सध्या भारतात सुरू असलेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत झालेला भारत विरुद्ध बांगलादेश सामना फिक्स असल्याचा आरोप पाकिस्तानच्या माजी फिरकीपटूने केला आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्याचा निकाल संशयास्पद वाटत असून, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या(आयसीसी) भ्रष्टाचार विरोधी पथकाने या सामन्याची चौकशी करायला हवी, अशी मागणी पाकिस्तानचे माजी फिरकीपटू तौसीफ अहमद यांनी केली आहे. (Full Coverage || Fixtures || Photos)

पाकिस्तानच्या संघाकडून ३४ कसोटी आणि ७० एकदिवसीय सामने खेळलेले ५७ वर्षीय तौसीफ यांनी बांगलादेश संघाने अखेरच्या षटकात सामना भारताला गिफ्ट म्हणून देऊ केला असल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, सामन्याचा शेवट ज्या पद्धतीने झाला त्यात काहीतरी गडबड आहे असे मला वाटते. त्यामुळे आयसीसीने या सामन्याची चौकशी करायला हवी.

बांगलादेशने हा सामना केवळ १ धावेने गमावला होता. हार्दिक पंड्याने टाकलेल्या शेवटच्या षटकात तीन विकेट्स पडल्या होत्या. बांगलादेशला दोन चेंडूत दोन धावांची गरज असतानाही भारताने हा सामना अखेरच्या चेंडूवर जिंकला होता.