19 October 2019

News Flash

खाऊ आनंदे

ऑलिव्ह यासारख्या नव्याने आपल्या आहारात सामील झालेल्या अन्नघटकांचा वेध घेण्यात आला.

वसुंधरा देवधर  vasudeo55p@gmail.com

आहार, विहार, आचार आणि विचार या चार खांबांवर आपले आरोग्य आणि आयुष्यसुद्धा तोललेले असते. यामध्ये आहार प्रथम आणि विचार शेवटी असला, तरी पहिल्या तीनही कृतींना विचाराचा पाया असतो. त्यामुळे आहारविषयक डोळस विचार आणि त्यानुसार आचार  प्रत्येक व्यक्तीने  करायचा असतो. नुकतेच एका तरुणीने, आजच्या भाषेत सांगायचे तर तिच्या ‘मन की बात’ सांगितली, ती अशी – ‘‘स्थूलपणा, अपचन, अ‍ॅसिडिटी इत्यादींवर बोलणे फार आणि करणे कमी, असे चालते. मुळात आपल्या हाताने आपण जेवतो. तर त्या अर्थाने – आपले आरोग्य आपल्या हातात – असे का म्हणू नये?’’

आता आपल्या हाताने आपण करतो ती कृती म्हणजेच आचार आणि त्यामागे हवा विचार. स्वयंपाक, म्हणजे स्वत: शिजवणे/ बनवणे, शहरी व निमशहरी भागात कमी होत असताना, अनेक तरुण/ तरुणी घरापासून दूर राहत असताना, आपल्या आहारातील घटकांमागचे विज्ञान त्यांनी समजून घेतले व आहार घेताना त्याचा विचार ठेवला तर, आरोग्य सांभाळण्यास खूप मदत होईल, हे नक्की.

विविध भाज्या, फळे, धान्ये, कडधान्ये आणि पेये यांची आवश्यक ती माहिती, सर्वसामान्य वाचकांना सहज समजेल, अशा सोपेपणाने सांगण्याचा हा प्रयत्न होता. यामध्ये ब्रोकोली किंवा ऑलिव्ह यासारख्या नव्याने आपल्या आहारात सामील झालेल्या अन्नघटकांचा वेध घेण्यात आला. त्याचबरोबर मोड आलेल्या कडधान्याबरोबर तेल-तूप-लोणी-दूध असे पारंपरिक अन्नघटक ही, विज्ञानाच्या अंगाने सामील केले गेले. बदलत्या जीवनशैलीतून निर्माण होऊ शकणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांना खाण्यापिण्याच्या सवयी कशा कारणीभूत ठरू शकतात, याचे सूचन त्यातून झाले.

डॉ. मानसी राजाध्यक्ष यांच्यासह स्वयंपाकघरातील विज्ञानाचा वर उल्लेखिलेला जो थोडाफार ऊहापोह या सदरात गेले वर्षभर केला, त्याला ‘लोकसत्ता’च्या महाराष्ट्रातील नव्हे तर देश-विदेशातील वाचकांनी सुजाण प्रतिसाद दिला. अन्न आणि आरोग्य एकमेकांशी अतूटपणे जोडलेले आहेत, याची जाणीव रुजते आहे असे आश्वासन येणाऱ्या प्रतिसादातून मिळाले, त्यामुळे उपक्रम करण्याचा आनंद द्विगुणित झाला. प्रत्येक लेखानंतर ई-मेलने काही प्रश्न, काही कौतुक आणि काही नवीन माहिती मिळत गेली. त्यामुळे आम्हा दोघींनाही हे सदर समाधान देणारे ठरले.

(सदर समाप्त)

chaturang@expressindia.com

First Published on December 29, 2018 3:11 am

Web Title: balanced diet for good health healthy eating healthy diet