हृदयविकाराच्या तीन झटक्यांनंतरही शिकागो चाचा विश्वचषकासाठी भारतात
भारतीय संघाचा सामना असतो तेव्हा लव्ह यू धोनी, तर सरावाच्या दिवशी मिस यू धोनी ही वाक्ये आणि धोनीची विविध रूपांतील छायाचित्रे यांचा समावेश असलेला पोशाख हे त्यांचे वैशिष्टय़. नागपूर, कोलकाता, बंगळुरू आणि मोहालीनंतर नवी दिल्लीमार्गे ते मुंबईत येणार आहेत. क्रिकेटजगतामध्ये ‘शिकागो चाचा’ म्हणून लोकप्रिय असलेल्या या ५९ वर्षीय असामीचे मूळ नाव मोहम्मद बशीर बोझाई. बोझाई हे जन्माने पाकिस्तानच्या कराचीतले असले तरी आता त्यांचे शिकागोला वास्तव्य आहे; परंतु धोनीचे जबरदस्त ‘फॅन’ असलेल्या शिकागो चाचांच्या या क्रिकेटप्रेमाची कथासुद्धा तितकीच रोचक आहे.
२०११मध्ये भारत-पाकिस्तान सामन्यासाठी बोझाई मोहालीला आले होते. पण तिकीट न मिळाल्यामुळे ते अतिशय संतापले होते. अमेरिकेहून आलेल्या एका क्रिकेटचाहत्याला तिकीट नसल्याची बतावणी त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर केली होती. पण सामन्याच्या दिवशी सकाळी चमत्कार घडला. एका व्यक्तीने बोझाई यांना तिकीट आणून दिले आणि हे तुझ्यासाठी माहीने दिले आहे, असे त्याने सांगितले. त्या वेळी माही कोण, हेसुद्धा बोझाई यांना ठाऊक नव्हते. नंतर त्याला कळले की महेंद्रसिंग धोनीला माही म्हणतात. त्यानंतर मात्र धोनीच्या नावाचा पोशाखच बोझाई यांनी बनवून घेतला. मग भारत-पाकिस्तान सामन्यांसहित धोनीच्या अनेक सामन्यांना शिकागो चाचा आवर्जून हजेरी लावतात. २०१२-१३मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान यांच्यातील छोटेखानी मालिकेसाठीही ते भारतात आले होते.
सध्या ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी भारतात आलेले बोझाई मोहालीतील भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यानंतर नवी दिल्लीला गेले आहेत. ‘‘दिल्लीतील अजमेर शरीफ दग्र्याला जाऊन भारतीय संघाच्या विश्वविजेतेपदासाठी प्रार्थना करणार आहे,’’ असे त्यांनी सांगितले.
शिकागो चाचा यांना हृदयविकाराचे तीन झटके आले आहेत. पण धोनीवरील प्रेम त्यांना स्वस्थ बसू देत नाही. ते सांगतात, ‘‘विमानात बसायलाही मला परवानगी नाही; परंतु प्रकृतीची पर्वा न करता जिथे क्रिकेट असेल, तिथे जातो. सोबत असलेल्या बॅगेमध्ये मी औषधे-गोळ्या बाळगतो.’’
फेब्रुवारीत बांगलादेशमध्ये झालेल्या आशिया चषक स्पध्रेच्या आठवणी सांगताना बोझाई म्हणाले, ‘‘आशिया चषकाच्या अंतिम फेरीनंतर धोनीने मला स्वाक्षरी असलेली बॅट दिली आहे. आता धोनीची बॅट माझ्या हॉटेलमध्ये प्रदर्शनासाठी ठेवेन.’’
शिकागोत ‘गरीब नवाझ’ हॉटेल चालवणाऱ्या बोझाई यांची आई आणि पत्नी भारतीय आहे. ७-७-१९७७ या दिवशी ते पाकिस्तान सोडून शिकागोला स्थायिक झाले. पण २००७मध्ये कॅरेबियन बेटांवर प्रथमच त्यांनी क्रिकेट सामना पाहिला. मात्र २०११च्या त्या घटनेपासून बोझाई धोनीचे निस्सीम चाहते आहेत. त्यांना पाकिस्तानचा सामना असला तरी धोनीकडूनच तिकीट प्राप्त होते.