डकवर्थ-लुईस नियमानुसार पाकिस्तानचा भारतावर दोन धावांनी विजय

हाता-तोंडाशी आलेला विजयाचा घास पावसाने हिरावून घ्यावा, असेच भारतीय महिला संघाच्या बाबतीत विश्वचषकातील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पाहायला मिळाले. प्रचंड दडपणाखाली झालेल्या या सामन्यात भारताने पाकिस्तानपुढे ९७ धावांचे आव्हान ठेवले होते. पण छोटय़ा, पण डोंगराएवढय़ा वाटणाऱ्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या पाकिस्तानची भारताने १६ षटकांमध्ये ६ बाद ७७ अशी अवस्था केली होती. भारत आता सामना जिंकणार, असे वाटत असतानाच पावसाची अवकृपा झाली आणि डकवर्थ-लुईस नियमानुसार पाकिस्तानला दोन धावांनी विजयी घोषित करण्यात आले. (Full Coverage|| Fixtures||Photos)

पाकिस्तानने नाणेफेक जिंकत भारताला फलंदाजीसाठी पाचारण केले आणि त्यांच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत भारताच्या धावसंख्येला वेसण घालण्याचे काम चोख बजावले. पहिल्या दहा षटकांमध्ये भारताची २ बाद २७ अशी दयनीय अवस्था होती. भारताचे आशास्थान असलेली कर्णधार मिताली राज (१६) आणि हरमनप्रीत कौर (१६) यांना पाकिस्तानच्या गोलंदाजांनी जखडून ठेवले होते. पण वेदा कृष्णमूर्तीने १९ चेंडूंत ३ चौकारांच्या जोरावर २४ धावा केल्याने भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली.

पाकिस्तानने आक्रमक सुरुवात करत भारताच्या गोलंदाजांवर दडपण आणण्याचा प्रयत्न केला, पण गोलंदाजांपेक्षा या वेळी क्षेत्ररक्षकांवर अधिक दडपण आल्याचे पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षणामध्ये चुका करत भारताने बऱ्याच धावा पाकिस्तानला बहाल केल्या. दहा षटकांमध्ये पाकिस्तानने ३ बाद ५० अशी मजल मारली होती. पण पंधराव्या षटकानंतर त्यांची धावांची गाडी घसरली. ७१ ते ७७ या सहा धावांमध्ये पाकिस्तानने तीन फलंदाज गमावले आणि सामना भारताच्या बाजूने झुकला होता. पण पावसाने घात केला आणि भारत विजयापासून वंचित राहिला.

संक्षिप्त धावफलक

भारत : २० षटकांत ७ बाद ९६ (वेदा कृष्णमूर्ती २४; अनाम अमीन १/९) पराभूत वि. पाकिस्तान : १६ षटकांत ६ बाद ७७ (सिद्रा अमीन २६; झुलान गोव्सामी १/१४).

निकाल : डकवर्थ-लुईसनुसार पाकिस्तान २ धावांनी विजयी.