कोहलीच्या अद्वितीय खेळीच्या बळावर भारत उपांत्य फेरीत; वेस्ट इंडिजविरुद्ध वानखेडेवर सामना; ऑस्ट्रेलियाचे आव्हान संपुष्टात
शारजात १९९९मध्ये वाळूच्या वादळानंतर सचिन तेंडुलकर नावाचे वादळ घोंघावले होते. त्या वादळात ऑस्ट्रेलियन संघाचा अक्षरश: पालापाचोळा झाला होता. पंजाबच्या वेधशाळेने रविवारी पावसाची शक्यता वर्तवली होती. पण मोहालीच्या आय. एस. बिंद्रा स्टेडियमवर एका विराट वादळाची अनुभूती क्रिकेटरसिकांनी घेतली. भारताची प्रारंभीची धिमी फलंदाजी पाहता विजयाच्या आशा क्रिकेटरसिकांनी जवळपास सोडल्या होत्या. पण कठीण प्रसंगात जिद्दीने लढत कोहलीने नाबाद ८२ धावांची खेळी साकारली आणि ‘चलो मुंबई’चा विराट नारा दिला. ऑस्ट्रेलियाचा सहा विकेट्स आणि ५ चेंडू राखून पराभव करीत भारताने वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले.
भारताला अखेरच्या तीन षटकांत ३९ धावांची आवश्यकता असताना कोहलीच्या फलंदाजीचे विराट दर्शन घडले. फॉकनरच्या १८व्या षटकात कोहलीने दोन षटकार आणि एक चौकार ठोकत धोनीच्या साथीने एकंदर १९ धावा केल्या. मग नॅथन कोल्टर-निलेच्या १९व्या षटकात कोहलीने चार चौकारांच्या आतषबाजीसह १६ धावा केल्या. त्यानंतर फॉकनरच्या २०व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर लाँग ऑनला चौकार मारत ‘फिनिशर’ धोनीने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले आणि स्टेडियमवर एक अद्वितीय जल्लोषाला प्रारंभ झाला. सामना संपल्यानंतरसुद्धा चाहते मंडळींचा ‘कोहली.. कोहली..’ हा नाद बराच काळ सुरू होता. कोहली आणि धोनी यांनी पाचव्या विकेटसाठी ३१ चेंडूंत नाबाद ६७ धावांची भागीदारी केली.
भारताची सुरुवात खराब झाली. शिखर धवन (१३), रोहित शर्मा (१०) आणि सुरेश रैना (१०) हे पुन्हा एकदा मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरल्यामुळे भारताची ३ बाद ४९ अशी अवस्था झाली. पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मागील तीन सामन्यांमध्ये अनुक्रमे ९०*, ५९* आणि ५० करणाऱ्या विराटने युवराजच्या साथीने चौथ्या विकेटसाठी ४५ धावांची भागीदारी केली. घरच्या मैदानावर पायाच्या दुखापतीचे आव्हान पेलत खेळणाऱ्या युवीला २१ धावांवर फॉकनरने बाद केले. वॉटसनने त्याचा अप्रतिम झेल टिपला.
तत्पूर्वी, उत्तरार्धात खेळपट्टी फिरकीला अधिक साथ देईल, या इराद्याने ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्हन स्मिथने भारताला प्रथम गोलंदाजी दिली. ऑस्ट्रेलियाने प्रारंभीपासून उगारलेले आक्रमणाचे हत्त्यार चार षटकांपर्यंतच प्रभावीपणे चालले. ३.४ षटकांत धावफलकावर अर्धशतक झळकावणाऱ्या ऑस्ट्रेलियाला निर्धारित षटकांत ६ बाद १६० धावाच करता आल्या.
आरोन फिन्चने पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकून आपले इरादे स्पष्ट केले. पण आशीष नेहराने उर्वरित षटकात एकही धाव दिली नाही. जसप्रित बुमराहच्या दुसऱ्या षटकात उस्मान ख्वाजाने चार चौकारांची आतषबाजी केली. वेगवान गोलंदाजांनी ३ षटकात ३१ धावा दिल्यानंतर धोनीने ऑफ-स्पिनर आर. अश्विनकडे चेंडू दिला. आरोन फिन्चने तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर अनुक्रमे लाँग ऑफ आणि लाँग ऑनला षटकार खेचले. त्यामुळे चौथ्या षटकाअखेरीस ऑस्ट्रेलियाच्या धावफलकावर ५३ धावा लागल्या. त्यावेळी हा संघ दोनशेपेक्षा अधिक धावसंख्या सहज उभारेल असे वाटत होते. पण धोनीने नेहराला पुन्हा दुसऱ्या टोकाकडून आणले. नेहराने ख्वाजाचा (२६) अडसर दूर केला. त्यानंतर धावांसाठी झगडणारा डेव्हिड वॉर्नर (६) अपयशी ठरला. अश्विनच्या गोलंदाजीवर पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न करणाऱ्या वॉर्नरला धोनीने खुबीने यष्टीचीत केले.
दहाव्या षटकात युवराजला यंदाच्या विश्वचषकातील पहिलेच षटक देण्यात आले. युवीने पहिल्याच चेंडूवर स्टिव्हन स्मिथला बाद करीत सर्वाची वाहवा मिळवली. मग एका बाजूने हिंमतीने फलंदाजी करणाऱ्या आरोन फिन्चचा हार्दिक पंडय़ाच्या गोलंदाजीवर शिखर धवनने सुरेख झेल टिपला.
फिन्चने ३४ चेंडूंत ३ चौकार आणि २ षटकारांसह ४३ धावा केल्या. भारतीय वातावरणाला सरावलेल्या ग्लेन मॅक्सवेलने एक चौकार आणि एक षटकारासह २८ चेंडूंत ३१ धावांची खेळी साकारली. शेन वॉटसनने नाबाद १८ धावा केल्या. तर भारताच्या हार्दिक पंडय़ाने ३६ धावांत २ बळी घेतले.

