cricket-blog-ravi-patki-670x200आजच्या भारत पाकिस्तान सामन्याची उत्कंठा शिगेला पोचली आहे. घराघरात,नाक्या नाक्यावर, शाळा,कॉलेज,ऑफिस सगळीकडे मॅचचा माहोल आहे. संध्याकाळी चौका चौकात स्क्रीन लागणार आहेत.हॉटेल वाल्यांनी फर्मास मेन्यू बरोबर मॅच चा आनंद घ्या अशा जाहिराती केल्या आहेत. मित्रांच्या घरी एकत्र मॅच बघण्याचा अनेकांचा कार्यक्रम आहे. एकंदरित तयारी जय्यत आहे.आता फक्त भारताने मॅच जिंकली पाहिजे अशी मागणी आहे.मागणी कसली साकडं घातलय,विनवणी केलिये,नवस बोललाय वगैरे वगैरे.

भारत पाकिस्तान मधल्या साधारण गेल्या आठ दहा वर्षाचा इतिहास पाहिला तर पाकिस्तानची गोलंदाजी विरुद्ध भारताची फलंदाजी अशी टक्कर झालेली दिसून येते. पाकिस्तानच्या एकसो एक प्रतिभावान गोलंदाजाना भारतीय फलंदाज कसे तोंड देतात आणि धावा करतात यावर निकाल ठरत आला आहे.आजची परिस्थिति तशीच असली तरी भारताचे चित्त्या सारखे मैदानावर दबा धरून थांबलेले जडेजा,पंड्या,कोहली, रैना,बूमराह हे क्षेत्ररक्षक मॅच विनर्स ठरतील असा कयास आहे. आपली धावसंख्या १४० च्या आसपास झाली तर या चित्त्यांमुळे ती १७० वाटू शकते. यांची डायरेक्ट थ्रो ने रन आउट करण्याची क्षमता चांगली आहे.तसेच हे पाच खेळाडू अवघड झेल घेऊ शकतात. त्यामुळे आपला जो स्कोर होईल त्यात २० ते ३० अधिकच्या धावा धरायला डोळे झाकून हरकत नाही. क्षेत्ररक्षणात पाकिस्तान संघ तेव्हढाच मजबूत आहे जेव्हढे त्यांचे खेळाडू इंग्रजीत. त्यामुळे आउटफील्ड आणि इनफील्ड ह्या दोन्हीचे त्यांचे किल्लेदार कितपत किल्ला वाचवू शकतील या बद्दल शंकाच् आहे. सूर मारून झेल पकड़णे तसेच दोघांनी पाठलाग करून सहकार्याने चेंडू आडवणे यासारखी अंगाला लाऊन घेणारी कामे ते करत नाहीत. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे पाकस्तानच्या दादा गोलंदाजानी वर्षानुवर्षे फलंदाजांचे त्रिफळे उडवले आहेत किंवा पायचित केले आहेत.त्यामुळे पाकिस्तानने फील्डिंग चे महत्व चेंडू आड़वण्या पलीकडे फारसे विचारात घेतलेले नाही.अगदी टी-20 च्या युगात सुद्धा सर्वोत्तम झेलांमध्ये पाकिस्तान ने घेतलेले झेल पहायला मिळत नाहीत.(सोडलेले सोपे झेल अशी स्पर्धा निघाली तर पहिली पाच ऑस्कर त्यांची.)एक महत्वाची गोष्टं इथे सांगाविशी वाटते की फलंदाजी आणि गोलंदाजीपेक्षा क्षेत्ररक्षण करणारा खेळाडू तुलनात्मकदृष्टया कमी तणावा खाली असतो. त्यामुळे ज्या खेळाडूला मुळात क्षेत्ररक्षण आवडते तो त्याच्या प्रतिभेचा मुक्तपणे आविष्कार करू शकतो.हा मॅच विनिंग फॅक्टर होउ शकतो. जडेजा,पंड्या,कोहली,रैना,बूमराह हे क्षेत्ररक्षण एन्जॉय करणारे खेळाडू आहेत. त्यांच्या मुळे आपल्या संघात वेगळेच चैतन्य संचारते.त्यामुळे आज आपले हे चित्ते नक्की करणार फत्ते.म्हणून आजचा मुकाबला हा पाकिस्तानची गोलंदाजी विरुद्ध भारताचे क्षेत्ररक्षण असा झाला तर आश्चर्य वाटू नये.
अजून एक गोष्टं नेहमी लक्षात येते म्हणजे पाकिस्तान हा नवीन प्रयोग करुन प्रतिस्पर्ध्याला चकित करणारा संघ नाही. ठराविक चाकोरित खेळणे,धाडसी निर्णय न घेणे त्यामुळे त्या संघा बद्दल आराखड़े बांधणे अवघड नसते.अफ्रीदी फार काही वेगळं करून प्रतिस्पर्ध्याला विचार करायला लावेल असे वाटत नाही.

एकंदर मॅच च्या सुरवातीला भारताचे ग्रहमान चांगलं दिसतय.आता कोहली नामक सूर्यमालेतील सूर्याभोवती फिरणारे इतर गृह थोड़े स्वयंप्रकाशित होतील अशी आशा करुया.सारखी त्याच्या एकट्याच्या जीवावर मॅच टाकून त्याचा सचिन करू नये. आपली फलंदाजी चांगल्या नियोजनाने व्हायला हवी.असो.

विदाऊट टेंशन मॅच बघा. क्रिकेटचा आनंद घ्या.आपला आवाज कलकत्यात पोचला पाहिजे.