News Flash

व्यवसायासाठीचं नेटवर्किंग

व्यवसायाच्या वाढीचा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणजे व्यावसायिक जनसंपर्क होय.

स्त्रियांच्या सक्षमीकरणाकरता व्यवसायाच्या दृष्टीने स्त्रियांना व्यवसायासाठी नेटवर्किंग आवश्यक आहे

व्यवसायाच्या वाढीचा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणजे व्यावसायिक जनसंपर्क होय. यामुळे बाजारपेठेमधील आपल्या संभाव्य ग्राहकांशी, इतर उद्योजकांशी थेट संपर्क होतो. अशा देवाणघेवाणीमधून परस्परांची व्यावसायिक, आर्थिक प्रगती शक्य होते. एखाद्या क्षेत्राबद्दल किंवा विशिष्ट व्यवसायाबद्दल आपल्याला इत्थंभूत माहिती मिळते. त्यासाठी प्रत्येक उद्योजकाने आपले जनसंपर्काचे जाळे अर्थात नेटवर्किंग वाढवले पाहिजे.

कुठलाही व्यवसाय किंवा उद्योग करताना स्वत:मध्ये खूप बदल होत असतात, कारण व्यवसाय करणाऱ्याला कधी यश, अपयश, नफा-तोटा, निराशा अनुभवायला येते तर कधी आनंदाचे, आश्चर्याचे धक्केही बसू शकतात. साहजिकच त्याचा परिणाम त्या त्या उद्योजकावर होतोच. व्यवसायाच्या उतार चढावात आपण वैयक्तिकरीत्या खूप शिकतो, घडतो. त्यानिमित्ताने खूप माणसं आपल्या परिचयाची होतात, मुद्दाम ओळखी काढाव्या लागतात, त्यातून महत्त्वाचं घडतं ते नेटवर्किंग. वेगवेगळ्या माणसांना भेटून त्यांचं एक मोठं नेटवर्किंगचं जाळं आपल्याकडून कधी विणलं जातं हे आपल्या लक्षातही येत नाही. पण ते टिकावं, वाढावं यासाठी आपल्याला जाणीवपूर्वक खास प्रयत्न करावे लागतात.

करिअर, उद्योग या संबंधित व्यक्तीशी जाणीवपूर्वक संपर्क साधणे यालाच व्यावसायिक जनसंपर्क किंवा प्रोफेशनल नेटवर्किंग असं म्हणतात. यामुळे बाजारपेठेमधील आपल्या संभाव्य ग्राहकांशी थेट संपर्क होतो. अशा देवाणघेवाणीमधून परस्परांची व्यावसायिक, आर्थिक प्रगती शक्य होते. एखाद्या क्षेत्राबद्दल किंवा विशिष्ट व्यवसायाबद्दल आपल्याला इत्थंभूत माहिती मिळते. व्यावसायिक वाढ होण्यासाठी आपल्याला आपण स्त्री असण्याच्या गुणांचा वापर आपल्या व्यवसाय वृद्धीसाठी करून घेता येतो. कारण असा अनुभव आहे की स्त्रियांना गोष्टी नीट समजून सांगता येतात. समजून घेता येतात.

व्यवसायाच्या वाढीचा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणजे व्यावसायिक जनसंपर्क होय. ही संकल्पना पूर्वीपासून आपल्या देशात होती; पण साधारणपणे गेल्या दशकापासून या संकल्पनेला खतपाणी मिळालं आणि खूप सारे व्यावसायिक, संस्था यांनी नेटवर्किंगच्या माध्यमातून व्यावसायिक वृद्धी केली. समाजातील वेगळ्या घटकांमध्ये ते फार पूर्वीपासून व्यापारामध्ये एकत्रित येऊन एकमेकांना मदत करत पुढे चाललात. स्त्रियांच्या सक्षमीकरणाकरता व्यवसायाच्या दृष्टीने स्त्रियांना व्यवसायासाठी नेटवर्किंग आवश्यक आहे आणि ते प्रयत्नपूर्वक करणं आवश्यक आहे. आताच्या स्त्रिया ज्यांना उद्योग सुरू करायचे आहेत किंवा व्यवसायाची वाढ करायची आहे त्यांनी त्यांच्याकडे असलेले ज्ञान आणि बाजारपेठेत त्यासाठी उपलब्ध असलेली साधने यांचा विचार केला पाहिजे.

