22 July 2018

News Flash

वास्तवदर्शी आराखडा

व्यावसायिक आणि ग्राहक यांच्यातील संबंध हे खूप महत्त्वाचे ठरतात.

 

कोणताही व्यवसाय सुरू करण्यापूर्वी त्याचा आराखडा तयार करणे गरजेचे आहे. नियोजन, आवश्यक तयारी, कृती, परिणाम आणि परीक्षण या महत्त्वाच्या घटकांचा त्यात समावेश होतो. उत्तम व्यावसायिक आपल्या व्यवसायाचे जितके काटेकोर नियोजन करतो, तेवढय़ाच काटेकोरपणे त्याचे परीक्षण करीत असतो. आपल्या व्यवसायाचा आराखडा अधिक वास्तवदर्शी तयार करून त्याचा सातत्याने आढावा घेतल्यास यश मिळणार हे नक्की.

स्त्रियांच्या स्वत:कडून अपेक्षा जसजशा वाढत चालल्या आहेत तसतसा त्यांच्या कामासंदर्भात विचार करण्याच्या दृष्टिकोनातही मूलभूत फरक जाणवायला लागला आहे. पूर्वी एखाद्या स्त्रीने व्यवसाय करायचा ठरवलं तर ती घरगुतीच एखादा व्यवसाय निवडणार,असं म्हटलं जायचं. वेळ जावा म्हणून घरगुती व्यवसाय, अशी एक सामाजिक धारणा होती. मात्र काही वर्षांपासून या मानसिकतेत खूपच बदल घडलेला दिसतो आहे. अनेक स्त्रियांनी खूप वेगवेगळ्या क्षेत्रांचा विचार करून व्यवसायाला सुरुवात केलेली दिसते आहे. त्यात यशही मिळवलं आणि आज त्या त्यांच्या त्यांच्या व्यवसायात ठामपणे उभ्या राहिलेल्या दिसत आहेत. दुसऱ्यांसमोर आदर्श उभ्या करीत आहेत.

‘मी अर्थव्यवस्था या विषयातील तज्ज्ञ नाही, मी तंत्रज्ञानसंदर्भातील व्यवसाय उभारू शकते का? मला मूल्यनिर्धारण आणि निधिवृद्धीबद्दल काही कल्पना नाही. मी निधीत वाढ करू शकते का आणि तीदेखील योग्य मूल्यनिर्धारण करून’ हे प्रश्न घेऊनच शुभांगी तिरोडकर यांनी नवी मुंबई येथे सिमेंटचा व्यवसाय ३३ वर्षांपूर्वी सुरू केला आणि काळाच्या ओघात या प्रश्नांची उत्तरंही त्यांना मिळाली, तेव्हा स्त्रियांसाठी हे क्षेत्र अगदीच नवीन होतं. किंबहुना स्त्रिया नव्हत्याच. त्यामुळे सुरुवातीला पुरुष मंडळी त्यांच्याशी बोलायला किंवा भाव विचारायलासुद्धा येत नव्हते. पण त्यामुळे मागे न राहता जोमाने त्यांनी काम चालू ठेवलं आणि आज अत्यंत यशस्वी स्त्री व्यावसायिक म्हणून त्यांची ओळख आहे. त्या म्हणतात, ‘जेव्हा काम समोर येते, तुम्ही ते शिकता, तुम्ही काम करत असतानापण अनेक गोष्टी शिकत जाता. त्या शिकून घेण्याशिवाय तुमच्याकडे पर्याय नसतो. जे समजून घेणे गरजेचे आहे ते समजून घ्या आणि उर्वरित गोष्टी तज्ज्ञ लोकांवर सोपवा.’ त्या वेळी त्यांनी व्यवसायाचा आरखडा तयार नव्हता केला, पण व्यावसायिक संबंध वाढवून त्यांनी व्यवसाय वाढवला. व्यवसायाचा आराखडा तयार करण्यापूर्वी व्यवसायाचा विस्तृत विचार करून उद्दिष्ट निर्माण करूनच काम करावं लागतं. त्यानंतर व्यवसायाचा आराखडा बनवणं सोपं जातं. आपल्या व्यवसायावर वातावरणाचा, राजकीय किंवा इतर कोणत्याही गोष्टींचा परिणाम होऊ नये यासाठी दुसरा किंवा तिसरा आराखडाही तयार पाहिजे, असं त्या सांगतात.

