीय व्यावसायिकांकडे वळले.

घरातील लहानथोर सर्वच या डॉक्टरांकडे सर्व आजारांसाठी जाऊ लागले. नवजात शिशू ते आजीआजोबा सर्वाच्या आरोग्याची हे डॉक्टर  काळजी घेऊ लागले. रात्री-अपरात्री येणाऱ्या वैद्यकीय प्रसंगांना हीच डॉक्टर मंडळी उपलब्ध होऊ लागली. यामुळे या डॉक्टरांबरोबर भावनिक, जवळीक आणि विश्वास निर्माण झाला. हे डॉक्टर कुटुंबाचा एक घटक बनले आणि फॅमिली डॉक्टर झाले. अनेकदा इतर कौटुंबिक अडीअडचणीमध्ये याच डॉक्टरांचा सल्ला लोक घेऊ लागले. कुटुंबातील आनंदाच्या, दु:खाच्या प्रसंगी त्यांची उपस्थिती अनिवार्य ठरू लागली.

वैद्यकशास्त्र जसं प्रगत होत गेलं, तसं लोक स्पेशालिस्ट डॉक्टरांकडे वळले. परंतु या स्पेशालिस्ट डॉक्टरांकडे जायचा निर्णय आणि त्या डॉक्टरांची निवड ही फॅमिली डॉक्टरांच्या सल्ल्यानेच होऊ लागली.

स्पेशालिस्ट डॉक्टरांची सहज उपलब्धता आणि झपाटयाने विकासणारे वैद्यकीय ज्ञान यामुळे हळूहळू पेशंट सरळ स्पेशालिस्ट डॉक्टरांकडे जाऊ लागले. नवनवीन आजार आणि उपचारपद्धती या फॅमिली डॉक्टरांचे ज्ञान आणि अनुभवाच्या कक्षेबाहेर गेल्याने पेशंटदेखील परस्पर स्पेशालिस्ट डॉक्टरांकडे जाऊ लागले. यामुळे फॅमिली डॉक्टरांचे महत्त्व नक्कीच कमी होऊ लागले. यानंतरदेखील अधिक वेगाने होणाऱ्या शहरीकरणामुळे एकत्र कुटुंबं विभागली गेली. उपजीविकेसाठी माणसं अधिक व्यस्त राहू लागल्याने डॉक्टरांकडे जाण्यासाठी वेळ मिळेनासा झाला. त्यामुळे छोटय़ामोठय़ा प्रत्येक आजारासाठी झटपट गुण मिळावा म्हणून परस्पर स्पेशालिस्टकडे जाण्याची प्रवृत्ती तयार झाली. तसेच सर्वसामान्य माणसाची आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे फॅमिली डॉक्टरपेक्षा स्पेशालिस्ट डॉक्टरकडे जाणं लोक पसंत करू लागले.

यानंतर आले ते आजचे माहिती आणि तंत्रज्ञानाचे युग! यामध्ये माहिती आणि ज्ञानाच्या कक्षा झपाटय़ाने विस्तारत गेल्या ! आजपर्यंत केवळ पाठय़पुस्तके आणि जर्नल्समध्ये उपलब्ध असलेले वैद्यकीय ज्ञान माहितीच्या महाजालावर सर्वासाठी उपलब्ध झाले आणि तेदेखील सर्वाना समजेल अशा सोप्या भाषेत! यामुळे पेशंट इंटरनेटवरून माहिती शोधून आपल्या लक्षणांचा अर्थ लावून आपल्या आजाराचे निदान करायचा प्रयत्न करू लागले. यामध्ये त्यांना फमिली डॉक्टरपेक्षा स्पेशालिस्ट डॉक्टर अधिक गरजेचा वाटू लागला. इंटरनेटवरून मिळालेल्या माहिती आधारे पेशंट डॉक्टरचे ज्ञान आणि अनुभवदेखील पारखू लागला. परंतु यामुळे डॉक्टर आणि पेशंट यांमध्ये एक अविश्वासाची दरी तयार झाली. त्यातच ग्राहक संरक्षण कायद्यामुळे पेशंट आणि डॉक्टर यांमधील विश्वास आणि जिव्हाळा कमी होऊन ती जागा व्यवहाराने घेतली. यामुळे पेशंटचे एका डॉक्टरच्या सल्ल्याने समाधान न होता वेगवेगळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याची त्याला गरज वाटू लागली. या वेगवेगळ्या डॉक्टरांकडून मिळणाऱ्या भिन्न आणि प्रसंगी परस्परविरोधी सल्ल्यांमुळे पेशंट आणखीन भांबावून गेला आणि त्यामुळे पेशंटचा डॉक्टरांवरील अविश्वास अधिकच वाढला. यामुळे योग्य ते उपचार वेळेवर सुरू होण्यास विलंब होतो आहे हेदेखील पेशंट आणि त्याचे नातेवाईक यांच्या लक्षात येईनासे झाले. यामुळे एखादी अप्रिय घटना घडल्यावर त्याचा राग समोर हजर असणाऱ्या डॉक्टरवर काढला जाऊ लागला.

योग्य ते वैद्यकीय ज्ञान आणि अनुभवाशिवाय इंटरनेटवरून किंवा प्रसिद्धी माध्यमातून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे आजाराची व उपचाराची दिशा ठरवणे म्हणजे भूसुरुंग पेरलेल्या जमिनीवरून डोळे मिटून चालण्यासारखे आहे. अशा प्रसंगी मार्गदर्शकाची भूमिका निभावतो आपला फॅमिली डॉक्टर!  फॅमिली डॉक्टरला त्याच्याकडे येणाऱ्या प्रत्येक पेशंटची वैद्यकीय आणि कौटुंबिक माहिती असते. त्यामुळे प्रत्येक पेशंटसाठी त्याच्या आजारपणात कोणता स्पेशालिस्ट डॉक्टर आणि उपचारपद्धती योग्य ठरेल याचे मार्गदर्शन फॅमिली डॉक्टरच करू शकतो.  पेशंटसाठी सर्वोत्तम आणि कमी त्रासाची उपचारपद्धती ठरविण्यासाठी फॅमिली डॉक्टर हा पेशंट आणि स्पेशालिस्ट डॉक्टर यांमधील दुवा बनू शकतो. उपचारादरम्यान पेशंटच्या बाबतीत काही गुंतागुंत झाली आणि काही अप्रिय घटना घडली तर संबंधित डॉक्टर आणि पेशंटचे नातेवाईक यामध्ये निर्माण होणारी कटुता टाळण्यासाठी तो मध्यस्थाची प्रभावी भूमिका करू शकतो.

वैद्यकीय ज्ञान आणि तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरीही फॅमिली डॉक्टरचे महत्त्व आजच्या जमान्यात थोडेही कमी होत नाही. कारण या अतिशय क्लिष्ट आणि नवनवीन शोधामुळे नेहमीच बदल होत असलेल्या वैद्यकीय विश्वामध्ये फॅमिली डॉक्टर हाच पेशंटसाठी मित्र, मार्गदर्शक ठरतो.
डॉ. पराग देशपांडे –

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2016 1:18 am

Web Title: family doctor
टॅग Fitness,Medicine
Just Now!
X