बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नझमुल हसन यांचे मत

विश्वचषकासारख्या महत्त्वपूर्ण स्पर्धेदरम्यान संघातील प्रमुख गोलंदाजावर सदोष शैलीच्या कारणास्तव निलंबनाची कारवाई हा आमच्यावर अन्याय आहे, असे मत बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नझमुल हसन यांनी व्यक्त केले. गोलंदाजीच्या सदोष शैलीमुळे बांगलादेशच्या तास्किन अहमद आणि अराफत सनी या गोलंदाजांवर विश्वचषकादरम्यान निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

‘तास्किनबाबतच्या निर्णयाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) पुनर्विचार करावा. हा थेट अन्याय आहे. बांगलादेश क्रिकेटला पिछाडीवर नेणारा हा निर्णय आहे. बांगलादेश क्रिकेटचे यामुळे खूप नुकसान झाले आहे. तास्किन हा आमचा प्रमुख गोलंदाज आहे. दमदार वेगासह गोलंदाजी करणाऱ्या जगातल्या मोजक्या गोलंदाजांमध्ये त्याचा समावेश आहे. गेली अनेक वर्षे तो बांगलादेशच्या संघाचा नियमित भाग आहे. निलंबनाची कारवाई सहन करणे कठीण आहे’, असे नझमुल यांनी सांगितले.

‘तास्किनने कोणताही अवैध स्वरूपाचा चेंडू टाकलेला नाही आणि तरीही त्याला शिक्षा देण्यात आली आहे. क्रिकेटच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडत असावे. माझ्या माहितीप्रमाणे गोलंदाज अवैध चेंडू टाकत असेल तरच त्याच्यावर कारवाई होते. नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यातील त्याचे चेंडू संशयास्पद वाटल्याचे सामनाधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र चाचणीदरम्यान काहीही संशयास्पद जाणवले नाही. त्यामुळे तास्किनवर विनाकारण कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे’, असे नझमुल म्हणाले.

ते पुढे म्हणाले, ‘बांगलादेश क्रिकेटचा होणारा विकास काही मंडळींना पाहवत नाही. अशा गोष्टींनी त्यांना आनंद मिळत असेल तर त्यांनी तसे जरूर करावे. कठीण परिस्थितीत आम्हाला खेळायचे आहे’.

संथ षटकांच्या गतीमुळे बांगलादेशला दंड

भारताविरुद्धच्या सामन्यात षटकांची गती संथ राखल्याबद्दल बांगलादेशला दंड ठोठावण्यात आला आहे. निर्धारित वेळेपेक्षा बांगलादेशने यावेळी एक षटक टाकण्यासाठी जास्त वेळ घेतला. त्यामुळे बांगलादेशचा कर्णधार मश्रफी मुतर्झाच्या मानधनातून २० टक्के रक्कम दंड म्हणून कापण्यात येणार आहे, तर संघातील अन्य सदस्यांच्या मानधनातून १० टक्के रक्कम दंड म्हणून कापण्यात येईल, असे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषेदेने (आयसीसी) म्हटले आहे.