बांगलादेशविरुद्ध साखळी फेरीतील तिसरा सामना आज; धावगती वाढवण्यासाठी यजमानांची प्रथम फलंदाजीची रणनीती
काही गोष्टी आपला पाठलाग कधीही सोडत नाही. धावगतीचे दडपण भारतीय संघाच्या पाचवीलाच पूजलेले. हा सामना एवढय़ा फरकाने जिंकला तरच बाद फेरीत प्रवेश मिळू शकतो, हे समीकरण भारतीय संघापुढे नेहमीच उभे ठाकलेले असते. त्यामध्येच बुधवारी सामना आहे तो बांगलादेशशी, ज्यांनी २००७च्या विश्वचषकात भारताला धक्कादायकरीत्या पराभूत केले होते. (FULL COVERAGE || FIXTURES || PHOTOS)
एम. चिन्नास्वामी स्टेडियमची खेळपट्टी ही इथल्या नागरिकांसारखीच शांत समजली जाते, त्यामुळे धावांचे डोंगरही उभारणे कठीण. त्याचबरोबर या मैदानात भारताचा एकमेव ट्वेन्टी-२० सामना झाला असून त्यामध्ये पाकिस्तानने विजय मिळवला होता. त्यातचफलंदाजांच्या फॉर्मच्या चिंतेनेही डोके वर काढले आहे. त्यामुळे भारतीय संघाला या सामन्यात बऱ्याच आव्हानांच्या अडथळ्यांची शर्यत लागणार आहेत.

Watch: India vs Bangladesh World T20 Preview

या सामन्यात भारताला फक्त विजय मिळवायचा नाही, तर मोठय़ा फरकाने बांगलादेशला पराभूत करावे लागेल. सलग दोन पराभवांमुळे बांगलादेशला स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी आता विजयावाचून पर्याय उरलेला नाही. त्यामुळे विजयाची चव चाखण्यासाठी हा जखमी ‘छावा’ कधीही पंजा मारू शकतो, हे विसरून चालणार नाही. त्यामुळे भारतासाठी ही रात्र वैऱ्याची आहे, हे मात्र नक्की.
सध्याच्या घडीला ‘ब’ गटामध्ये ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि भारत यांच्या खात्यात प्रत्येकी दोन गुण जमा आहेत, पण धावगती कमी असल्यामुळे भारतीय संघ चौथ्या स्थानावर आहे. यामध्ये भारताची धावगती -०.८९५ एवढी कमी आहे. त्यामुळे भारताबरोबर अन्य संघांचे समान गुण झाले तर धावगतीमुळे भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येऊ शकते. त्यामुळेच या सामन्यात प्रथम फलंदाजी करून मोठी धावसंख्या उभारायची आणि बांगलादेशला कमीत कमी धावसंख्येत गुंडाळण्याची रणनीती भारतीय संघ आखत आहे.
फलंदाजी हे भारताचे बलस्थान. पण या स्पर्धेत विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे सरावादरम्यान एकीकडे भारतीय संघातील बरेचसे खेळाडू फुटबॉल खेळत असताना शिखर धवन आणि सुरेश रैना यांना फक्त फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यास सांगण्यात आले होते. भारताच्या मध्यमगती आणि फिरकी गोलंदाजांकडून त्यांना तब्बल तासभर सराव देण्यात आला. रोहितचा फॉर्म चांगला नसला तरी त्याने बांगलादेशविरुद्ध आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. आतापर्यंतच्या चार सामन्यांमध्ये त्याची दोन अर्धशतके असून जवळपास दोनशे धावा त्याने जमवल्या आहेत. त्यामुळे फॉर्मात येण्यासाठी रोहितसाठी हा सामना एक चांगली संधी असेल. युवराज सिंगकडून चाहत्यांना मोठय़ा खेळी अपेक्षा आहे. रवींद्र जडेजा आणि हार्दिक पंडय़ा यांची फलंदाजी चांगली झाली नसून त्यांनासुद्धा कामगिरी सिद्ध करावी लागणार आहे. गोलंदाजीमध्ये आर. अश्विन, जडेजा, जसप्रीत बुमराह आणि आशीष नेहरा सातत्याने भेदक मारा करत आहेत. पण या खेळपट्टीवर युवराज चांगली गोलंदाजी करू शकेल.
बांगलादेशकडे आता विजयाशिवाय पर्याय उरलेला नाही. त्यामुळे ते पूर्णपणे झोकून देऊन या सामन्यात उतरतील. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात त्यांनी या मैदानातील सर्वोच्च धावसंख्या उभारली होती. महमदुल्लाह हा भन्नाट फॉर्मात आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याने त्याने फलंदाजीची चमक दाखवून दिली होती. शकिब अल हसनसारखा गुणवान अष्टपैलू त्यांच्याकडे आहे, जो फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये सामना फिरवू शकतो. सौम्य सरकार आणि सब्बीर रेहमान चांगली फलंदाजी करत आहेत. गोलंदाजीमध्ये अल-अमिन हुसेन आणि मुस्ताफिझूर रहमान हे भेदक मारा करत आहेत. फक्त त्यांनी जर छोटय़ा-छोटय़ा चुका टाळल्या तर भारताला धक्का देण्याची कुवत त्यांच्याकडे नक्कीच आहे.

