16 January 2019

News Flash

‘जंक’ फूड!

‘जंक’ फूड म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर पिझ्झा, बर्गर किंवा तत्सम पदार्थ तरळायला लागतात

|| डॉ. मानसी राजाध्यक्ष

भारतीय संस्कृतीत अन्नाला ‘पूर्णब्रह्म’ म्हटलं गेलंय.. आणि डिक्शनरीमध्ये तर ‘जंक’ या शब्दाचा अर्थ आहे काही किंमत नसलेलं.. निरुपयोगी! पूर्णब्रह्म असलेलं अन्न निरुपयोगी कसं असेल? आणि तसं असेलच तर नेमक्या कोणत्या प्रकारच्या अन्नाला ‘जंक’ फूड म्हणतात?

‘जंक’ फूड म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर पिझ्झा, बर्गर किंवा तत्सम पदार्थ तरळायला लागतात; पण ‘अन्न’ या विषयाचा सखोल अभ्यास करणाऱ्या अनेक वैज्ञानिकांच्या मते ‘जंक फूड’ म्हणजे असा कोणताही अन्नपदार्थ, ज्यामध्ये कॅलरीज किंवा स्निग्धांश खूप जास्त प्रमाणात आहेत आणि प्रोटीन्स म्हणजे प्रथिनं, तंतुमय पदार्थ, जीवनसत्त्व आणि क्षार यांचं प्रमाण मात्र अतिशय कमी आहे किंवा असे पदार्थ ज्यामध्ये मीठ, तेल यांचं प्रमाण त्यातल्या प्रथिनांपेक्षा खूप जास्त आहे. काही ठरावीक प्रमाणाबाहेर अशा प्रकारच्या अन्नाचं सेवन केलं तर आपल्या प्रकृतीवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो, म्हणून अशा सर्व पदार्थाना ‘जंक’ फूड म्हणता येईल.

म्हणजे खरं तर लोणची, पापड, भजी हे पदार्थ जंक फूडमध्येच मोडायला हवेत नाही का? एवढंच कशाला साखरेच्या पाकाने थबथबलेली केशरी जिलेबी; साखरेच्या पाकातच मुरलेले रसरशीत गुलाबजामही ‘जंक’ फूड म्हणूनच गणले जायला हवेत. लालबुंद तेलाचा तवंग असलेली आणि फरसाण, शेव अशा तळलेल्या पदार्थानी सजलेली मिसळ आणि त्याबरोबर मैद्याचा पाव किंवा गरमागरम बटाटावडा हेही पदार्थही ‘जंक’ फूड म्हणायला हवेत; पण असं बघा.. आपण कधी वाटीभर लोणचं घेऊन खात नाही किंवा पोळ्या किंवा भाताऐवजी ताटभर भजी घेऊन खात नाही. सणावाराला आपण पानात एखाद-दुसरी जिलेबी घेऊन चवीचवीने खातो. त्यामुळे अत्यंत योग्य प्रमाणात खाल्ले गेले तर हे पदार्थ चक्क आपल्या चौरस आहाराचा एक महत्त्वाचा भाग होतात.

थोडक्यात, कोणत्याही प्रकारच्या अन्नपदार्थाचा अतिरेक आपल्या आहारात असणं म्हणजे ‘जंक’ फूड खाणं.. अशी आपण ‘जंक’ फूडची सोपी व्याख्या करू या. त्यामुळे दोन गोष्टी होतील, कळत-नकळत आपल्या नेहमीच्या आहारात एखाद्या गोड, खारट, तेलकट पदार्थाचा अतिरेक होत असेल तर ते ‘जंक’ फूड टाळता येईल आणि पिझ्झा, बर्गर यांसारखे तद्दन ‘जंक’ फूड अशा प्रकारात विनाकारण गणले जाणारे पदार्थ, ‘हेल्दी’ फूड म्हणून कशा प्रकारे आपल्या आहारात सामावून घेता येतील याचा आपण विचार करू शकू.

manasi.milind@gmail.com

chaturang@expressindia.com

First Published on May 5, 2018 1:42 am

Web Title: junk food 3