व्यावसायिक आणि ग्राहक यांच्यातील संबंध हे खूप महत्त्वाचे ठरतात. मानसी खानोलकर या एक उद्योजिका. त्यांनी आर्थिक सल्लागार व्हायचं ठरवलं आणि तो व्यवसाय म्हणूनच सुरू करायचं ठरवलं. चांगल्या पगाराची नोकरी सोडून काही वेगळं शिकायची आणि करायची इच्छा त्यांना या व्यवसायात घेऊन आली. त्यांनी स्वत:चा व्यवसायाचा आराखडा तयार केला होता. त्यात स्वत:च्या कल्पनेबरोबर तज्ज्ञांचं मार्गदर्शनही घेतलं. त्यामुळे फोर्ट या उच्चभ्रू मानल्या जाणाऱ्या परिसरात पाच वर्षांत स्वत:चं ऑफिस त्यांना उभारता आलं. यशस्वी व्यवसाय सुरू करता आला. या सगळ्यासाठी स्वत:चा अभ्यास, तडफदारपणा, सामाजिक बांधिलकी या त्यांच्या गुणांचा त्यांना फायदा झाला. हा वेगळा व्यवसाय निवडताना फक्त सल्लागार म्हणून काम न करता ग्राहकांच्या व्यवसायाला पुरेपूर मदत कशी होईल याची त्या काळजी घेतात त्याचमुळे  एक हजार ग्राहक त्यांनी आज जोडले आहेत. एकाच व्यवसायावर अवलंबून न राहता दुसरा जोडव्यवसाय पाहिजेच म्हणून त्यांनी ‘मनभर’ या नावाने हॉटेल सुरू केलं. त्याशिवाय चीनच्या एका कंपनीबरोबर माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात त्यांनी करार करून काम सुरू केलं. या क्षेत्रातसुद्धा त्यांनी भरारी घेतली आहे.

पुणे येथील कविता कोपरकर यांनी पारंपरिक ब्युटीपार्लर न उघडता नववधूंसाठी खास स्टुडिओ तयार केला. तीन मजली वास्तूमध्ये त्यांनी अत्यंत आधुनिक आणि पारंपरिक पद्धतीतला हा स्टुडिओ सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारा आहे. पण यावरच न थांबता ‘प्रथा’ नावाचा स्वत:चा साडीचा ब्रँड दिमाखाने त्यांनी बाजारात आणला. आजच्या ग्राहकांना खूप वेगळं हवं असतं, सगळं खास हवं असतं. या गोष्टी लक्षात घेऊन त्यांनी आपल्या व्यवसायाचा आराखडा तयार केला. एका वेळी एकच व्यवसाय करताना त्यांच्याशी संलग्न असणाऱ्या इतर गोष्टींची विक्री कशी करता येईल याचा विचार करत आपल्या व्यवसायाला अनुरूप खास जागा कशी करता येईल हे सगळं त्यांनी एका कागदावर उतरवलं. पुढच्या तीन आणि पाच वर्षांत काय काय होईल, व्यवसाय कसा वाढेल, पैसे कसे येतील, ते कसे फेडावे लागतील, माझ्या स्पर्धेमध्ये अजून कोण कोण आहेत याचा विचार करून त्यांनी पाच वर्षांचा आराखडा तयार केला. या अभ्यासासाठी त्यांनी खूप वेळ दिला. त्यांच्या डोक्यात विचारचक्र अविरत सुरू झालं आणि एक वर्षांत जागा घेऊन त्यांनी जे पाच वर्षांत करायचं ठरवलं होतं ते दीड वर्षांत पूर्ण केलं. जे जे ठरवलं ते तसंच पाठपुरावा करत पूर्ण केलं. त्या वेळी थोडं लवकरच पूर्ण झाल्यामुळे आर्थिक गणित बिघडलं तरी न घाबरता न थांबता त्यांनी ते पूर्ण केलं. आर्थिक गणित मात्र त्यांना त्यांच्या बाबांकडून शिकायला मिळालं. व्यवसायासाठी आर्थिक गणित खूप महत्त्वाचं आहे, जे प्रत्येक उद्योजिकेनं शिकलंच पाहिजे. जे काम आपण करतो आहोत ते खास पाहिजे, वेगळं पाहिजे. यावर पूर्णपणे भर द्यायला हवा आणि जे करायचं ते विशेषच असलं पाहिजे याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायला हवं.

