ट्वेन्टी-२० क्रिकेट हा एवढा झटपट खेळला जाणारा खेळ आहे की जिथे कोणताही संघ कोणत्याही संघाला पराभूत करू शकतो. बांगलादेशसारखा गेल्या तीन-चार वर्षांमध्ये सातत्याने दमदार कामगिरी करणारा संघ कोणत्याही संघाला आश्चर्याचा धक्का देऊ शकतो. ऑस्ट्रेलियालाही त्यांना धक्का देता आला असता; पण काही छोटय़ा चुकांमुळे हा विजय त्यांच्याकडून हिरावला. ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये बांगलादेशने भारताला एकदाही पराभूत केले नसले तरी २००७च्या एकदिवसीय विश्वचषकात त्यांनी दिलेल्या जखमेच्या खुणा अजूनही कायम आहेत.
वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या या विश्वचषकात भारताची सलामीची लढत बांगलादेशशी होती. भारतीय संघात सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड, वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, महेंद्रसिंग धोनी असे एकापेक्षा एक महारथी होते. क्वीन्स पार्क ओव्हल मैदानात भारताची पहिली फलंदाजी होती. पण कर्णधार सौरव गांगुली आणि युवराज सिंग यांचा अपवाद वगळता अन्य दिग्गजांना मिळून फक्त २१ धावाच करता आल्या होत्या. यावेळी विद्यमान बांगलादेशचा कर्णधार मश्रफी मुर्तझाने चार बळी मिळवत भारतीय संघाचे कंबरडे मोडले होते. भारताला या सामन्यात कशाबशा १९१ धावा काढता आल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना तमीम इक्बाल, मुशफिकर रहिम आणि शकिब अल हसन यांनी अर्धशतके लगावत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले होते. त्यामुळे बांगलादेशला यावेळी कमी लेखून चालणार नाही. पण ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये भारताला बांगलादेशकडून एकदाही पराभव स्वीकारावा लागलेला नाही, हेदेखील तेवढेच खरे आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये आतापर्यंत चार ट्वेन्टी-२०चे सामने झाले आहेत. यापैकी तिन्ही सामने ढाक्यात तर एक सामना अन्यत्र झाला आहे. २००९ साली नॉटिंगहॅम येथे झालेल्या पहिल्या सामन्यात गौतम गंभीरचे अर्धशतक आणि प्रग्यान ओझाचे चार बळी यामुळे भारताने २५ धावांनी विजय मिळवला होता. ढाका येथे मार्च २०१४मध्ये झालेल्या दुसऱ्या सामन्यात अमित मिश्राने तीन बळी मिळवत बांगलादेशच्या धावसंख्येला वेसण घातली होती. त्याचबरोबर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने हा सामना ८ विकेट्सने जिंकला होता. या वर्षी आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये दोन सामने झाले. यापैकी पहिल्या सामन्यात रोहित शर्माने ८३ धावांची खेळी साकारली होती, तर आशीष नेहराने तीन बळी मिळवत संघाला ४५ धावांनी विजय मिळवून दिला होता. मार्च महिन्यातच आशिया चषकाच्या अंतिम फेरीत भारताने बांगलादेशवर आठ विकेट्सने विजय मिळवून जेतेपदाला गवसणी घातली होती. या सामन्यात सलामीवीर शिखर धवनने अर्धशतक झळकावले होते.
आतापर्यंत भारताने ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये बांगलादेशला सहज पराभूत केले आहे. पण २००७ सालच्या संघातील मश्रफी, तमीम, शकिब आणि मुशफिकर विश्वचषकाच्या संघातही आहेत. तो एकदिवसीय सामना असला तरी ट्वेन्टी-२० सामन्यात धक्का देणे बांगलादेशला अशक्यप्राय नाही. त्यामुळे सावधपणे खेळण्याची भारताला आवश्यकता आहे.