भारत-पाकिस्तान सामना म्हणजे धर्मयुद्ध, महायुद्ध, परंपरागत प्रतिस्पध्र्याशी लढाई, हायव्होल्टेज मॅच, मैदान ए जंग, आदी अनेक विशेषणांसह क्रिकेटरसिकांचे लक्ष वेधतो. या सामन्याला अ‍ॅशेसपेक्षाही वेगळे महत्त्व आहे, असे रविचंद्रन अश्विन म्हणतो. यात विलक्षण तथ्य आहे.(Full Coverage|| Fixtures||Photos या सामन्याच्या निमित्ताने पाकिस्तानचे क्रिकेट चर्चेत येते. तसे ते नेहमीच चांगल्यापेक्षा वाईट गोष्टीसाठीच अधिक चर्चेत असते. पाकिस्तानी संघनायक शाहीद आफ्रिदीने भारतीय चाहत्यांचे कोडकौतुक केले आणि स्वाभाविकपणे त्याच्यावर अनेकांनी तोफ डागली. पाकिस्तानचे माजी कर्णधार जावेद मियाँदादने मला तुझ्या वक्तव्याची शरम वाटते, अशा शब्दांत आफ्रिदीवर ताशेरे ओढले. ‘‘गेल्या पाच वर्षांत भारताने आम्हाला किंवा पाकिस्तानच्या क्रिकेटला काय दिले? हेच सत्य तू भारतात मांड,’’ अशी कैफियतच जणू जावेदने या वेळी मांडली. २००८मध्ये मुंबईवरील अतिरेकी हल्ला आणि त्यानंतर २००९मध्ये लाहोरच्या गदाफी स्टेडियमबाहेर श्रीलंकन क्रिकेट संघाच्या बसवर झालेला हल्ला या दोन घटनांनंतर पाकिस्तानमधील आंतरराष्ट्रीय क्रिकेट ठप्प झाले. सुदैवाने अमिरातीमध्ये त्रयस्थ ठिकाणी मालिका खेळण्याचा पर्याय पाकिस्तानला गेल्या काही वर्षांत गवसला आहे. मात्र गेल्या वर्षी आर्थिक अडचणीतून जाणाऱ्या झिम्बाब्वेच्या संघाने मर्यादित षटकांच्या सामन्यासाठी पाकिस्तान गाठण्याची हिंमत केली. मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मान्यता असलेल्या या सामन्यांसाठी सामनाधिकारी नेमणे प्रकर्षांने टाळले. लाहोरमधील पहिल्या एकदिवसीय सामन्याला ६० हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीची नोंद झाली होती. आता श्रीलंका किंवा वेस्ट इंडिज ही क्रिकेटमधील गरीब राष्ट्रे पाकिस्तानमध्ये जाण्याची चिन्हे आहेत. अगदी जानेवारीपर्यंत भारत-पाकिस्तान मालिकेविषयी कमालीची चर्चा झाली. या मालिकेचा निर्णय कमालीचा लांबवण्यात आला. त्याला अनेक राजनैतिक कारणे होती. पाकिस्तानने तर संयुक्त अरब अमिराती, श्रीलंका या त्रयस्त देशांमध्ये खेळायचीसुद्धा तयारी दर्शवली. मात्र अखेर मालिकेचा प्रस्ताव गुंडाळावा लागला. त्यांचे सचिव अनुराग ठाकूरही या मालिकेसाठी अनुत्सुक होते. मात्र ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे वेळापत्रक ठरवताना भारत-पाकिस्तान सामना आपल्या धरमशालामध्ये पदरात पाडून घेतला. परंतु दुटप्पी ठाकूर यांचा हा आनंद हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंग यांनी फार काळ टिकू दिला नाही. मग पाकिस्तानने धरमशालामध्ये खेळण्यास नकार दिल्यामुळे हा सामना ईडन गार्डन्सला हलवण्यात आला. यंदा आयपीएलचा नववा हंगाम होणार आहे. मात्र ट्वेन्टी-२० क्रिकेटला अनुकूल एकापेक्षा एक क्रिकेटपटू पाकिस्तानकडे असूनही, त्यांना आयपीएलमध्ये स्थान नाही. याला अनेक राजनैतिक कारणे जबाबदार आहेत. तसेच फ्रेंचायझी, स्पध्रेचे संयोजक यांना कुणाचाही रोष नको आहे. पण गेल्या काही दिवसांत संयुक्त अरब अमिरातीमध्ये पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) झाली असल्यामुळे पाकिस्तानच्या क्रिकेटचे अर्थकारण सुधारू शकेल. पाकिस्तानमध्ये क्लबवर आधारित व्यावसायिक ट्वेन्टी-२० स्पध्रेला तशी २००४-०५मध्येच सुरुवात झाली. त्यानंतर तिने पुरस्कर्त्यांच्या नावामुळे अनेकदा नावे बदलली. पीएसएल हे त्याचे ताजे स्वरूप. तूर्तास, पाकिस्तानचे क्रिकेट हळूहळू पुन्हा आपला रूबाब प्राप्त करण्यासाठी धडपडत आहे.

– प्रशांत केणी