कल्याण येथील वैशाली कांदळगावकर या टय़ूशन क्लासेसच्या व्यवसायात आहेत. १९९७ मध्ये त्यांनी घरगुती क्लास सुरू केले. दोन विद्यार्थ्यांपासून सुरू झालेला क्लास आज खूप विस्तारला आहे. स्त्री शिक्षिकांना सोबत घेऊन त्यांनी क्लासेस सुरू केले हे विशेष. त्या त्या वेळी आलेल्या आर्थिक अडचणी दूर करत असताना सोबत वेगवेगळे व्यवसाय करत, क्लास चालवत त्यांनी आर्थिक घडी बसवली. इतकच नव्हे तर इतर स्त्री शिक्षिकांसह सीबीएसई, एसएससीसाठीचे क्लासही त्या घेतात. त्यासाठी त्यांनी या व्यवसायाचे काही अभ्यासक्रम केले आणि व्यवसायाचा व्यवस्थित आराखडा तयार केला. बाजारातील मागणी, उद्दिष्टे या सगळ्यांचा अभ्यास करत त्यांनी स्वत:ला बदललं, स्वत:वर खूप मेहनत केली. स्वत:मधली पारंपरिक विचारसरणी जाणीवपूर्वक बदलून  स्वत:मध्ये व्यावसायिक म्हणून बदल केले. स्वत:मधला बदल हा खूप महत्त्वाचा दुवा आहे. या बदलामुळे त्यांनी योग्य यंत्रणांची मदत घेतली. आपण नसताना व्यवसाय चालला पाहिजे, असं त्याचं स्वरूप तयार केलं. आज त्यांचा व्यवसाय म्हणूनच यशस्वी आहे.

व्यवसायाच्या आराखडय़ामध्ये नियोजन, आवश्यक तयारी, कृती, परिणाम आणि परीक्षण या महत्त्वाच्या घटकांचा समावेश होतो. उत्तम व्यावसायिक आपल्या व्यवसायाचे जितके काटेकोर नियोजन करतो, तेवढय़ाच काटेकोरपणे त्याचे परीक्षण करीत असतो. आपल्या व्यवसायाचा दरवर्षीचा व्यवसायाचा आराखडा अधिक वास्तवदर्शी तयार करणं, त्यानुसार दर महिन्याला, तीन महिन्याला, सहा महिन्याला आढावा घेऊन वार्षिक अहवाल तयार करावा हेच योग्य. स्त्रियांमध्ये असलेले सगळे गुण हाताशी धरून आपण आपल्या पायावर भक्कम उभं राहणं आवश्यक आहे. यशस्वी स्त्री उद्योजकांनाही सगळंच प्रथमपासून जमत होतं किंवा पहिल्यापासून सगळं येत होतं असं नाही, पण त्या शिकल्या, त्यांनी स्वत:मध्ये योग्य ते बदल केले आणि करून पाहिलं. जितका काटेकोर अभ्यास आणि विचार करून आराखडा तयार कराल, तेवढाच तो प्रत्यक्षात यायला मदत होईल. तुम्हाला तुमची प्रगती मोजणं शक्य होईल व परिस्थितीवर नियंत्रण ठेवणंपण जमेल. तुमच्या जीवनात घडणाऱ्या घटनांना तुम्हीच जबाबदार आहात, जबाबदारी घ्या आणि स्वयंसिद्ध व्हा..

neha18.mirror@gmail.com 

First Published on April 22, 2017 12:18 am

Web Title: tips for starting your own company marathi articles