भारत वि. बांगलादेश
* स्थळ : एम. चिन्नास्वामी स्टेडियम
* वेळ : रात्री ७.३० वाजल्यापासून
* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, ३ आणि एचडी १, ३.

खेळपट्टीचा अंदाज
एम. चिन्नास्वामी स्टेडियमची खेळपट्टी संथ असल्याचे म्हटले जाते. या सामन्यातही धावांचे डोंगर उभारण्याची शक्यता फार कमी आहे. फलंदाज स्थिरस्थावर झाल्यावर मोठी खेळी साकारू शकतात. फिरकी आणि मध्यमगती गोलंदाजीसाठी ही खेळपट्टी पोषक समजली जाते. लेग स्पिनर किंवा डावखुऱ्या गोलंदाजांना खेळपट्टीची चांगली मदत मिळू शकेल.

संघ
भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, युवराज सिंग, सुरेश रैना, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, हार्दिक पंडय़ा, जसप्रीत बुमराह, आशीष नेहरा, अजिंक्य रहाणे, मोहम्मद शमी, हरभजन सिंग, पवन नेगी.
बांगलादेश : मश्रफी मुर्तझा (कर्णधार), सौम्या सरकार, तमीम इक्बाल, सब्बीर रेहमान, शकिब अल हसन, मुशफिकर रहिम (यष्टीरक्षक), महमदुल्लाह, नासीर हुसेन, मोहम्मद मिथुन, अबू हैदर, अल-अमिन हुसेन, नुरूल हसम, मुस्ताफिझूर रेहमान, शुवागता होम, साकलेन साजिब.

धावगतीपेक्षा विजय महत्त्वाचा -नेहरा
‘‘गुणतालिका पाहिल्यास आमचे पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियासारखेच दोन गुण असतानाही आम्ही चौथ्या स्थानावर आहोत. आमची धावगती कमी आहे, हे मला मान्य आहे. पण धावगतीपेक्षाही आम्हाला विजय महत्त्वाचा आहे. त्यामुळे धावगतीपेक्षा आम्ही विजय मिळवण्यावर अधिक भर देणार आहोत,’’ असे भारताचा मध्यमगती गोलंदाज आशीष नेहराने सांगितले. बांगलादेशच्या संघाविषयी विचारले असता तो म्हणाला की, ‘‘गेल्या ३-४ वर्षांमध्ये बांगलादेशने लक्षणीय कामगिरी केली आहे. त्याचबरोबर ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये कोणताही संघ पराभवाचा धक्का देऊ शकतो. त्यामुळे त्यांना कमी लेखण्याची चूक आम्ही करणार नाही.’’

छोटय़ा चुका टाळाव्या लागतील -शकिब
‘‘ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात आमच्याकडून छोटय़ा चुका झाल्या आणि त्याच आम्हाला महागात पडल्या. त्यामुळे या पराभवातूून बरेच काही आम्ही शिकलो आहे, त्यामुळे छोटय़ा चुका टाळल्या तर आम्हाला भारताला पराभूत करता येऊ शकते,’’ असे बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शकिब अल हसनने सांगितले. भारताविरुद्धच्या सामन्याबाबत तो म्हणाला, ‘‘गेल्या सामन्यात आम्ही पहिल्या सहा षटकांमध्ये फार कमी धावा केल्या, ही गोष्ट भारताविरुद्ध आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करू. भारत नेहमीच मोठय़ा स्पर्धेचा प्रबळ दावेदार असतो, पण त्यांच्याशी दोन हात करण्यास आम्ही सज्ज आहोत.’’