विश्वचषकाच्या बाद फेरीत पोहोचण्यासाठी इंग्लंडकडे श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात अखेरची संधी असेल. आतापर्यंत तीन सामन्यांमध्ये इंग्लंडने दोन विजयांसह चार गुण कमावले आहेत. पण शनिवारी श्रीलंकेविरुद्ध त्यांचा अखेरचा साखळी सामना असल्याने त्यांनी या सामन्यात विजय मिळवला तरच त्यांच्यासाठी बाद फेरीचे दार उघडू शकेल. दुसरीकडे वेस्ट इंडिजने दोन्ही सामन्यांत विजय मिळवल्याने त्यांचे पारडे इंग्लंडपेक्षा जड समजले जात आहे. हा सामना जिंकल्यास वेस्ट इंडिजचे बाद फेरीतील स्थान जवळपास निश्चित करता येऊ शकते.
वेस्ट इंडिजकडून पहिल्या सामन्यात पराभूत झाल्यावर इंग्लंडने दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांना पराभूत केले आहे. जेसन रॉय, जो रूट, इऑन मॉर्गन, जोस बटलर, बेन स्टोक्ससारखे फलंदाज संघात आहेत. पण आतापर्यंत इंग्लंडच्या फलंदाजांकडून सातत्य पाहायला मिळालेले नाही. मोइन अली हा सातत्याने अष्टपैलू कामगिरी करीत संघाच्या विजयाला हातभार लावत आहे. इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांना अजूनही सूर गवसलेला दिसत नाही.
श्रीलंकेचा कर्णधार अँजेलो मॅथ्यूजला या स्पर्धेत चांगले नेतृत्व करता आलेले नाही. तिलकरत्ने दिलशानवर श्रीलंकेची फलंदाजी अवलंबून असल्याचे दिसत आहे, कारण तो झटपट बाद झाल्यावर वेस्ट इंडिजविरुद्ध त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नव्हती. श्रीलंकेची गोलंदाजी मुख्यत्वेकरून फिरकीपटूंवर अवलंबून असेल. त्यामुळे रंगना हेराथकडून संघाला मोठय़ा अपेक्षा असतील. मिलिंडा सिरिवर्धने आणि लसिथ मलिंगाच्या जागी संघात आलेला जेफ्री वँडरसे हे युवा फिरकीपटू हेराथला कशी साथ देतात, यावर श्रीलंकेचा विजय ठरू शकतो.
दोन्ही संघांचा विचार केला तर श्रीलंकेपेक्षा इंग्लंडचे पारडे जड दिसत आहे. श्रीलंकेच्या संघाचे लवकर मानसिक खच्चीकरण होताना पाहायला मिळत आहे. दुसरीकडे मॉर्गन कुशलपणे इंग्लंडचे नेतृत्व करताना दिसत आहे.

इंग्लंड : इऑन मॉर्गन (कर्णधार), जेसन रॉय, जेम्स विन्स, अ‍ॅलेक्स हेल्स, जो रूट, मोइन अली, जोस बटलर (यष्टीरक्षक), बेन स्टोक्स, सॅम बिलिंग्स, डेव्हिड विली, लायम प्लंकेट, रीस टॉपले, ख्रिस जॉर्डन, आदिल रशिद आणि लायम डॉसन.

श्रीलंका : अँजेलो मॅथ्यूज (कर्णधार), दुशमंथा चमीरा, दिनेश चंडिमल, तिलकरत्ने दिलशान, रंगना हेराथ, शेहान जयसूर्या, चमिरा कपुगेदरा, नुवान कलसेकरा, सुरंगा लकमल, थिसारा परेरा, सचित्रा सेनानायके, दासून शनाका, मिलिंडा सिरिवर्धने, लहिरू थिरिमाने आणि जेफ्री वँडरसे.

* स्थळ : कोटला स्टेडियम, नवी दिल्ली
* वेळ : सायं. ७.३० वा.पासून
* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, ३ आणि एचडी १, ३.