संक्षिप्त धवफलक
ऑस्ट्रेलिया : २० षटकांत ६ बाद १६० (आरोन फिन्च ४३, ग्लेन मॅक्सवेल ३१; युवराज सिंग १/१९, आशीष नेहरा २/२०, हार्दिक पंडय़ा २/३६) पराभूत वि. भारत : १९.१ षटकांत ४ बाद १६१ (विराट कोहली नाबाद ८२, युवराज सिंग २१; शेन वॉटसन २/२३)
सामनावीर : विराट कोहली

अफलातून खेळी विराट! संस्मरणीय! संघर्ष करत मिळवलेला दिमाखदार विजय.
– सचिन तेंडुलकर, माजी कर्णधार

विराट, तुझी खेळी अविस्मरणीय! कालातीत महानता! श्रेष्ठतम खेळाडू! या खेळीकरता मनापासून धन्यवाद. भविष्यात तुझ्याकडून अशा खेळी होतील याची खात्री आहे.
अमिताभ बच्चन, बॉलीवूड अभिनेता

थरारक सामना! भारतीय संघाचा अभिमान वाटतो. विराट कोहलीची अप्रतिम खेळी आणि महेंद्रसिंग धोनीचे कल्पक नेतृत्त्व!
नरेंद्र मोदी, पंतप्रधान

विराटची सर्वोत्तम खेळी. विराटला पाहताना सचिन तेंडुलकरच्या शानदार खेळींची आठवण झाली.
– शेन वॉर्न, ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू

विराटची दिमाखदार खेळी. धावांच्या भुकेल्या कोहलीला रोखणे अशक्य आहे.
– रोहन बोपण्णा, टेनिसपटू

विराट कोहलीला सलाम! दडपणाच्या परिस्थितीत केलेली आणखी एक थरारक खेळी. दडपण हा शब्द त्याच्या शब्दकोशात नसावा!
– व्हीव्हीएस लक्ष्मण, माजी क्रिकेटपटू

विराट कोहलीने एकहाती ऑस्ट्रेलियाला चीतपट केले. धावांचा पाठलाग करण्यात माहीर विराटची अप्रतिम खेळी. चक दे!
– सौरव घोषाल, स्क्वॉशपटू