ऑस्ट्रेलियावर सहा गडी राखून विजय; विराट कोहली सामनावीर
बलाढय़ ऑस्ट्रेलियाला सहा गडी राखून नमवत टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारतीय संघाने रविवारी दिमाखात प्रवेश केला. ऑस्ट्रेलियाचे १६१ धावांचे आव्हान भारताने विराट कोहलीच्या नाबाद ८२ धावांच्या जोरावर सहज पार केले. आता उपांत्य फेरीत भारताची गाठ वेस्ट इंडिजशी पडणार आहे. ३१ मार्चला मुंबईत हा सामना होईल.
साखळी गटात न्यूझीलंडकडून पराभूत झाल्यानंतर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला सहज नमवणाऱ्या धोनीच्या संघाला बांगलादेशविरोधात मात्र निसटत्या विजयावर समाधान मानावे लागले होते. या पाश्र्वभूमीवर उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी बलाढय़ ऑस्ट्रेलियावर विजय मिळवणे आवश्यक होते. कांगारूंनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ख्वाजा व फिंच यांनी कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत सुरुवातीलाच धडाकेबाज फलंदाजी केली. मात्र, ते बाद झाल्यावर ऑस्ट्रेलियाची धावगती मंदावली. अखेरीस २० षटकांत कांगारूंना १६० धावाच करता आल्या.
१६१ धावांचा पाठलाग करताना भारताने रोहित शर्मा व शिखर धवन ही बिनीची जोडी स्वस्तात गमावली. त्यानंतर आलेल्या कोहली व युवराजसिंग यांनी मात्र डाव सावरला. विराट ध्येयासक्ती जोपासणाऱ्या विराट कोहलीने (नाबाद ८२) जिद्दीच्या बळावर भारताला एका रोमहर्षक विजय मिळवून दिला. कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सलग चौथ्या सामन्यात अर्धशतक झळकावण्याचा पराक्रम केला.