05 July 2020

News Flash

अफगाणिस्तानचा धक्कादायक विजय

अखेरच्या षटकांत बलाढय़ वेस्ट इंडिजचा सहा धावांनी पराभव

अखेरच्या षटकांत बलाढय़ वेस्ट इंडिजचा सहा धावांनी पराभव
क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ समजला जातो आणि ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या प्रकारात कोणताही संघ बाजी मारू शकतो, या दोन्ही वाक्यांची सत्यता अफगाणिस्तानने वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात पटवून दिली. माजी विश्वविजेत्या आणि आतापर्यंत गटात तिन्ही सामने जिंकलेल्या वेस्ट इंडिजला अखेरच्या षटकात सहा धावांनी पराभूत करत धक्कादायक विजयाची नोंद केली. या विजयाने स्पर्धेत कोणताच फरक पडणार नसला तरी भविष्यात अफगाणिस्तान क्रिकेटच्या इतिहासात हा विजय सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाईल, दुसरीकडे वेस्ट इंडिजला ही जखम नेहमीच त्रास देत राहील.
बलाढय़ वेस्ट इंडिजला विजयासाठी शेवटच्या षटकात १० धावा हव्या असताना मोहम्मद नबीने आपल्या चतुर गोलंदाजीने अफगाफिस्तानला सामना जिंकवून दिला. नबीने शेवटच्या षटकात पहिले दोन चेंडू निर्धाव टाकले. तर तिसऱ्या चेंडूवर नजिबुल्लाह झाद्राने कार्लोस ब्रेथवेटचा सीमारेषजवळ आफलातून झेल घेत सामन्यात चुरस निर्माण केली. शेवटच्या ३ चेंडूत हव्या असलेल्या १० धावा काढण्यात वेस्ट इंडिजला अपयश आले. शेवटपर्यंत चुरशीच्या लढतीत अफगाणिस्ताने आपल्या शेवटच्या साखळी सामन्यात वेस्ट इंडिजला पराभूत करून गोड शेवट केला.
अफगाणिस्तानने वेस्ट इंडिजपुढे केवळ १२४ धावांचे विजयी लक्ष्य ठेवले होते. ख्रिस गेलच्या अनुपस्थितीत खेळताना वेस्ट इंडिजचा डाव सुरुवातीपासूनच गडगडायला सुरुवात झाली. त्यांच्या एकाही फलंदाजाला समर्थपणे अफगाणिस्तानच्या गोलंदाजीचा सामना करता आला नाही आणि त्यांनी पराभव ओढवून घेतला.
वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकत अफगाणिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. सामन्याच्या १२ व्या षटकापर्यंत अफगाणिस्तान सन्मानजनक धावसंख्या उभारेल, असे कोणालाही वाटत नव्हते. पण त्यानंतर नजिबुल्लाह झाद्रानच्या दमदार खेळीच्या जोरावर अफगाणिस्तानला १२३ धावांपर्यंत पोहोचता आले. झाद्रानने ४० चेंडूंत चार चौकार आणि एका षटकारासह नाबाद ४८ धावांची खेळी साकारली आणि संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली.

संक्षिप्त धावफलक
अफगाणिस्तान : २० षटकांत ७ बाद १२३ (मोहम्मद शहजाद २४, असगर स्टानिकझाय १६, नजिबुल्लाह झाद्रान नाबाद ४८ ; सॅम्युअल बद्री ३/१४,आंद्रे रसेल २/२३) विजयी वि. वेस्ट इंडिज (जॉन्सन चार्लस २२, ड्वेन ब्राव्हो २८, दिनेश सामदिन १८; राशीद खान २/२६, मोहम्मद नबी २/२६ )

सामनावीर : नजिबुल्लाह झाद्रान.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2016 4:11 am

Web Title: afghanistan beat west indies
Next Stories
1 स्टम्प व्हिजन : महिला क्रिकेटचे वास्तव
2 भारतीय महिलांनी गाशा गुंडाळला
3 भारत उपांत्य फेरीत
Just Now!
X