बुधवारी ट्वेन्टी-२० विश्वचषकातली साखळी लढत होती. या लढतीत पराभव भारतीय संघासाठी स्पर्धेतून गाशा गुंडाळण्यासाठी पुरेसा होता. यजमान भारताचा पराभव झाला असता तर आर्थिक, टीआरपी आणि चाहत्यांची निराशा असा सगळा पट विस्कटणार होता. खेळपट्टीचा नूर ओळखत बांगलादेशने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली आणि पहिले पाऊल अचूक टाकले. प्रत्येक भारतीय फलंदाजांचे कच्चे दुवे ओळखून त्यानुसार रणनीती राबवत बांगलादेशने बलाढय़ भारतीय फलंदाजांना केवळ १४६ धावांतच रोखले. पाठलाग करता येईल अशा धावसंख्येवर भारताला रोखत बांगलादेशने दुसरा टप्पा यशस्वीपणे पार केला. षटकामागे आवश्यक धावगती राखत बांगलादेशने शेवटच्या षटकापर्यंत वाटचाल केली, तरीही आव्हान कठीण होते. मात्र हार्दिक पंडय़ाच्या षटकात लागोपाठ दोन चौकार वसूल करत बांगलादेश इतिहासाच्या उंबरठय़ावर होता. दुसऱ्या चौकारानंतर माजी कर्णधार मुशफिकर रहीमने जल्लोष साजरा केला आणि तिथेच गडबड झाली. शेवटची धाव घेईपर्यंत किंवा शेवटची विकेट पडेपर्यंत गोष्टी गृहीत धरू नयेत, हा क्रिकेटचा मूलभूत सिद्धांत मुशफिकर विसरला आणि घात झाला. पुढच्या तीन चेंडूंत विजयी फटका लगावण्याच्या नादात तीन विकेट पडल्या आणि बांगलादेशची इयत्ता अजूनही प्राथमिक असल्याचे सिद्ध झाले.
तब्बल १८ वर्षांनंतर बांगलादेशचा संघ भारतात भारताशी सामना करत होता. ऐतिहासिक विजयाच्या इतके समीप येऊनही पराभव होणे, हे त्यांची कौशल्ये घोटीव नसल्याचे लक्षण आहे. २००० साली कसोटी दर्जा मिळाल्यानंतर बांगलादेशचा प्रवास सुरू झाला. मात्र एका विशिष्ट खेळाडूवर संघाची मदार असे. अमाप गुणवत्ता असूनही सातत्याने असातत्यपूर्ण खेळ करणारा संघ अशी त्यांची ओळख होती. मात्र चंडिका हातुरसिंघे आणि हिथ स्ट्रीक या प्रशिक्षकांनी बांगलादेशचा पाया पक्का केला. मोठय़ा संघांविरुद्ध विभिन्न वातावरणात टक्कर देणारी फलंदाजी, फिरकी बलस्थान असतानाही कष्टाने निर्माण केलेला वेगवान गोलंदाजांचा ताफा आणि अफलातून क्षेत्ररक्षण या बळावर बांगलादेश संघ म्हणून घडत गेला. घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि भारताला नमवत त्यांनी लिंबूटिंबू नसल्याचे सिद्ध केले. बांगलादेश प्रीमिअर लीगमुळे ट्वेन्टी-२० प्रकारात खेळण्याचा सरावही झाला. खेळाडूंच्या प्रदर्शनात आणि जिंकण्यात सातत्य आल्याने बांगलादेशची ताकद वाढली. सौम्या सरकार, सब्बीर रहमान, अल अमीन, मुस्ताफिझूर रेहमान या गुणी खेळाडूंनी स्वत:ची छाप उमटवली. विश्वचषकात पाकिस्तानविरुद्धच्या लढतीनंतर तस्किन अहमद आणि अराफत सनी या प्रमुख गोलंदाजांवर सदोष शैलीमुळे बंदीची कारवाई झाली. हा मानसिक आघात बांगलादेशला पेलवला नाही. अटीतटीच्या क्षणी भावनांपेक्षा कट्टर व्यावसायिकता दाखवावी लागते, हा धडाच विसरल्याने बांगलादेशच्या लाखो चाहत्यांची निराशा झाली. एकेरी, दुहेरी धावांसह लक्ष्य गाठण्याची संधी असताना विजयी फटका लगावण्याचा मोह बांगलादेशच्या दोन अनुभवी फलंदाजांना टाळता आला नाही आणि त्यांचे शिकणे पक्के नसल्याची जाणीव झाली.

– पराग फाटक