12 December 2017

News Flash

व्यवसायाचा आराखडा

ध्येय गाठण्यासाठी विविध टप्पे करून प्रत्येक टप्प्यावर आपण कुठे पोहचू हे माहीत असावे लागते.

नेहा खरे | Updated: March 11, 2017 12:50 AM

व्यवसाय यशस्वी करण्यासाठी त्याचे विचारपूर्वक नियोजन करणे आवश्यक असते.

व्यवस्थापन हा व्यवसायाचा महत्त्वाचा भाग आहे. व्यवसाय यशस्वी करण्यासाठी त्याचे विचारपूर्वक नियोजन करणे आवश्यक असते. त्यासाठीच व्यवसायाचा आराखडा तयार करून व्यवसायाच्या भविष्याचे चित्र आधीपासूनच तयार केले जाते. व्यवसायातील ध्येय ठरवून निरनिराळ्या पातळींवर त्याचा आराखडा तयार केला की यश मिळण्याची शक्यता खूपच वाढते.

आजची योजना हे उद्याचे यश असते. तुमच्या व्यवसायाची मांडणी तुम्ही कशी करणार याचा विचार करा. तुमच्या मनात तुमच्या व्यवसायाचे चित्र पूर्ण आहे का? असेल तर ते लिहून काढा. त्यावर पुन्हा पुन्हा विचार करा, त्यातल्या मर्यादा, संभावित तोटे यांचा पुन्हा पुन्हा विचार करा. आणि मगच कामाला लागा. तुमच्या व्यवसायाचा आराखडा हे तुमच्या हातातील सर्वात महत्त्वाचे हत्यार आहे. यामुळे तुम्ही व्यवसाय सुरू करू शकता किंवा वाढवू शकता. तुम्ही बनवलेला आराखडा हा तुमच्या कल्पनांचा व ध्येयाचा उत्तम संवादक असावा.

व्यवस्थापन हा व्यवसायाचा महत्त्वाचा भाग आहे. कुठलाही क्रिकेटचा सामना खेळण्याआधी त्याची योजना तयार करावी लागते. ज्या संघाचे नियोजन जबरदस्त असते त्या संघाला मैदानात योग्य रणनीतीच्या आधारावर सामना जिंकता येतो. याचाच अर्थ फक्तखेळ खेळता येणे हे सामना जिंकण्यासाठी पुरेसे नाही. सामना जिंकण्यासाठी त्याचे पूर्ण नियोजन, आराखडा तयार करता आला पाहिजे. त्याचप्रमाणे व्यवसाय यशस्वी करण्यासाठी त्याचे पूर्वनियोजन करणे आवश्यक आहे. हे नियोजन पुढचा काळ गृहीत धरून, भविष्याचे चित्र समोर ठेवून तयार केले जाते. त्यासाठी व्यवसायातील ध्येय नेमके काय आणि ते कधीपर्यंत साध्य करायचे आहे. आणि पुढच्या काळात ते कसे वाढवत नेणार ते ठरवणे आवश्यक आहे.

तीन महत्त्वाचे मुद्दे तुमच्या आराखडय़ात असणे आवश्यकच आहे. तुम्ही कोण आहात? तुम्हाला या क्षेत्रात नेमके काय करायचे आहे व तुम्ही स्वत: व कंपनीचे पाय घट्ट रोवून किती काळ उभे राहू शकता यावर विचार करायला हवा. याशिवाय सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचे ग्राहक कोण असणार, त्यांच्या गरजा लक्षात घेऊन त्याप्रमाणे नियोजन करा. तुमच्या ध्येयावर ठाम राहा. तुमचे उत्पन्न व वृद्धी यांची विस्तृत माहिती द्या. तुमची विक्री, उत्पन्न आणि नफा-तोटा यासाठी कोण जबाबदार असेल याचा विचार करा. हा आराखडा ५ ते ४० पानांचा असू शकतो. मुख्य मायना १०-१२ पानांचा व ५-६ पाने आर्थिक माहिती वा फायनान्स प्लानचा हवा.

