डॉ. मानसी राजाध्यक्ष

दिसायला कॉलिफ्लॉवर आणि रंग मात्र ब्रोकोलीचा असलेला ‘ब्रोकोफ्लॉवर’! ब्रोकोली आणि कॉलिफ्लॉवरचा हायब्रीड असलेला हा ब्रोकोफ्लॉवर, गेल्या काही दशकांतच विकसित केला गेला आहे. हरितद्रव्य असल्यामुळे हिरवा रंग प्राप्त झालेला हा कॉलिफ्लॉवरच्या गटातला एक नवा सदस्य! हा चवीला ब्रोकोली आणि कॉलिफ्लॉवरपेक्षा सौम्य असला तरी जरा जास्त शिजला की त्याला एक प्रकारचा उग्र गंध येतो.

अनेक प्रकारच्या कर्करोगांना आळा घालणारा, हाडांना आणि स्नायूंना ताकद देणारा, सर्दी, ताप आणि तत्सम अनेक प्रकारच्या रोगांच्या जंतूंशी लढणारा, मेंदूची कार्यशक्ती वाढवणारा, हृदयाची काळजी घेणारा, कुठलीही जखम लवकर भरून येण्यासाठी मदत करणारा, रक्तातल्या लाल पेशींचं आरोग्य उत्तम राखणारा आणि डोळ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारा असा हा ‘ब्रोकोफ्लॉवर’!

‘ब्रोकोफ्लॉवर’मध्ये कबरेदके आणि कॅलरीज अगदी कमी प्रमाणात असतात. त्यामुळे वजन वाढू न देण्यासाठी ‘ब्रोकोफ्लॉवर’चा आहारातला समावेश महत्त्वपूर्ण ठरतो. जखम झाल्यावर जास्त रक्त वाहून जाऊ नये म्हणून, रक्त गोठण्याची क्रिया होत असते. त्यासाठी ‘के’ या जीवनसत्त्वाची गरज असते. ‘ब्रोकोफ्लॉवर’मध्ये या जीवनसत्त्वाचं प्रमाण खूप जास्त असतं. त्याचप्रमाणे ‘ब्रोकोफ्लॉवर’मध्ये ‘क’ जीवनसत्त्वही जास्त प्रमाणात असतं. बऱ्याच मंडळींना हाडांच्या ठिसूळपणाची व्याधी असते. आहारात ‘ब्रोकोफ्लॉवर’चा समावेश केला तर हाडांचा ठिसूळपणा कमी व्हायला खूप मदत होते.

‘ब्रोकोफ्लॉवर’ सर्व ठिकाणी आणि सहजी मिळतो असं नाही. पण ‘ब्रोकोफ्लॉवर’ हा भाज्यांमाधल्या कृसिफेरस किंवा कोल या गटातला! या गटातले इतर सदस्य म्हणजे कोबी, कॉलिफ्लॉवर, ब्रोकोली, नवलकोल, सलगम, राई इत्यादी! या गटातल्या भाज्यांचं वैशिष्टय़ म्हणजे त्यांच्यामध्ये असलेलं ‘अ‍ॅन्टिऑक्सिडंट्स’चं जास्तीचं प्रमाण! ज्यामुळे कोणत्याही प्रकारच्या कर्करोगाला आळा बसतो आणि कर्करोग कमी व्हायलाही मदत होते. फक्त या भाज्या जास्त शिजवल्या तर त्यांच्यातला हा गुणधर्म लोप पावतो. तसं या भाज्या खूप जास्त वेळ साठवून ठेवल्या तरी त्यांचा हवा तसा फायदा आरोग्याला होत नाही. म्हणूनच या साऱ्या भाज्या ताज्या असतानाच खाव्यात आणि अगदी कमी शिजवाव्यात.

कृसिफेरस गटातल्या भाज्यांचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे त्यांचा सूज उतरवण्याचा गुणधर्म! त्यामुळे हृदयाच्या कार्याला मदत होते. या भाज्यांमधल्या काही घटकांमुळे रक्तातल्या नकोशा कोलेस्टेरॉलला, रक्तवाहिन्यांमध्ये साचू दिलं जात नाही आणि परिणामी हृदयविकार होण्याची शक्यता खूप कमी होते.

manasi.milind@gmail.com

chaturang@expressindia.com