25 March 2019

News Flash

साखर आपली सखी

आपल्या रोजच्या आहारात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रूपात बहुसंख्य पदार्थात साखर असते.

वसुंधरा देवधर  vasudeo55p@gmail.com

साखरेबद्दल आपणास बरीच शास्त्रीय माहिती आधीच्या लेखातून दिली गेली आहे. मात्र दैनंदिन जीवनात, रोजच्या आहारात तिचा योग्य उपयोग करून घेणे महत्त्वाचे ठरेल. प्रकृतीनुसार नीट उपयोग केल्यास ती आपली सखी ठरेल.

एनसीडी (रक्तदाब, मधुमेह व हृदयविकार)चे प्रमाण अत्यंत वेगाने वाढत आहे आणि त्याला आहारातील साखर आणि भात हेच ‘फक्त’ जबाबदार आहेत, अशी एकारलेली भूमिका अयोग्य ठरू शकते. कारण हे विकार होण्याची विविध कारणे असतात (जसे आनुवंशिकता/ जीवनशैली इ.), ती समजून घेतली पाहिजेत. केवळ गोड आणि पिष्टमय पदार्थाना दोष देणे, ते पूर्णपणे टाळणे, यामुळे ऊर्जा व उत्साह कमी होऊ  शकतात. अशा वेळी झटपट उत्साह मिळण्याचा दावा करणारी पेये प्यायली जातात, त्याने तात्पुरते काम होते. मात्र त्यातील सगळीच आरोग्यस्नेही असतील असे नाही.

आपल्या रोजच्या आहारात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रूपात बहुसंख्य पदार्थात साखर असते. आपण जाणताच की साखर, पिठीसाखर, गूळ, मध, काकवी यामध्ये ती प्रत्यक्ष स्वरूपात असते. अप्रत्यक्ष स्वरूपात साखर मिळते ती सर्व पिष्टमय पदार्थाद्वारे. जसे : तांदूळ, गहू, मका इत्यादीपासून बनलेले पदार्थ. शिवाय पिष्टमय कंदांमध्ये अप्रत्यक्ष रूपात असणाऱ्या साखरेचे प्रमाण कंदाप्रमाणे बदलते, जसे बटाटा, रताळी, बीट किंवा टॅपिओका (साबुदाणा उत्पादनासाठी वापरतात) यामध्ये जास्त प्रमाणात तर गाजर, तिखट कांदा-मुळा यामध्ये तुलनेने कमी प्रमाणात असते. या अप्रत्यक्ष थोडय़ाशा साखरेची चव, शिजवलेल्या कांदा अगर मुळ्यातून आपल्याला जाणवते. शिवाय फळांमध्ये आणि सुक्या मेव्यात सुद्धा जास्त/कमी प्रमाणात साखर असतेच. म्हणून प्रत्यक्ष साखर कमी/वर्ज्य केली, तरी अशी अप्रत्यक्ष साखर आपल्या आहारातून मिळत राहते.

मुख्य म्हणजे शरीरातील विविध महत्त्वाच्या संस्थाचे कार्य योग्य प्रकारे चालण्यासाठी आवश्यक ऊर्जा साखरेतूनच मिळत असते. थकवा आला असता साखर/गूळ घेण्याने ताजेतवाने वाटते. इतकेच नव्हे तर मधुमेही व्यक्तीला सुद्धा रक्तातील साखर प्रमाणापेक्षा कमी होणे धोक्याचे ठरू शकते. मेंदूचे कार्य सुविहितपणे सतत चालण्यासाठी तर प्राणवायू आणि साखर (ग्लुकोज) हेच दोन कळीचे घटक आहेत. हे सर्व लक्षात घेऊन साखरेशी योग्य तेवढी मैत्री ठेवायला नको का?

chaturang@expressindia.com

First Published on November 3, 2018 1:25 am

Web Title: importance of sugar in the human body