आराखडा करताना सुरुवातीला निवडलेला व्यवसाय; व्यवसायाची व्याप्ती, ग्राहकांची वैशिष्टय़े, या व्यवसायातील स्पर्धक असतील तर त्यांची वैशिष्टय़े यांचा विचार करणे महत्त्वाचे आहे. आपले विचार वास्तवात आणण्यासाठी आपल्याला त्याचे सविस्तर वर्णन करावे लागते. ध्येय गाठण्यासाठी विविध टप्पे करून प्रत्येक टप्प्यावर आपण कुठे पोहचू हे माहीत असावे लागते. नेमक्या गरजांचा अंदाज घेणे हा आढाव्यामागचा एक महत्त्वाचा टप्पा असतो. आपला आराखडा वास्तवात आणण्यासाठी नेमक्या कोणत्या कौशल्याची गरज आहे? कोणती यंत्रसामग्री लागेल? वेळेचे गणित काय असेल? कोणत्या प्रकारचे प्रशिक्षण लागेल? सर्वात प्रथम कोणती कृती करायची येथपासून सर्व कृती क्रमाक्रमाने लिहिणे या ठिकाणी अपेक्षित आहे. कृती आराखडय़ावरून कृतीची यादी करताना यापुढे ती कृती किती दिवसांत, कोणी करायची. त्यासाठी मनुष्यबळ किती लागेल आणि कृती पूर्ण झाल्याची नोंद करावी लागते.

खर्चाचा अंदाज घेणे

आपला विचार प्रत्यक्षात उतरवण्याच्या मार्गक्रमणाच्या आराखडय़ानुसार प्रत्येक टप्प्याच्या खर्चाच्या दृष्टीने विचार करून कोणत्या कृतीला किती खर्च येईल याचा तपशील या भागात असतो. आराखडय़ानुसार खर्चाचा अंदाज घेतल्याने प्रत्यक्ष खर्च आणि अंदाज यामध्ये फार तफावत राहात नाही आणि काही खर्च विचारात घ्यायचे राहून गेले असेही होत नाही.

आपला आराखडा म्हणजे आपल्या उद्योगाची ब्लुप्रिंट! यामध्ये सुरुवातीचे भांडवल, उत्पादनांचा खर्च, कच्चा माल कुठे आणि कसा मिळणार, प्रॉडक्ट ब्रॅण्ड, मार्केटिंग प्लॅन, प्रॉफिट मार्जीन, तुमचे स्पर्धक- त्यांचे उत्पादन अशा सगळ्या गोष्टींचा सामावेश असतो. या आराखडय़ाची चार विभागांत जर विभागणी केली तर पहिल्या विभागात व्यवसायाची दूरगामी उद्दिष्टे, दुसऱ्या विभागात

ध्येय साध्य करण्याकरिता उपयोगी पडतील असे निर्णय कोणते ते सांगणे. तिसऱ्या विभागात

दैनंदिन कामकाज ज्या प्रक्रियेद्वारे चालते त्याचा सामावेश होतो आणि चौथ्या विभागात ठरवलेल्या योजनेनुसार जर गोष्टी झाल्या नाहीत तर आधीपासून ठरवलेला दुसरा प्लॅन व तिसरा प्लॅन कोणता हे ठरवायचे काम होते.

पहिल्या विभागात किंवा पहिल्या टप्प्यामध्ये वार्षिक व्यावसायिक यश संपादन करण्यासाठी व्यवसायाच्या विविध विभागांना अनुसरून महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातात. व्यवसायामध्ये आवश्यक बदल घडवून आणण्यासाठी प्राधान्य देऊन निर्णय ठरवले जातात. व्यवसायाची वार्षिक विक्री, ध्येय, नफा प्राप्ती, उत्पादनक्षमता, मार्केटिंग, ग्राहकसेवा, बजेट वा भांडवल उभारणी इत्यादी ठरवले जाते. उदाहरण घ्यायचे झाल्यास एखाद्या मॅन्युफॅक्चिरग कंपनीचे ध्येय १ कोटी रुपये असेल तर त्यासाठी काय करावे लागेल? मनुष्यबळ किती लागेल, टीम कशी निवडायची भांडवल कधी कधी आणि किती लागेल व ते कसे उभे करणार याचा विचार करावा लागतो.

