ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या विजेतेपदासाठी भारतीय संघच प्रबळ दावेदार असल्याचे मत व्यक्त केलेला भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने विराट कोहलीची भरभरून स्तुती केली. विराट जेव्हा फलंदाजी करत असतो तेव्हा माझ्या मुलांना क्षणभरही टेलिव्हिजनपासून दूर जावेसे वाटत नाही. त्याची फलंदाजी माझ्या मुलांसाठी एक अनोखी मेजवानी असते. विराटने प्रत्येकवेळी अशीच दमदार फलंदाजी करावी, असे माझ्या मुलांना नेहमी वाटते. स्पर्धेला सुरूवात होण्याआधीच मी भारत, न्यूझीलंड, द.आफ्रिका आणि वेस्ट इंडिज या संघांची विजेतेपदाचे दावेदार असल्याचे म्हटले होते. पण यामधून भारतालाच या विश्वचषक उंचावण्याची सर्वाधिक संधी असून, भारतच जिंकेल असा विश्वास असल्याचे सेहवाग म्हणाला. न्यूझीलंडविरुद्ध भारताला पराभवाला समोरे जावे लागले असले तरी २०११ साली देखील भारताची अशीच निराशाजनक सुरूवात झाली होती. तेव्हा भारताने द.आफ्रिकेविरुद्ध नागपूरच्या स्टेडियमवर सामना गमावला होती. पण त्यानंतर संघाने पुनरागमन करत विश्वचषक उंचावला होता, हेही विसरता येणार नाही, असेही सेहवाग पुढे म्हणाला.