17 October 2019

News Flash

T20 World cup BLOG: ते मनाने खेळले..विश्वविजेतेपद जिंकलं, आता तुम्ही त्यांच मन जिंकणार का?

स्पर्धा सुरू होण्यासाठी चार दिवस असताना वेस्ट इंडिजच्या खेळाडूंकडे संघाची जर्सी देखील नव्हती.

ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडिजने इंग्लंडवर मात करून यंदा दुसऱयांदा स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. विजेतेपदावर कब्जा केल्यानंतर विंडीज खेळाडूंनी आपल्या खास कॅरेबियन स्टाईलने सेलिब्रेशन केले. यंदाच्या ट्वेन्टी-२० 'चॅम्पियन्स'च्या विजयाच्या सेलिब्रेशनचे काही निवडक क्षण..

डॅरेन सॅमीच्या ब्रिगेडने काल दुसऱयांदा ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे विजेतेपद काबीज केले, तर महिला संघाने पहिल्यांदाच ट्वेन्टी-२० विश्वचषक उंचावला. याशिवाय १९ वर्षाखालील वेस्ट इंडिजच्या संघानेही यंदा विश्वचषकावर नाव कोरले. त्यामुळे यंदाच्या वर्षाची वेस्ट इंडिजच्या क्रिकेट इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंद केली जाईल. खरंतरं इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंद वगैरे सर्व ठीक आहे पण या तिहेरी यशामुळे त्यांचे क्रिकेट बोर्ड पैशाने नाही झाले तरी बुद्धीने श्रीमंत होईल अशी अपेक्षा ठेवायला काहीच हरकत नाही.

गेल्या एकदिवसीय विश्वचषकापासूनच वेस्ट इंडिजचे क्रिकेट बोर्ड आणि खेळाडूंमध्ये वाद सुरू आहेत. ते अद्यापही संपलेले नाहीत. विश्वचषक जिंकल्यानंतर पारितोषिक वितरणावेळी कर्णधार सॅमीने दिलेल्या भाषणात त्याचाच प्रत्यय आला. स्पर्धा सुरू होण्यासाठी चार दिवस असताना वेस्ट इंडिजच्या खेळाडूंकडे संघाची जर्सी देखील नव्हती. संघ व्यवस्थापक देखील पाठविण्यात आला नव्हता किंवा एखादा फोन कॉल देखील वेस्ट इंडिजच्या क्रिकेट बोर्डाकडून करण्यात आला नाही, अशा अनेक अडचणींचा पाढा सॅमीने भाषणात वाचला. त्यामुळे हा विजय त्यांच्यासाठी नुसतं कॅरेबियन स्टाईल सेलिब्रेशन करण्यापुरता नक्कीच नव्हता. वेस्ट इंडिज क्रिकेटने प्रतिकूल परिस्थितीत अडचणींवर मात करून आपल्यातील सर्वोत्तम कामगिरीचे दर्शन क्रिकेट जगताला घडवले आहे. विंडीज खेळाडूंच्या फटक्यांमध्ये नजाकत किंवा तांत्रिकता नसते यात तथ्य असलं तरी त्यांची खेळण्याची ईर्षा आणि मनाने खेळणं हा त्यांच्या खेळाचा आत्मा आहे. बेधडक फटकेबाजी ही त्यांची ओळख आणि ट्वेन्टी-२० सारख्या झटपट क्रिकेटमध्ये अशाच बेधडक फटकेबाजीचा आनंद लुटण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात. त्यामुळेच ख्रिस गेल, ड्वेन ब्राव्हो यांनी भारतीय प्रेक्षकांवरही गारुड केले आहे. टी-२० च्या निमित्ताने वेस्ट इंडिजच्या याच बिनधास्त फटकेबाजीच्या क्रिकेटला मोठं होण्याची संधी मिळाली आणि खेळाडूंनी संधीचं सोनं केलयं. एका इंग्लिश समालोचकाने वेस्ट इंडिजचा सामना सुरू असताना विंडीज खेळाडूंची बुद्धी नसलेले प्लेअर्स अशा शब्दांत निर्भत्सना केली होती. त्यावर वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी आपल्या सांघिक कामगिरीने प्रत्युत्तर देत मनाने खेळ करून विश्वविजेतेपद जिंकलं आता वेस्ट इंडिजचे क्रिकेट बोर्ड ‘झालं गेलं गंगेला मिळालं’ म्हणत सर्व वाद संपुष्टात आणून समजुतीने मार्ग काढणार का? कॅरेबियन्सचं मन जिंकणार का? हाच प्रश्न आहे.

– मोरेश्वर येरम
moreshwar.yeram@expressindia.com

First Published on April 4, 2016 12:51 pm

Web Title: blog by moreshwar yeram on west indies t20 world cup win