शहरयार खान यांचे संकेत
ट्वेन्टी-२० विश्वचषकानंतर पाकिस्तानच्या कर्णधारपदावरून अष्टपैलू शाहिद आफ्रिदीची हकालपट्टी करण्यात येणार आहे. एक खेळाडू म्हणूनसुद्धा त्याची कारकीर्द निवृत्तीच्या उंबरठय़ावर आहे, अशा प्रकारचे संकेत पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे (पीसीबी) अध्यक्ष शहरयार खान यांनी दिले आहेत.
कोलकाताहून आल्यानंतर लाहोर येथे पत्रकारांशी संवाद साधताना शहरयार खान यांनी विश्वचषकानंतर तो निवृत्ती पत्करणार असल्याचे सांगितले. खान म्हणाले, ‘‘विश्वचषकापर्यंत तू कर्णधारपदावर असशील, असे त्याला सांगण्यात आले आहे. त्यानेही या स्पध्रेनंतर निवृत्ती घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. जर नंतर त्याने आपले मत बदलले तरी खेळाडू म्हणून संघात स्थान मिळेल की नाही याची शाश्वती देता येणार नाही.’’

आफ्रिदीला गेल्या वर्षी ट्वेन्टी-२० संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली, याबाबत खान म्हणाले, ‘‘आफ्रिदी पाकिस्तानमधील सर्वात लोकप्रिय व्यक्तिमत्त्व आहे. त्याने याआधी अनेक सामने संघाला एकहाती जिंकून दिले आहेत. त्यामुळेच त्याची निवड ही योग्यच होती. मोठय़ा सामन्यांमध्ये पराभव झाल्यावर टीका थेट त्याच्यावर होणे, हे स्वाभाविक आहे. परंतु या क्षणी त्याला सर्वाच्या पाठबळाची गरज आहे.’’प्रशिक्षक युनूस यांना मुदतवाढ मिळणार नाही
विश्वचषकानंतर संघाचे प्रशिक्षकसुद्धा बदलणार असल्याची माहिती पीसीबीच्या प्रमुखांनी दिली आहे. ते म्हणाले, ‘‘वकार युनूस यांच्या प्रशिक्षकपदाच्या कराराची मुदत जूनपर्यंत आहे. याबाबत माझी वसिम अक्रम आणि काही वरिष्ठ खेळाडूंशी चर्चा झाली आहे. स्थानिक किंवा परदेशी कोणताही प्रशिक्षक असो, त्यातून संघाची सर्वोत्तम कामगिरी होणे अभिप्रेत आहे. परदेशी प्रशिक्षक नेमण्यात चुकीचे काहीच नाही. बॉब वूल्मर हे आमचे सर्वोत्तम प्रशिक्षक होते.’’ ते पुढे म्हणाले, ‘‘विश्वचषक स्पध्रेत भारताविरुद्ध पुन्हा पत्करलेल्या पराभवामुळे आम्ही बरेच निराश झालो आहोत.’’
संघाचे हित मला कळते, बाकी सारे गौण -आफ्रिदी
‘‘विश्वचषक स्पर्धा सुरू होण्यापूर्वीही प्रसारमाध्यमे अनेक गोष्टींविषयी चर्चा करत होते. मी ट्विटर, फेसबुक किंवा प्रसारमाध्यमे काय छापतात, हे पाहतही नाही. मी या सगळ्यांपासून दूर आहे. मायदेशी परतल्यावर त्यांची भूमिका काय असेल, याची मला कल्पना आहे. पाकिस्तानात काय घडते आहे ते घडू दे. आम्ही इथे सर्वोत्तम कामगिरी करत जिंकण्यासाठी आलो आहोत. ते माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. संघहित मला कळते. बाकी गोष्टी गौण आहेत,’’ अशा परखड शब्दांत शाहिद आफ्रिदीने टीकाकारांचा समाचार घेतला. भारताविरूद्धच्या पराभवानंतर आफ्रिदीवर जोरदार टीका होते आहे. विश्वचषकानंतर आफ्रिदीला डच्चू देण्याचे पाकिस्तान क्रिकेट मंडळाने दिले आहेत. त्या पाश्र्वभूमीवर आफ्रिदी बोलत होता.
‘‘पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करणे, ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. खेळताना शंभर टक्के योगदान दिल्यानंतरच मला समाधान वाटते. खेळताना आमच्या हातून चुका घडल्या असतील, तर त्या सुधारणे आमचे काम आहे. परंतु एखादा खेळाडू विनाकारण संघात दडपणाची स्थिती निर्माण करत असेल तर अशा गोष्टी रोखणे कठीण आहे,’’ असे आफ्रिदीने स्पष्ट केले.