cricket-blog-ravi-patki-670x200ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना सर्वात अवघड काम असते म्हणजे रणनिती काय आखायची. ऑस्ट्रेलियाच्या आक्रमणाला आक्रमणाने उत्तर द्यायचे का आपणच आक्रमण करायचे आणि ऑस्ट्रेलियाच्या अहंकाराला डिवचायचे; ज्यात मैदानावरील शेरेबाजीपासून सर्व काही येते (गांगुलीने वापरलेले डावपेच). कधी पहिली रणनिती यशस्वी झाली आहे तर कधी दुसरी. अनेकदा ऑस्ट्रेलिया केवळ गुणवत्तेवर इतर संघांना धोबीपछाड देते. त्यामुळे आपण खूप नियोजन करूनदेखील मैदानावर ऑस्ट्रेलियाचेच राज्य चालते. म्हणून ऑस्ट्रेलियाचा संघ हरवायला अतिशय अवघड असतो. पण कालच्या सामन्यात दिसलेला ऑस्ट्रेलियाचा संघ हा एकमितीय (वन डायमेंन्शनल) अनुकूलनविरहित(परिस्थितीनुसार बदल करता न येणारा) आणि त्यामुळेच कंटाळवाणा होता. त्याचा चांगला फायदा आपल्या गोलंदाजानी घेतला आणि शेवटी कोहलीने ऑस्ट्रेलियाच्या एकमितीय गोलंदाजीला जबर शिक्षा केली.
मिड-ओवर क्राइसिस
मानसशास्त्रात मिड-लाइफ क्राइसिस नावाची एक स्थिति आहे. त्यात आयुष्याच्या मध्यावर असलेल्या व्यक्तीला पुढच्या आयुष्यात काय करायचे या विषयी निर्णय घेताना संभ्रम होतो. त्याच प्रमाणे टी- २० मध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला ७-१५ या डावाच्या मधल्या ओवर्समध्ये नेमके कसे खेळायचे, किती धावा पुरेशा आहेत या विषयी निर्णय घेता येत नाही, असं दिसून येतय. याला मिड-ओवर क्राइसिस म्हणता येईल. काल सहा ओवर्समध्ये साठ धावा लावल्यावर आपल्याला वाटले होते ऑस्ट्रेलिया २०० करणार. पण मिड-ओवर क्राइसिसमध्ये ऑस्ट्रेलिया अडकला. जडेजा आणि युवराज सिंगने अस्सल भारतीय खेळपट्ट्यांवरची खेचून गोलंदाजी केली. त्यामुळे तो मिड-ओवर क्राइसिस ऑस्ट्रेलिआला निर्णायक त्रास देऊन गेला.
गोलंदाजीतदेखील ऑस्ट्रेलियाने विविधता ठेवली नाही. फास्ट बॉलर्सकडून ओव्हरला चार स्लोवर वन्स टाकून घेण्यापेक्षा भारतीय खेळपट्ट्यांवर दोन चांगले स्पिनर्स लागतात. गोलंदाजीतला तोच तो पणा ओळखून कोहलीने त्याच्या प्रतिभेने जे फलंदाजीचे दर्शन घडविले ते अनुपमेय होते. कोहली F1 रेसच्या गाडीत बसून ग्रेटनेसच्या दिशेने सुस्साट चालला आहे. १९८१ सालच्या अॅशेस मालिकेत बोथमने इंग्लंडला एकहाती विजय मिळवून दिला होता. त्या मालिकेला ‘बोथम्स अॅशेस’ असे नाव पडले. तसेच हा टी-२० वर्ल्ड कप ‘कोहलीज वर्ल्डकप’ नावाने ओळखला जाण्याच्या मार्गावर आहे.
फलंदाजीतील पहिल्या पाच मधल्या चार शिलेदारांच्या प्रगती पुस्तकावर आतापर्यंत लाल रेघा दिसत आहेत. तरी धोनीचा कल संघ न बदलण्याकडे आहे. हा एकप्रकारे ‘स्वबळावर’ लढण्याचा हट्ट केवळ कोहलीमुळे पुरवला जातोय. उपलब्ध खेळाडूंमधून निवडलेला हा सर्वोत्तम संघ नक्कीच नाही.
संपूर्ण स्पर्धेत सर्वात संतुलीत आणि परिस्थितीला न्याय देणारा न्यूझीलंडचा संघ वाटतोय. खरंतर तोच सर्वात जास्त भारतीय उपखंडातला संघ वाटतोय. (या संघाचा कधीच फारसा बोलबाला होत नाही) ब्रह्मकमळासारखा संध्याकाळी चाहूल न लागता उमलून त्याने कप जिंकून नेला तर आश्चर्य वाटू नये…
– रवि पत्की
sachoten@hotmail.com