इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये रंगणार पहिला उपांत्य फेरीचा सामना
वेगवान गोलंदाजी, हे त्यांचे प्रमुख अस्त्र. वेगवान गोलंदाजीच्या मुशीतच त्यांची जडण-घडण झाली. पण गावाप्रमाणे भाषा बदलावी लागते तसेच त्यांनी खेळपट्टीप्रमाणे गोलंदाजीही बदलली. भारतासारख्या फिरकीला पोषक खेळपट्टीवर त्यांनी संघात फिरकीपटूंना स्थान दिले आणि साखळी फेरीत अपराजित राहण्याची किमया त्यांनी साधली. ही गोष्ट आहे न्यूझीलंडची. त्यांच्या मिचेल सँटनर आणि इश सोधी या दोन्ही फिरकीपटूंनी न्यूझीलंडच्या या विजयी घोडदौडीत मोलाचा वाटा उचलला आहे. त्यामुळे आता पहिल्या उपांत्य फेरीत इंग्लंडचा सामना करताना आपल्या फिरकी अस्त्राला धार काढून न्यूझीलंडचा संघ सज्ज आहे. पण दुसरीकडे त्यांच्याकडून चांगली फलंदाजी पाहायला मिळालेली नाही. त्यामुळे या सामन्यात ते फिरकी आणि फटक्यांच्या समन्वयातून विजय साकारून पहिल्यांदाच ट्वेन्टी-२० विश्वचषकाची अंतिम फेरी गाठणार का, हे पाहणे उत्सुकतेचे असेल. २०१० साली इंग्लंडने ट्वेन्टी-२० विश्वचषकाला गवसणी घातली होती. त्यानंतर दुसऱ्यांदा त्यांना अंतिम फेरीत जाण्याची ही संधी असेल.

Watch: England vs New Zealand ICC WT20 Semi Final 2016 Preview 

न्यूझीलंडच्या फिरकीपटूंनी पहिल्याच सामन्यात आपल्या गोलंदाजीच्या तालावर यजमान भारताला पराभूत करत सर्वानाच आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यानंतर आत्मविश्वास दुणावलेल्या न्यूझीलंडने खासकरून फिरकी गोलंदाजीच्या जोरावर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सँटनर आणि सोधी या जोडगोळीने आतापर्यंत फलंदाजांना चांगलेच चकवले आहे. त्यांना नॅथन मॅक्क्युलमची चांगली साथही मिळताना दिसत आहे. या सामन्यात इंग्लंडकडे तीन डावखुरे फलंदाज असल्यामुळ मॅक्क्युलमला या सामन्यात संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. मिचेल मॅक्लेघन, अ‍ॅडम मिल्ने, कोरे अँडरसन या वेगवान गोलंदाजांनी उपयुक्त कामगिरी केली आहे. न्यूझीलंडच्या गोलंदाजी विभागात कसलीच कसर नाही. पण फलंदाजीमध्ये फारच असातत्यपणा दिसतो. मार्टिन गप्तीलचा (१२५) अपवाद वगळता एकाही फलंदाजाला या स्पर्धेत आतापर्यंत शतकाची वेसण ओलांडता आलेली नाही. कर्णधार केन विल्यमसन, रॉस टेलरसारखे नावाजलेले फलंदाज संघात असतानाही त्यांच्याकडून चांगली कमिगिरी पाहायला मिळालेली नाही. त्यामुळे न्यूझीलंडला या सामन्यात फलंदाजीवर अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे.

इंग्लंडच्या संघात युवा खेळाडूंचा भरणा आहे. इंग्लंडच्या विजयासाठी फलंदाजीमध्ये जो रूट हा हुकमी एक्का ठरू शकतो. इंग्लंडने वानखेडेवर वेस्ट इंडिजचे २३० धावांचे आव्हान पूर्ण केले होते, त्यामध्ये रुटची खेळी महत्त्वाची होती. त्याचबरोबर जोस बटलरही चांगली फलंदाजी करताना दिसत आहे. कर्णधार इऑन मॉर्गन, बेन स्टोक्स, लायम प्लंकेट यांनी अद्यापही सूर गवसलेला दिसत नाही. अष्टपैलू मोइन अलीकडून मात्र सातत्याने अष्टपैलू कामगिरी पाहायला मिळत आहे. बेन स्टोक्सचा अपवाद वगळता इंग्लंडची गोलंदाजी आतापर्यंत भेदक पाहायला मिळालेली नाही.

विश्वचषकासाठी न्यूझीलंडचे पारडे जड असल्याचे म्हटले जात आहे, पण आमच्यावर त्याचे दडपण नाही. न्यूझीलंडने स्पर्धेमध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. त्यांच्याविरुद्धचा सामना नक्कीच सोपा नसेल. विश्वविजयाच्या आम्ही फार जवळ असल्याचे मला वाटत नाही. आमच्यासाठी हा एक क्रिकेटचा सामना आहे आणि त्यावर आम्ही लक्ष केंद्रित केलेले आहे.
– ईऑन मॉर्गन, इंग्लंडचा कर्णधार

साखळी फेरीमध्ये आमच्याकडून चांगली कामगिरी झाली, पण त्यामधूनही आम्ही बरेच काही शिकलो. विजयाची ही घडी अशीच रहावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. सध्या विराट कोहली व जो रूट चांगली फलंदाजी करत आहेत. त्यांच्याकडून शिकण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. संघातील अव्वल दोन गोलंदाजांना आम्ही अजूनही संधी दिलेली नाही. या सामन्यासाठी सर्वोत्तम संघ निवडण्याचा आमचा प्रयत्न असेल.
केन विल्यम्सन, न्यूझीलंडचा कर्णधार

संघ
न्यूझीलंड : केन विल्यमसन (कर्णधार), मार्टिन गप्तील, कॉलिन मुर्नो, रॉस टेलर, कोरे अ‍ॅण्डरसन, ग्रँट एलियट, ल्यूक राँची, मिचेल सँटनर, इश सोधी, मिचेल मॅक्लेघन, नॅथम मॅक्क्युलम, ट्रेंट बोल्ट, टीम साऊथी, हेन्री निकोल्स, अ‍ॅडम मिल्ने.
इंग्लंड : इऑन मॉर्गन (कर्णधार), अ‍ॅलेक्स हेल्स, जेसन रॉय, जो रूट, जोस बटलर, मोइन अली, आदिल रशीद, ख्रिस जॉर्डन, डेव्हिड विली, लायम प्लंकेट, जेम्स व्हिन्स, रीली टोप्ले, लायम डॉसन, सॅम बिलिंग.

स्थळ : फिरोझशाह कोटला स्टेडियम, नवी दिल्ली
वेळ : रात्री ७.०० वाजल्यापासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स-१, ३