अपराजित न्यूझीलंडविरुद्ध अखेरचा सामना
भारताविरुद्धच्या सामन्यात ओठांपर्यंत आलेला विजयाचा घास अखेरच्या तीन चेंडूंमध्ये बांगलादेशकडून हिरावून गेला होता. आतापर्यंत बांगलादेशने गटामध्ये एकही सामना जिंकलेला नाही. त्यामुळे अखेरच्या सामन्यात गटातील अव्वल स्थानावर असलेल्या न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवून स्पर्धेचा शेवट गोड करण्याची त्यांच्याकडे संधी असेल. दुसरीकडे न्यूझीलंडने आतापर्यंत गटामध्ये भारत, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानसारख्या मातब्बर संघांना पराभूत केले असून त्यांचे बाद फेरीतील स्थान निश्चित झाले आहे. पण हा सामना जिंकून गटात अपराजित राहण्याचे न्यूझीलंडचे ध्येय असेल.
न्यूझीलंडने आतापर्यंत गोलंदाजीच्या जोरावर सामने जिंकले आहेत. मिचेल सँटर, इश सोढी आणि त्यांच्या साथीला असलेल्या नॅथन मॅक्क्युलम हे अप्रतिमपणे भेदक मारा करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलत आहेत. त्यामुळेच ट्रेंट बोल्ट आणि टीम साउथीसारख्या गोलंदाजांना अजून एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही. कोरे अँडरसन, मिचेल मॅक्लेघन आणि अ‍ॅडम मिल्न यांनी आतापर्यंत तिखट वेगवान मारा केला आहे. फलंदाजीमध्ये मार्टीन गप्तील चांगल्या फॉर्मात आहे. त्याने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ८० धावांची धडाकेबाज खेळी केली होती. पण कर्णधार केन विल्यमसन आणि अनुभवी रॉस टेलर यांच्याकडून संघाला मोठय़ा अपेक्षा असतील.
अनुनुभवीपणा, हे बांगलादेशची दुबळी बाजू आहे. संघामध्ये गुणवान खेळाडूंचा भरणा असला तरी त्यांना कोणत्या परिस्थितीत कसे खेळायचे हे समजत नसल्याचे दिसते, नाहीतर त्यांनी भारताविरुद्ध विजय मिळवला असता. बांगलादेशकडे आठव्या क्रमांकापर्यंत फलंदाज आहेत. तमीम इक्बाल, शकिब अल हसन, महमुदुल्लाह हे सातत्याने चांगली फलंदाजी करत आहेत. गोलंदाजीमध्ये तास्किन अहमद आणि सन्नी अराफत यांची उणीव त्यांना भासत आहे. पण कर्णधार मश्रफी मुर्तझासहित सारे गोलंदाज उपयुक्त गोलंदाजी करताना दिसत आहेत.

न्यूझीलंड : केन विल्यमसन (कर्णधार), कोरे अँडरसन, ट्रेंट बोल्ट, मार्टिन गप्तील, ग्रँट एलियट, कॉलन मुर्नो, मिचेल मॅक्लेघन, नॅथम मॅक्क्युलम, अ‍ॅडम मिल्न, हेन्री निकोल्स, ल्युक राँची (यष्टीरक्षक), मिचेल सँटर, इश सोढी, टीम साउथी आणि रॉस टेलर.
बांगलादेश : मश्रफी मुर्तझा, महमुदुल्लाह, सौम्य सरकार, मुशफिकर रहिम (यष्टीरक्षक), सब्बीर रेहमान, अबू हैदर, नुरुल हसन, अल-अमिन होसेन, नासीर होसेन, शकिब अल हसन, तमीम इक्बाल, मोहम्मद मिथऊन, मुस्ताफिझूर रेहमान, साकलेन साजिब आणि शुव्हागता होम.

* स्थळ : इडन गार्डन्स, कोलकाता
* वेळ : दुपारी ३ वाजल्यापासून
* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, ३ आणि एचडी १, ३.