ऑस्ट्रेलियाचा २१ धावांनी विजय; स्टीव्हन स्मिथ, जेम्स फॉकनर विजयाचे शिल्पकार
अखेर पाकिस्तानचे ट्वेन्टी-२० विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले. पाकिस्तानचा संघ विश्वचषक स्पध्रेसाठी आला तोच मुळी सुरक्षेच्या हमीची अट घालून. या सर्व राजनैतिक धुरळ्यात सराव सामन्यांना मात्र त्यांना मुकावे लागले. त्यानंतर पाकिस्तानचा संघनायक शाहीद आफ्रिदीने भारतातील क्रिकेटरसिकांचे गोडवे गाण्याचे निमित्त झाले आणि त्याच्या या वक्तव्याबाबत बहुतेकांनी तोंडसुख घेतले. दरम्यानच्या काळात पाकिस्तानी संघात गटबाजी चालू असल्याच्या अफवा कानी येत होत्या. या साऱ्या नकारात्मक परिस्थितीत आफ्रिदीच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी संघाची वाटचाल साखळीपर्यंतच मर्यादित राहिली. प्रत्यक्ष स्पर्धा चालू असतानाच या स्पध्रेनंतर आफ्रिदीची कर्णधारपदावरून हकालपट्टी करण्याचा फतवा निघाला आहे. प्रशिक्षक वकार युनूस यांचा कार्यकाळ येत्या दोन महिन्यांत संपतोच आहे.
बांगलादेशला नमवून विश्वचषकाच्या अभियानाला सकारात्मक सुरुवात करणाऱ्या पाकिस्तानला हा रुबाब नंतर मात्र राखता आला नाही. त्यानंतर परंपरागत प्रतिस्पर्धी भारत, बलाढय़ न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या तीन संघांकडून ओळीने तीन पराभव पाकिस्तानच्या पदरी पडले. शुक्रवारी स्टीव्हन स्मिथची फलंदाजी आणि जेम्स फॉकनरच्या गोलंदाजीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर २१ धावांनी विजय मिळवला. आता रविवारी होणाऱ्या ऑस्ट्रेलिया आणि भारत लढतीमधील विजेता संघ उपांत्य फेरीत स्थान निश्चित करील.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकताच अपेक्षेप्रमाणे प्रथम फलंदाजी करताना ४ बाद १९३ धावा उभ्या केल्या. कर्णधार स्टीव्हन स्मिथचे दिमाखदार अर्धशतक आणि दोन महत्त्वाच्या भागीदाऱ्या यामुळे ऑस्ट्रेलियाला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली.
आस्ट्रेलियाची सुरुवात फारशी चांगली झाली झाली नाही. उस्मान ख्वाजा (३१), आरोन फिन्च (१५) आणि डेव्हिड वॉर्नर (९) लवकर बाद झाल्यामुळे ऑस्ट्रेलियाची ३ बाद ५७ अशी अवस्था झाली. पण स्मिथने जिद्दीने किल्ला लढवत संघाचा डाव सावरला. स्मिथने ४३ चेंडूंत ७ चौकारांसह नाबाद ६१ धावा केल्या. स्मिथने चौथ्या विकेटसाठी ग्लेन मॅक्सवेल (३०) सोबत ६२ धावांची भागीदारी केली. मग शेन वॉटसनसह पाचव्या विकेटसाठी नाबाद ७४ धावांची भागीदारी केली. सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या वॉटसनने अखेरच्या हाणामारीच्या षटकांत २१ चेंडूंत ४ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ४४ धावा केल्या. ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी मोहम्मद सामीच्या चार षटकांत ५३ धावा काढल्या.त्यानंतर, पाकिस्तानला निर्धारित षटकांत ८ बाद १७२ धावा करता आल्या. खलिद लतीफने सर्वाधिक ४६ धावा केल्या, तर शोएब मलिकने १९ चेंडूंत २ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ३८ धावा काढून झुंजार प्रयत्न केले.

संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया : २० षटकांत ४ बाद १९३ (स्टीव्हन स्मिथ नाबाद ६१, शेन वॉटसन नाबाद ४४, ग्लेन मॅक्सवेल ३०; इमाद वसिम २/३१) विजयी वि. पाकिस्तान : २० षटकांत ८ बाद १७२ (खलिद लतीफ ४६, शोएब मलिक नाबाद ३८, उमर अकमल ३२; जेम्स फॉकनर ५/२५, अ‍ॅडम झम्पा २/३२)
सामनावीर : जेम्स फॉकनर.

पाकिस्तान क्रिकेटची वाटचाल अधोगतीकडे – वकार युनूस
‘‘आम्ही विश्वचषकात हरलो आहोत, हे वास्तव आहे. गेली सहा-सात वष्रे पाकिस्तानमधील आंतरराष्ट्रीय क्रिकेट ठप्प झाले आहे. त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. देशात सामना जिंकून देणारे वीर घडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. स्थानिक क्रिकेट पुरेसे विकसित होत नाही. त्यामुळेच पाकिस्तानच्या क्रिकेटची वाटचाल अधोगतीकडे होते आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही,’’ अशा शब्दांत आपल्या भावना पाकिस्तानचे प्रशिक्षक वकार युनूस यांनी सामन्यानंतर व्यक्त केल्या.
‘‘विश्वचषकात पराभूत होण्याचे दु:ख मोठे आहे. ऑस्ट्रेलियाला १९३ धावा उभ्या करायची संधी दिल्यानंतर हा सामना जिंकणे तसे अवघडच होते. मात्र मागील सामना आवाक्यात होता,’’ असे ते पुढे म्हणाले. गटबाजीच्या अफवांबाबत युनूस म्हणाले, ‘‘पाकिस्तानी संघात गटबाजी चालू असल्याची गोष्ट कपोलकल्पित आहे. आमच्याकडून चांगले क्रिकेट खेळले गेले नाही.’’

निवृत्ती देशवासीयांसमोर – शाहीद आफ्रिदी
निवृत्तीबाबत मी कोणताही निर्णय अद्याप घेतलेला नाही. मात्र देशवासीयांच्या साक्षीने माझी निवृत्ती स्वीकारण्याची इच्छा आहे, असे शाहीद आफ्रिदीने नाणेफेकीचा कौल उडवल्यावर सांगितले.