दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मिळवलेल्या आश्चर्यकारक विजयानंतर इंग्लंडला जणू विजयाचा ‘रूट’ सापडला आहे. आता गोलंदाजीत सुधारणा करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल. आयसीसी ट्वेन्टी-२० विश्वचषकात बुधवारी त्यांच्यापुढे अफगाणिस्तानचे आव्हान समोर असणार आहे. सर्वात धोकादायक संघ म्हणून उदयास येणाऱ्या अफगाणिस्तानला कमी लेखून चालणार नाही, याची जाणीव इंग्लंडला ठेवावी लागणार आहे.
सलामीच्या लढतीत वानखेडे स्टेडियमवर ख्रिस गेलच्या झंझावातामुळे विंडीजकडून इंग्लंडने हार पत्करली होती. मग आव्हान जिवंत राखण्याच्या इराद्याने जो रूटच्या शानदार फलंदाजीच्या बळावर इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेवर दोन विकेट्स राखून विजय मिळवला. ट्वेन्टी-२० प्रकारात २३० धावांचे लक्ष्य पेलणे, हे तसे अवघड मानले जाते. पण रूटने ४४ चेंडूंत ६ चौकार आणि ४ षटकारांसह ८३ धावांची खेळी उभारून संघाला विजय मिळवून दिला. सलग दुसऱ्या सामन्यात इंग्लंडच्या गोलंदाजीच्या मर्यादा स्पष्ट झाल्या होत्या. रूटची बॅट तळपली नसती तर इंग्लंडचे स्पध्रेत आव्हान टिकणे मुश्कील होते.
इंग्लंडला गोलंदाजी व क्षेत्ररक्षणाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे लागणार आहे. इंग्लंडच्या आक्रमणाची धुरा वाहणाऱ्या डेव्हिड विली व रिसी टॉपले यांना आफ्रिकेच्या फलंदाजांनी चांगलाच चोप दिला होता. ख्रिस जॉर्डन व बेन स्टोक्ससुद्धा महागात पडले होते.
इंग्लंड वि.  अफगणिस्तान
* स्थळ : फिरोजशहा कोटला स्टेडियम, नवी दिल्ली
* वेळ : दुपारी ३.०० पासून
* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स-१, ३
संघ
इंग्लंड : ईऑन मॉर्गन (कर्णधार), जेसन रॉय, जेम्स व्हिन्से, अ‍ॅलेक्स हेल्स, जो रूट, मोईन अली, जोस बटलर (यष्टीरक्षक), बेन स्टोक्स, सॅम बिलिंग्स, डेव्हिड विली, लियाम प्लंकेट, रिसी टोपले, ख्रिस जॉर्डन, आदिल रशीद, लियाम डॉसन.
अफगाणिस्तान : असगर स्टानिकझाय (कर्णधार), मोहम्मद शहझाद (यष्टीरक्षक), नूर अली झाद्रान, उस्मान घनी, मोहम्मद नबी, करिम सादिक, सफिखुल्लाह शफिक, रशीद खान, अमीर हमझा, दौलत झाद्रान, शापूर झाद्रान, गुलबदिन नाइब, समिउल्लाह शेनवारी, नजिबुल्लाह झाद्रान, हमिद हसन.