मुळात व्यवसायात नेटवर्किंग म्हटलं म्हणजे फक्त एका विशिष्ट व्यवसायाच्या किंवा काही विशिष्ट लोकांच्या संपर्कात येऊन एकत्रपणे काम करणे असे नाही. तर व्यवसायाशी निगडित कुठल्याही घटकाशी आपण जोडलो गेलो पाहिजे. आणि व्यवसाय हा व्यवसाय असतो तो लहान किंवा मोठा, स्त्रियांचा किंवा पुरुषांचा असा नसतो. खरंतर माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात भाषा, जात, प्रदेश आणि देशाच्या भिंतीसुद्धा केव्हाच कोसळून पडलेल्या आहेत. आज फक्त गुणवत्ता, हुशारी हेच एक चलन सर्व क्षेत्रात चालतं. तुमच्याकडे हुशारी, चिकाटी किंवा काहीतरी करण्याची इच्छा आहे, ते करण्याची ताकद हे सगळ्यांपर्यंत पोहचवण्यासाठीचा किंवा तुमच्याकडे असलेल्या कल्पना लोकांपर्यंत किंवा जे लोक भांडवल गुंतवणूक करतात त्यांच्यापर्यंत  पोहचण्याचा उत्तम मार्ग म्हणजे नेटवर्किंग.

आपण आजपर्यंत किंवा कालपर्यंत काय केलं याचा विचार करू नका. भावनेच्या आहारी न जाता व्यावहारिक दृष्टीने जर आपण या प्लॅटफॉर्मचा वापर केला तर तो जास्त सोयीचा ठरतो. हे नेटवर्किंग म्हणजे आपण प्रत्येकाकडे जाऊन आपले उत्पादन विकत घ्या, असं सांगणं नव्हे. आपल्या नेटवर्कमध्ये असणाऱ्या प्रत्येकाने आपले उत्पादन विकत घेतलेच पाहिजे किंवा अशा ठिकाणी जाऊन लगेच आपला व्यवसाय चार पटीने वाढला गेला पाहिजे असं लगेच होत नाही. आपल्याला जे आवडतं ते आपण बघतो. माहीत करून घेतो तसं आपल्याला एखाद्या व्यक्तीने जर व्हिजिटिंग कार्ड दिलं तर त्यावरून आपल्याला त्या बाबतची माहिती कळते, पण इत्थंभूत माहिती हवी असेल तर आपण स्वत: त्या व्यक्तीशी जाऊन बोललं पाहिजे, त्याच्या गरजा समजून घ्यायला पाहिजे. त्यासाठी नेटवर्किंग उपयोगी पडतं. त्यांचा अनुभव आपल्याला खूप काही शिकवून जातो.

आताचे तरुण सोशल मीडिया, नेवर्किंग साइट यांवरून संपूर्ण जगाच्या जवळ गेले आहेत. ते खूप सोप्या रीतीने, भाषेत एकमेकांशी बोलतात, शेअर करतात, प्रश्न विचारतात. स्त्रिया, तरुणी आजही एका अनामिक भीतीने हे सगळं टाळतात. पण जर हेतू चांगला असेल, उद्दिष्ट एकदम पारदर्शी असतील तर आपलं उद्दिष्ट साध्य व्हायला वेळ लागत नाही. नेटवर्क म्हणजे लोकसंग्रह आणि बिझनेस नेटवर्क म्हणजे उद्योग व्यवसायाशी संबंधित लोकांचा संग्रह. आधी जर माझ्यापासून सुरुवात करायची झाली तर मी फक्त उद्योगाशी संबंधित संस्थांमध्ये सभासद होते. माझं वाचन आणि लिखाण हे उद्योग संदर्भातच असते. या सगळ्या गोष्टींचा उपयोग माझ्या व्यवसायासाठी मला होतो. वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळे उद्योग, व्यवसाय बघायला मिळतात. त्यांचे काम करण्याच्या पद्धती, निर्णय घेण्याची पद्धत बघावयास मिळते. तेच आपल्याला फक्त पुस्तकं वाचून, चार भिंतीत राहून नाही करता येत. त्यासाठी चौकटीतून बाहेर पडून नेटवर्किंग करावं लागेल मग त्यासाठी अनेक माध्यमं आहेत. आपण कितीही स्वत:ला हुशार समजत असलो तरी आपण एका दिवसात हे नेटवर्किंग पूर्ण करू शकत नाही. म्हणून बसल्या जागी विचार करा. आपल्या आजुबाजूला आपल्या घरची माणसं, नातेवाईक, मित्रमंडळी आणि त्या प्रत्येकाचे इतर शंभर लोक तरी परिचयाचे असतील. शिवाय आपल्याला अपेक्षित असलेले ग्राहक, आपण जिथे काम करतो किंवा करू इच्छितो त्यांच्याशी संबंधित व्यक्ती कोण आहेत त्यानंतर आपण कुठल्या क्लबचे वगैरे सभासद आहोत का? आपण समारंभाला जातो, कार्यक्रमांना जातो, पर्यटनाला जातो अशा विविध ठिकाणी माणसं भेटतात. आताच्या इंटरनेटच्या युगात लिंक्ड इन, फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅपवरसुद्धा नेटवर्किंग होतं. स्त्रियांनी याचा पुरेपूर उपयोग विविध क्षेत्रातील माणसं शोधण्यासाठी आणि जोडण्यासाठी करायला पाहिजे. कुठल्याही व्यवसायासाठी लागणारे भांडवल, परदेशी गुंतवणूक, मार्केटिंग ब्रॅण्ड, प्रॉडक्ट जाहिरात, मनुष्यबळ, विविध सरकारी परवाने किंवा इतर कुठल्याही गोष्टी घरबसल्या शक्य होणार नाही. बाहेर पडून सगळ्यांशी बोलून त्यांच्या अनुभवातून, तुमच्या अभ्यासातून आपली व्यवसाय वृद्धी शक्य आहे. फक्त वैयक्तिक गोष्टीची चर्चा करणे टाळले पाहिजे. चर्चा ही औपचारिक असेल तर खूप चांगले.

