डॉ. मानसी राजाध्यक्ष -manasi.milind@gmail.com  

शर्करा ही ऊर्जादायिनी आहे, म्हणजे ती शरीराला ऊर्जा मिळवून देण्याचं काम करते. शर्करेचे अनेक प्रकार आहेत. आपल्या शरीरात प्रवेश केल्यावर प्रत्येक प्रकारच्या शर्करेचं पचन वेगवेगळ्या प्रकारे होतं. त्यावरच आपल्या शरीराला कोणत्या प्रकारची शर्करा आणि तीसुद्धा किती प्रमाणात हितकारी किंवा अहितकारी असते, हेही ठरतं.

शर्करेच्या प्रकारांचे; मोनोसॅकॅराईड्स, डायसॅकॅराईड्स, ओलीगोसॅकॅराईड्स आणि पॉलिसॅकॅराईड्स असे गट आहेत. त्यापैकी ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि गॅलॅक्टोज या मोनोसॅकॅराईड्स गटातल्या शर्करा आहेत, ज्यांचं पचन लवकर होतं आणि लगेचच ऊर्जा उपलब्ध होते. त्यातही शरीरातल्या सर्व पेशी ग्लुकोजपासून ऊर्जानिर्मिती करू शकतात; पण फ्रुक्टोजपासून ऊर्जानिर्मिती, फक्त यकृतातच होऊ शकते. त्यामुळे आपल्या आहारात जर प्रमाणापेक्षा जास्त फ्रुक्टोज सेवन झालं तर यकृतामध्ये मेदाचं प्रमाण वाढतं आणि ते अहितकारी आहे.

गहू, मैदा किंवा काही कडधान्यांमध्ये ग्लुकोज असतं, तर फळं, मध किंवा सॉफ्ट ड्रिंक्समध्ये खूप जास्त प्रमाणात फ्रुक्टोज शर्करा असते. गॅलॅक्टोज ही शर्करा लॅक्टोज या शर्करेचा एक भाग आहे. लॅक्टोज शर्करेत, ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज या दोन शर्करा समाविष्ट असतात. म्हणून लॅक्टोज शर्करा, डायसॅकॅराईड्स या गटात मोडते. तशीच डायसॅकॅराईड्स गटातच येणारी सुक्रोज शर्करा (आपण घरात वापरतो ती ‘साखर’), ग्लुकोज आणि फ्रुक्टोज यांचं मिश्रण आहे; तर माल्टोज ही दोन ग्लुकोजच्या रेणूंपासून तयार झालेली आहे. बार्लीमध्ये माल्टोज शर्करा असते तर दुधाच्या सर्व पदार्थामध्ये लॅक्टोज शर्करा असते.

ओलीगोसॅकॅराईड्स आणि पॉलिसॅकॅराईड्स या प्रकारच्या शर्करांमध्ये दोनपेक्षा जास्त प्रकारच्या शर्करा समाविष्ट असतात. त्यामुळे त्यांचं पचनही आणखी वेगळ्या प्रकारे होतं. लाल तांदूळ, रताळी अशा अन्नपदार्थामध्ये या संयुक्त शर्करा असतात.

हल्ली आपण बऱ्याचदा ‘टिन’मध्ये सीलबंद केलेले अन्नपदार्थ खातो. त्या डब्यांवर आतल्या अन्नपदार्थ- घटकांविषयी माहिती दिलेली असते. त्यामध्ये ‘अ‍ॅडेड शुगर’ असा एक शब्दप्रयोग असतो. पण त्यावर नेमकी कोणत्या प्रकारची शर्करा किती प्रमाणात आहे, हे स्पष्टपणे नमूद केलेलं नसतं.

‘अ‍ॅडेड शुगर’ म्हणजे बऱ्याच वेळा ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि सुक्रोज याचं मिश्रण असतं. कधी कधी काही प्रमाणात गॅलॅक्टोज, लॅक्टोज आणि माल्टोज या शर्करांचाही समावेश असतो. त्यामध्ये जर समजा फ्रुक्टोजचं प्रमाण खूप जास्त असेल तर ती शर्करा यकृतात जाऊन जास्तीचा मेद निर्माण करू शकते.

chaturang@expressindia.com