24 October 2020

News Flash

कोबी-द्वय!

हिरवा आणि जांभळा कोबी याचंच उदाहरण घेऊ या. तसं बघायला गेलं तर दोन्हीत तसा काही खूप फरक नाही.

हिरवा आणि जांभळा कोबी

पूर्वी बऱ्याच प्रमाणात हिरव्या आणि क्वचित मध्ये-मध्ये लाल माठासारख्या एखाद्या भाजीने भाजीवाल्याची टोपली भरायची; पण हल्ली पिवळ्या, लाल किंवा जांभळ्या अशा अनेक आकर्षक रंगांनी तिच टोपली अक्षरश: सजलेली असते. त्यातच कुठल्या तरी सोशल मीडियावर आपण कुठल्या न कुठल्या भाज्यांचं गुणगान वाचतो आणि आपला मोर्चा रंगीत भाज्यांकडे वळवतो. रंगरंगोटी केलेल्या या भाज्या कधी कधी अवाच्या सवा किमतीला विकत घेतो. याच भाज्यांच्या हिरव्या भाऊबंदांपेक्षा नेमकं या भाज्यांमध्ये काय वेगळं आहे, याचा शोध मात्र घेतोच असं नाही.

हिरवा आणि जांभळा कोबी याचंच उदाहरण घेऊ या. तसं बघायला गेलं तर दोन्हीत तसा काही खूप फरक नाही. दोन्हीमध्ये उत्तम प्रमाणात ‘फायबर’ असतं. दोन्हीमध्येही क्षार आणि जीवनसत्त्वं विपुल प्रमाणात! दोन्ही प्रकारच्या कोबींच्या सेवनाचा; कर्करोग, मधुमेह किंवा हृदयविकार यांसारख्या विकारांवर मात करण्यासाठी सारख्याच प्रमाणातला वाटा! नाही म्हणायला हिरव्या कोबीपेक्षा जांभळ्या कोबीमध्ये ‘अ’ जीवनसत्त्व खूप जास्त प्रमाणात असतं. तसंच जांभळा कोबी त्याच्या हिरव्या भावापेक्षा ‘लोह’ आणि ‘अ‍ॅन्थोसायनीन’ या एका विशिष्ट रसायनाच्या बाबतीत थोडासा जास्त श्रीमंत असतो. आपल्या शरीरातलं ‘लोह’ या रक्तात असलेल्या घटकाचं महत्त्व आपण जाणतो, तर ‘अ‍ॅन्थोसायनीन’ हेही अनेक विकारांवर मात करण्यासाठी आणि काही प्रमाणात स्मरणशक्ती वाढवण्यासाठी कामी येतं; पण लोह असो की ‘अ’ जीवनसत्त्व असो अथवा अ‍ॅन्थोसायनीन, हे सर्व घटक हिरव्या कोबीतही थोडय़ा कमी प्रमाणात.. पण असतातच! दुसऱ्या बाजूला हिरव्या कोबीमध्ये मात्र; हाडांच्या आरोग्यासाठी आणि उत्तम रक्ताभिसरणासाठी मदत करणारं ‘के’ जीवनसत्त्व; जांभळ्या कोबीपेक्षा किती तरी जास्त प्रमाणात असतं! थोडक्यात काय, हिरवा कोबी असो की जांभळा कोबी, आपल्या आरोग्याला असलेल्या उपयुक्ततेबद्दल त्यांच्यात डावं-उजवं करता येणार नाही. तेव्हा दोघा बंधूंची योग्य प्रमाणात सांगड घालून गृहिणींनी एखादी झकास रेसिपी बनवणं श्रेयस्कर!

असं असेल तर मग दोघांच्या किमतीत तफावत का बरं? जांभळा कोबी, हिरव्या कोबीपेक्षा महाग! याला खरं तर तसं नेमकं काही कारण नाही; पण जांभळा कोबी हिरव्या कोबीपेक्षा कमी पिकवला जातो आणि मागणी मात्र जास्त म्हणून असेल किंवा कदाचित दिसायला जरा आगळ्यावेगळ्या रंगाचा म्हणून त्याच्याबद्दल वाटणाऱ्या आकर्षणामुळे असेल; त्याची किंमत हिरव्या कोबीपेक्षा जास्त ठेवणं शक्य होतं आणि तशी ती दिलीही जाते!

डॉ. मानसी राजाध्यक्ष manasi.milind@gmail.com  

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2018 1:23 am

Web Title: green and purple cabbage
Next Stories
1 पौष्टिक गव्हाचं पीठ
2 ‘बत्तीस वेळा चर्वण’!
Just Now!
X