आपले मत फक्त मांडण्यापेक्षा दुसऱ्याचे मत ऐकणे आणि समजून घेणं महत्त्वाचं आहे. सुसंवाद होणं अपेक्षित आहे. सुसंवाद चुकला तर नेटवर्किंग थांबतं त्यामुळे संपर्कात येणाऱ्या व्यक्तीचा विश्वास आणि शुद्ध व्यवसायिक हेतू आपल्या व्यावसायिक ध्येयनिश्चितीसाठी संपर्क व्यवस्थेची बांधणी करताना किंवा दुसऱ्या व्यक्तीच्या संपर्क असलेल्या संस्थांमध्ये सहभागी होताना आपले ध्येय सतत समोर ठेवावे. आपल्या ध्येयाशी निगडित सगळे लोक शोधून काढून त्यांच्याशी संपर्क करावा. वेगवेगळे परिसंवाद, परिषद, उद्योजक मेळावे, औद्योगिक प्रदर्शन यांना भेटी द्याव्यात. वेगवेगळ्या औद्योगिक संस्था आणि उद्योजक यांच्या संपर्कात राहण्यासाठी स्वेच्छेने विनामोबदला स्वयंसेवा करण्याची इच्छा प्रदर्शित करणे उपयोगी ठरते. आपले चातुर्य आपल्या संभाषणातून प्रवाही ठेवण्याची कला अवगत करावी लागेल. आपलं म्हणणं आणि समोरच्या व्यक्तीचं बोलणं यातून वैचारिक देवाणघेवाण झाली पाहिजे. स्त्रियांसाठी देहबोली खूप महत्त्वाची.  संपर्कात येणाऱ्या व्यक्तीचे कुठल्याही प्रकारचे गैरसमज होणार नाही याची काळजी स्त्रियांनी घेतली पाहिजे. आपल्याला काही गोष्टींचा पाठपुरावा करावा लागतो तो सातत्याने काळजीपूर्वक करणे आपल्या व्यवसायासाठी आवश्यक आहे.

या नेटवर्किंगमधूनच आपल्याला आपले व्यवसायातील सल्लागार, मार्गदर्शक मिळू शकतात. माहितीचे पुरवठादार यातूनच आपल्याला मिळतात. सोशल नेटवर्किंग हा एक खूप महत्त्वाचा प्रकार आहे. पण त्याचा अभ्यास आपण पुढच्या वेळी करणार आहोत.

नेहा खरे neha18.mirror@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2017 1:59 am

Web Title: networking benefits to grow business
Next Stories
1 व्यवसायाचा आराखडा
2 उद्योगासाठी भांडवल उभारणी
3 व्यवसायाचा शोध
Just Now!
X