पाकिस्तानविरुद्ध युवराज सिंगने २४ धावांची खेळी साकारली. मात्र आघाडीचे तीन फलंदाज तंबूत परतल्यानंतर संघाचा डाव सावरणाऱ्या त्या खेळीचे मोल मात्र नक्कीच अधोरेखित होते. परिस्थितीच्या मागणीनुसार मी फलंदाजी करतो. ईडन गार्डन्सवर शनिवारी मोठय़ा संख्येने क्रिकेटरसिकांची हजेरी होती. मात्र मी त्याचा फार विचार केला नाही, असे भारताचा फलंदाज युवराज सिंगने सांगितले.
‘‘परिस्थितीनुरूप फलंदाजी करायला मला अतिशय आवडते, मग ती कोणतीही मोठी स्थिती असो. योग्य गोष्टींकडे लक्ष केंद्रित करण्याकडे माझा कल असतो. मी चेंडूचे बारकाईने निरीक्षण करून फलंदाजी करतो आणि तेच मी केले. दुर्दैवाने सामन्यात विजय मिळेपर्यंत मी मैदानावर थांबू शकलो नाही. विराट कोहली जिद्दीने खेळला. त्याला धोनीनेही उत्तम साथ दिली,’’ असे युवराजने सामन्यानंतर सांगितले.
भारतीय संघातील अनुभवी खेळाडू युवराजने आशिया चषकातील पाकिस्तानविरुद्धच्या लढतीतसुद्धा महत्त्वाची भागीदारी रचली होती, तशीच त्याने ईडन गार्डन्सवर कोहलीसोबत ६१ धावांची भागीदारी केली. याबाबत युवी म्हणाला, ‘‘सुरुवातीचे तीन फलंदाज बाद झाल्यानंतर चांगली भागीदारी होण्याची आवश्यकता होती. कोहलीसोबतच्या अर्धशतकी भागीदारीमुळे भारतीय संघावरील दडपण कमी झाले.’’
पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतर आता भारताची बांगलादेशशी गाठ पडणार आहे. याबाबत ३५ वर्षीय युवराज म्हणाला, ‘‘संघ जिंकल्यामुळे आत्मविश्वास परतला आहे, याचे मला अधिक समाधान आहे. बांगलादेशविरुद्धच्या आगमी सामन्यातसुद्धा हाच फॉर्म दिसून येईल.’’