यानंतर लगेचच आपल्याला दुसरा विभाग कार्यान्वित करावा लागतो. यामध्ये विशेष व्यावसायिक निर्णयांचा विचार करावा लागतो. यामध्ये आपण निवडलेल्या सहकाऱ्यांशी बोलून ध्येय निश्चितीचा रस्ता कसा पार करायचा याची तयारी करावी लागते. जर आपण ठरवलेल्या लक्ष्यांमध्ये (टार्गेट) वाढ करण्याची वेळ आली किंवा कमी पडलो तर अंतर्गत पुरवठा उत्पादन प्रक्रिया, नवीन यंत्रसामग्री, पुरवठय़ाच्या प्रक्रियेचा दर्जा या बाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात येतात.

आपण तयार केलेला कृती-आराखडा वास्तवात किंवा प्रत्यक्षात उतरवण्यासाठी तिसऱ्या विभागाची मदत घ्यावी लागते. आपण कर्मचाऱ्यांना हाताशी धरून कोणकोणत्या गोष्टी प्रत्यक्षात कृती स्वरूपात करणार याचे पूर्ण आकलन आराखडा या भागात बनवता येतो. कारण शेवटी घेतेलेला निर्णय व त्यांची अंमलबजावणी यातला दुवा कामगारवर्ग असतो आणि त्याप्रमाणे कामाची विभागणी आपल्याला करायची असते. यामध्ये प्रत्येक टप्प्या टप्प्यावर लक्ष ठेवून ते पूर्ण करून घ्यावे लागते.

चौथ्या विभागाकडे जर आपण ठरवलेल्या गोष्टी अपेक्षेप्रमाणे होत नसतील तर आपल्या आराखडय़ातील कृती १, कृती २ आणि कृती ३ असे भाग करावे लागतील. तर पहिल्या निर्णयाची अंमलबजावणी करताना जसे हवे तसे फळ मिळत नसेल तर दुसरा आराखडा हातात घ्यायचा निर्णय घ्यावा लागतो. असे होऊ नये म्हणून स्ट्रेटॅजिक प्लॅनिंग करावे लागते. अशा पद्धतीने बनवलेला व्यवसायाचा रिपोर्ट आपल्याला बँकांना, भांडवल गुंतवणूकदारांना आपला चोख व्यवसाय हेतू कळण्याकरिता होतो. सुरुवातीला तुमची माहिती, कंपनीची माहिती, तुमची व्यावसायिक उद्दिष्टय़े, व्यवसायाचे ध्येय, आपल्या चांगल्या गोष्टी, आपले स्ट्राँग पॉइंट, वीक पॉइंट, व्यवसायाचा यूएसपी म्हणजे आपल्या व्यवसायाची वैशिष्टय़े आणि व्यवसायाची बाजारपेठ आणि वार्षिक ध्येयाला अनुसरून तिमाही किंवा मासिक ध्येय ठरवणे ही असते. जाहिरातीसाठी एक वेगळा विभाग त्यामध्ये असावा लागतो. कंपनीचे प्रोफाइल चांगले लिहिणे फार महत्त्वाचे आहे.

थोडक्यात, व्यवसाय सुरू करण्याआधी त्याचा पूर्ण आणि विचारपूर्वक केलेला आराखडा तयार करणे खूपच महत्त्वाचे आहे. त्यावरच तुमचे यशापयश अवलंबून असते.

नेहा खरे neha18.mirror@gmail.com

First Published on March 11, 2017 12:50 am

Web Title: business plan business management business scope